स्पोर्ट्स

IND vs ENG Lord's Test : लॉर्ड्स कसोटीसाठी प्लेइंग 11 जाहीर! सामना जिंकण्यासाठी संघात मोठा बदल

लॉर्ड्स कसोटी सामना गुरुवारी (10 जुलै) दुपारी 3 वाजता सुरू होईल.

रणजित गायकवाड

IND vs ENG Test Series 3rd Test at Lords England playing 11 announced

भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील तिसरा सामना 10 जुलैपासून लॉर्ड्सच्या ऐतिहासिक मैदानावर खेळवला जाणार आहे. मालिकेतील पहिला सामना इंग्लंडने जिंकला होता, तर दुसऱ्या सामन्यात टीम इंडियाने दमदार पुनरागमन करत विजय मिळवला. त्यामुळे सध्या मालिका 1-1 अशी बरोबरीत असून, अजून तीन सामने बाकी आहेत. या मालिकेच्या प्रवासाला निर्णायक वळण देणारा तिसरा सामना अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. या पार्श्वभूमीवर, सामन्याच्या एक दिवस आधीच इंग्लंडने आपली अंतिम अकरा (प्लेइंग इलेव्हन) जाहीर केली असून, संघात एक महत्त्वपूर्ण बदल करण्यात आला आहे.

आर्चरचे पुनरागमन

भारत-इंग्लंड यांच्यातील लॉर्ड्स कसोटी सामना गुरुवारी (10 जुलै) दुपारी 3 वाजता सुरू होईल. तत्पूर्वी सामन्याच्या एक दिवस आधीच इंग्लंडने त्यांच्या अंतिम अकरा खेळाडूंची घोषणा केली. अपेक्षेप्रमाणे, संघात एक महत्त्वपूर्ण बदल करण्यात आला आहे. इंग्लंडच्या प्रमुख वेगवान गोलंदाजांपैकी एक असलेल्या जोफ्रा आर्चरला पुनरागमनाची संधी देण्यात आली आहे. दुसऱ्या सामन्यापासूनच आर्चर संघात होता, मात्र दीर्घकालीन दुखापतीनंतर तो पुनरागमन करत असल्याने, खबरदारीचा उपाय म्हणून त्याला अंतिम अकरामध्ये स्थान देण्यात आले नव्हते. आता मात्र तो पूर्णपणे तंदुरुस्त असून लॉर्ड्स कसोटी खेळण्यासाठी सज्ज झाला आहे.

विशेष म्हणजे, आर्चरने दुखापतीपूर्वी आपला शेवटचा कसोटी सामना भारताविरुद्धच खेळला होता. 2019 मध्ये कसोटी पदार्पण केलेल्या आर्चरने फेब्रुवारी 2021 मध्ये अहमदाबाद येथे भारताविरुद्ध आपला शेवटचा कसोटी सामना खेळला होता. म्हणजेच, सुमारे साडेचार वर्षांच्या दीर्घ कालावधीनंतर तो कसोटी क्रिकेटमध्ये पुनरागमन करीत आहे. या कालावधीत तो अधूनमधून मर्यादित षटकांच्या सामन्यांत खेळत होता. आयपीएल 2025 मध्येही तो खेळला.

आर्चरने इंग्लंडकडून आतापर्यंत 13 कसोटी सामन्यांत 42 बळी घेतले असून, तीन वेळा पाच किंवा अधिक बळी मिळवण्याचा पराक्रम केला आहे. भारताविरुद्ध दोन कसोटीत त्याने चार बळी घेतले आहेत.

भारतीय संघातही बदल अपेक्षित

भारतीय संघाच्या अंतिम अकराबाबत अद्याप अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. मात्र, किमान एक बदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. लॉर्ड्सची खेळपट्टी वेगवान गोलंदाजांसाठी अनुकूल असल्याने जसप्रीत बुमराहच्या पुनरागमनाची शक्यता आहे, तर प्रसिद्ध कृष्णाला बाहेर बसावे लागू शकते. तथापि, भारतीय कर्णधार शुभमन गिल टॉस वेळीच अंतिम संघाची घोषणा करतील.

तिसऱ्या कसोटीसाठी इंग्लंडचा 11 खेळाडूंचा संघ :

जॅक क्रॉली, बेन डकेट, ओली पोप, जो रूट, हॅरी ब्रुक, बेन स्टोक्स (कर्णधार), जेमी स्मिथ (यष्टिरक्षक), ख्रिस वोक्स, ब्रायडन कार्स, जोफ्रा आर्चर, शोएब बशीर.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT