India Vs England T20 WC pudhari photo
स्पोर्ट्स

India Vs England T20 WC: भारत-इंग्लंड सामना रद्द झाल्यास काय... कोणता संघ फायनलमध्ये जाणार अन् का?

Anirudha Sankpal

India Vs England T20 WC : टी २० वर्ल्डकप २०२६ च्या पहिल्या सेमी फायनलमध्ये न्यूझीलंडने दक्षिण अफ्रिकेचा पराभव करत फायनल गाठली. आता भारत आणि इंग्लंड यांच्यात वानखेडेवर होणाऱ्या सामन्याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. या सामन्यात भारताचं पारडं जड असलं तरी इंग्लंडचा संघ देखील तुल्यबळ आहे. इंग्लंड आणि भारत हे पुन्हा एकदा नॉक आऊटमध्ये भिडणार आहेत. या सामन्यात धावांचा पाऊस पडणार आहे.

हॅरी ब्रुक्सच्या नेतृत्वाखाली खेळणारा इंग्लंड संघ टी २० वर्ल्डकपच्या सेमी फायनलमध्ये सलग तिसऱ्यांदा भारतासोबत भिडणार आहे. २०२२ च्या टी २० वर्ल्डकपमध्ये इंग्लंडनं भारताचा पराभव केला होता. पुढे त्यांनी वर्ल्डकप देखील जिंकला. त्यानंतर दोन वर्षांनी भारतानं त्याचा बदला घेत त्यांना पराभवाचं पाणी पाजलं. त्या वर्षी भारतानं टी २० वर्ल्डकप जिंकला. आज पुन्हा एकदा हे दोन संघ एकमेकांना भिडणार आहेत.

पाऊस आलाच तर काय?

वानखेडेवरचा सामना धडाकेबाज होणार यात काही शंका नाही. मात्र हवामानानं साथ दिली पाहिजे. पाऊस आलाच तर सामन्याचं काय होणार हा देखील प्रश्न आहे. त्याबाबत आयसीसीचा काय नियम आहे?

आयसीसीने पावसाची शक्यता गृहीत धरून यासाठी आधीच उपाय योजना केली आहे. आयसीसीने भारत - इंग्लंड सामन्यासाठी एक रिझर्व डे ठेवला आहे. जर आज पाऊस आलाच तर सेमी फायनल ही राखीव दिवशी खेळवली जाईल. याचबरोबर सामन्यादिवशी ९० मिनिटांचा अतिरिक्त वेळ देखील ठेवला आहे. तसेच राखीव दिवशी १२० मिनिटांचा अतिरिक्त वेळ ठेवला आहे. त्यामुळं जरी पाऊस पडला तरी किमान पाच षटकांचा खेळ होण्याची शक्यता आहे.

तर इंग्लंड जाणार सेमी फायनलमध्ये

आयसीसीची तयारी जोरात असली तरी जर पावसानं रूद्रावतार धारण केला अन् दोन्ही दिवशी एकही चेंडू टाकण्याची संधी मिळाली नाही तर काय? यासाठी आयसीसीने एक नियम केला आहे. जो संघ सुपर ८ मधून वरच्या रँकवर क्वालिफाय झाला आहे त्याला फायनल खेळण्याची संधी मिळेल. याबाबतीत इंग्लंड हा अव्वल आहे. इंग्लंडने सुपर ८ मध्ये ग्रुप २ मध्ये ३ सामन्यात विजय मिळवला होता. भारत ग्रुप १ मध्ये २ विजयांसह दुसऱ्या स्थानावर होता. त्यामुळं इथं इंग्लंडचं पारडं जड आहे.

वरूणदेवाची कृपादृष्टी

जरी नियमानुसार इंग्लंडचं पारडं जड असलं तरी वरूणदेवाची भारतावर कृपादृष्टी आहे. अॅक्यूवेदरनुसार भारत - इंग्लंड सेमी फायनल दिवशी मुंबईत शून्य टक्के पावसाची शक्यता आहे. या सामन्यासाठी जी खेळपट्टी दिली आहे त्याच्यावर आधीच दोन सामने झाले आहेत. वेस्ट इंडीजने इंग्लंडविरूद्ध १९६ धावांचा यशस्वी पाठलाग केला होता. तर नेपाळने देखील १२३ धावांचे आव्हान सहज पार केलं होतं.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT