England vs India test Shubman Gill Harry Brook mind game  file photo
स्पोर्ट्स

IND vs ENG 2nd Test : मैदानावर इंग्लंडची 'चालबाजी'! हॅरी ब्रूकच्या एका वाक्याने गिलचं तिहेरी शतक हुकलं? पाहा नेमकं काय घडलं!

Shubman Gill Harry Brook mind game : दुसऱ्या कसोटीत शुभमन गिल तिहेरी शतकापासून अवघ्या 31 धावांनी दूर राहिला. चहापानानंतर इंग्लंडच्या हॅरी ब्रूकने स्लेजिंग करत गिलची एकाग्रता भंग करण्याचा प्रयत्न केला आणि यानंतर लगेचच गिल बाद झाला.

मोहन कारंडे

England vs India test Shubman Gill Harry Brook mind game

बर्मिंगहम : इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात भारताचा कर्णधार शुभमन गिलने इतिहास रचला. गिलने गुरूवारी शानदार दुहेरी शतक झळकावले. कर्णधार म्हणून केवळ दुसऱ्याच कसोटीत खेळणाऱ्या गिलने, कोणत्याही भारतीय कर्णधाराच्या सर्वोच्च खेळीचा विराट कोहलीचा विक्रम मोडला. तो ज्या पद्धतीने खेळत होता, ते पाहून इंग्लंडच्या गोलंदाजांना घाम फुटला होता.

रवींद्र जडेजाच्या मते, आज शुभमन गिल बाद होईल असे वाटत नव्हते. शुभमन गिल तिहेरी शतक झळकावणारा पहिला भारतीय कर्णधार बनण्याच्या दिशेने वाटचाल करत होता, पण तसे होऊ शकले नाही. त्याला रोखण्यासाठी इंग्लंडने सर्वतोपरी प्रयत्न केले. त्याचे लक्ष विचलित करण्यासाठी माइंडगेमचाही वापर केला. चहापानानंतर लगेचच, इंग्लंडच्या हॅरी ब्रूकने गिलची एकाग्रता भंग करण्यासाठी एक खेळी केली. त्याने माइंडगेम खेळला आणि योगायोगाने त्यानंतर गिल २६९ धावांवर बाद झाला.

ब्रूकच्या माइंडगेममुळेच गिलचे तिहेरी शतक हुकले का?

चहापानानंतर इंग्लंडचा फिरकीपटू शोएब बशीर गोलंदाजी करत होता. भारतीय डावातील हे १४३ वे षटक होते. गिल २६५ धावांवर खेळत होता. तेव्हा स्लिपमध्ये उभ्या असलेल्या हॅरी ब्रूकने त्याची एकाग्रता भंग करण्यासाठी एक चाल खेळली. तो गिलला काहीतरी बोलताना दिसला आणि गिलही त्याला उत्तर देताना दिसला. या घटनेची एक व्हिडिओ क्लिप समोर आली आहे.

अन् गिलची एकाग्रता भंग झाली..

त्यावेळी इंग्लंडचे माजी कर्णधार माइक अथर्टन समालोचन करत होते. त्यांनी कॉमेंट्री दरम्यान ब्रूक आणि गिल यांच्यात नेमके काय बोलणे झाले हे सांगितले. ब्रूक म्हणाला, '२९० धावांच्या पुढे जाणे खूप कठीण आहे.' यावर गिलने विचारले, 'तू किती तिहेरी शतके केली आहेस?' या दरम्यान गिलची एकाग्रता भंग झाली असावी आणि इंग्लंडला तेच हवे होते. बशीरचे षटक संपले आणि टंगच्या पुढच्या षटकात, म्हणजेच भारतीय डावातील १४४ व्या षटकाच्या तिसऱ्याच चेंडूवर, शुभमन गिल २६९ धावांवर बाद झाला. विशेष म्हणजे, ब्रूकच्या नावावर कसोटीत एक तिहेरी शतक आहे.

गिलची ऐतिहासिक खेळी 

भारतीय कसोटी संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारी खांद्यावर येताच शुभमन गिलच्या बॅटमधून धावांची जणू आतषबाजीच सुरू झाली आहे. लीडस्मधील पहिल्या कसोटीत शतक झळकावल्यानंतर गिलने दुसर्‍या कसोटीत आपले पहिलेवहिले द्विशतक झळकावले. २६९ धावांच्या ऐतिहासिक खेळीत ३८७ चेंडूं खेळले. या दरम्यान त्याने ३० चौकार आणि ३ षटकार लगावले. त्याच्या खेळीच्या जोरावर भारताने पहिल्या डावात ५८७ धावांची मोठी धावसंख्या उभारली. दुसऱ्या दिवसाचा खेळ थांबला तेव्हा इंग्लंडच्या ७७ धावांत ३ गडी बाद झाले होते. शुक्रवारी एजबॅस्टन कसोटीचा तिसरा दिवस आहे आणि इंग्लंड अजूनही ५१० धावांनी पिछाडीवर आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT