india vs england test series team india opening pair
India vs England 1st Test : इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेपूर्वी रोहित शर्माने कसोटीतून निवृत्तीची घोषणा केली. त्याच्या निवृत्तीनंतर संघाला शुभमन गिलच्या रुपात नवा कर्णधार मिळाला. पण त्याच्यानंतर संघाच्या सलामी जोडीत त्याची उणीव कोण भरून काढेल हा सर्वात मोठा प्रश्न निर्माण झाला. त्यामुळे टीम इंडियाच्या नवीन सलामी जोडी शोधण्याची वेळ आली आहे. भारत विरुद्ध इंग्लंड मालिकेत भारतासाठी कोण डावाची सुरुवात करेल. याची उत्सुकता सर्वांनाच लागली आहे.
भारतीय संघ 20 जून रोजी इंग्लंडविरुद्ध पहिला कसोटी सामना खेळणार आहे. त्यापूर्वी सध्या एक सराव सामना खेळला जात आहे. हा सामना इंडिया अ आणि इंग्लंड लायन्स यांच्यात खेळला जात आहे, ज्यामध्ये भारताचे नेतृत्व अभिमन्यू ईश्वरनकडे सोपवण्यात आले आहे. केएल राहुल या संघाचा भाग नाही. पण तो इंग्लंडला पोहोचला असून इंग्लंड लायन्स विरुद्धच्या सामन्यात मैदानात उतरला.
राहुल हा मुख्य कसोटी संघाचा भाग आहे. त्याने शुक्रवारी (दि. 6) इंडिया अ आणि इंग्लंड लायन्स यांच्यातील सामना सुरू झाला तेव्हा यशस्वी जैस्वालसोबत सलामीची जबाबदारी स्वीकारली. या आधीच्या सामन्यात कर्णधार अभिमन्यू ईश्वरन आणि जैस्वाल यांनी डावाची सुरुवात केली होती.
आयपीएल 2025 चा हंगाम संपताच केएल राहुल इंग्लंडमध्ये पोहोचला आहे. शिवाय तो भारत अ संघाचा भाग नसूनही थेट इंग्लंद लायन्स विरुद्धच्या सामन्यात जैस्वालसोबत सलामीला मैदानात उतरला. यावरून असे दिसून येते की 20 जून रोजी इंग्लंडविरुद्धच्या कसोटीत हीच जोडी टीम इंडियाच्या डावाची सुरुवात करताना दिसेल. जेव्हा टीम इंडिया ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर गेली होती तेव्हा केएल राहुल आणि यशस्वी जैस्वाल यांनी पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दोन सामन्यांमध्ये सलामी दिली होती. रोहित पहिल्या कसोटीला मुकला होता आणि शेवटच्या कसोटीत त्याला स्वतःला प्लेइंग इलेव्हनमधून वगळण्यात आले. त्यावेळी राहुलने सलामी देताना शानदार खेळ दाखवला होता.
भारताची प्लेइंग इलेव्हन काय असेल यावर नक्कीच चर्चा होईल, पण सलामी जोडीबाबत कोणताही सस्पेन्स आहे असे वाटत नाही. आता तिसऱ्या क्रमांकावर कोण येतो आणि कर्णधार शुभमन गिल स्वतः कोणता नंबर निवडतो हे पाहणे मनोरंजक असेल. साई सुदर्शनला संधी दिली जाते की अभिमन्यू ईश्वर खेळताना दिसेल? तर सुमारे आठ वर्षांनी कसोटीत पुनरागमन करणारा भारताच्या प्लेइंग इलेव्हनचा भाग असेल की नाही? असे अनेक प्रश्न आहेत ज्याकडे चाहत्यांच्या नजरा खिळल्या आहेत. याची उत्तरे 20 जून रोजी दुपारी 3 वाजता जेव्हा दोन्ही संघांचे कर्णधार टॉससाठी मैदानावर येतील तेव्हा नक्कीच मिळतील.