स्पोर्ट्स

Rohit Sharma Records : ‘हिटमॅन’च्या निशाण्यावर 6 विक्रम, ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेतील धमाकेदार खेळीची चाहत्यांना प्रतिक्षा

रोहित शर्मा एकाचवेळी सचिन तेंडुलकर, विराट कोहली यांना मागे टाकण्याची शक्यता आहे.

रणजित गायकवाड

भारतीय संघाचा अनुभवी फलंदाज रोहित शर्मा सुमारे ६ महिन्यांच्या विश्रांतीनंतर मैदानावर पुनरागमन करत आहे. तो ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत खेळताना दिसणार आहे, ज्याची सुरुवात १९ ऑक्टोबर रोजी पर्थ येथे होणार आहे.

या मालिकेमध्ये संघाचे कर्णधारपद शुभमन गिल भूषवणार असून रोहित शर्मा एक वरिष्ठ खेळाडू म्हणून सलामीला फलंदाजी करताना दिसेल. रोहितने आपला शेवटचा एकदिवसीय सामना ९ मार्च रोजी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये न्यूझीलंडविरुद्ध दुबईत खेळला होता. त्या सामन्यात हिटमॅनने ७६ धावांची शानदार खेळी करत ‘प्लेअर ऑफ द मॅच’ हा पुरस्कार पटकावला होता. दरम्यान, आता रोहित शर्माला अगामी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत अनेक महत्त्वाचे विक्रम आपल्या नावावर करण्याची मोठी संधी आहे.

सचिन तेंडुलकरचा ‘हा’ विक्रम मोडणार?

रोहित शर्माने आतापर्यंत ऑस्ट्रेलियाविरुद्ध ८ एकदिवसीय शतके झळकावली आहेत. आता जर त्याने या मालिकेत दोन शतके झळकावली, तर तो सचिन तेंडुलकरला (९ शतके) मागे टाकत, कांगारूंविरुद्ध सर्वाधिक शतके झळकावणारा फलंदाज बनेल.

एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार

रोहितने आतापर्यंत २७३ एकदिवसीय सामन्यांमध्ये ३४४ षटकार ठोकले आहेत. पाकिस्तानचा शाहिद आफ्रिदी (३५१ षटकार)चा विक्रम मोडण्यासाठी हिटमॅनला केवळ ८ षटकारांची गरज आहे. असे केल्यास, तो एकदिवसीय क्रिकेटच्या इतिहासात सर्वाधिक षटकार मारणारा फलंदाज ठरेल.

ऑस्ट्रेलियाच्या भूमीवर १००० धावा

ऑस्ट्रेलियामध्ये खेळलेल्या १९ एकदिवसीय सामन्यांमध्ये रोहित शर्माने ९९० धावा केल्या आहेत. ऑस्ट्रेलियाच्या भूमीवर १००० धावा पूर्ण करणारा पहिला भारतीय फलंदाज होण्यासाठी त्याला केवळ १० धावांची आवश्यकता आहे.

सौरव गांगुलीचा विक्रमही निशाण्यावर

एकदिवसीय सामन्यांमध्ये रोहित शर्माच्या खात्यात एकूण ११,१६८ धावा जमा आहेत. जर त्याने आणखी ५४ धावा केल्या, तर तो सौरव गांगुलीला (११,२२१ धावा) मागे टाकेल. यासह तो भारताकडून तिसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक एकदिवसीय धावा करणारा खेळाडू बनेल.

५०० आंतरराष्ट्रीय सामने पूर्ण करण्याच्या मार्गावर

रोहित शर्माने आतापर्यंत भारतासाठी ४९९ आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या या मालिकेत तो कोणताही सामना खेळल्यास, सचिन तेंडुलकर, एम.एस. धोनी, विराट कोहली आणि राहुल द्रविड यांच्यानंतर भारतासाठी ५०० आंतरराष्ट्रीय सामने खेळणारा तो पाचवा खेळाडू बनेल.

२०,००० आंतरराष्ट्रीय धावांची शक्यता

रोहित शर्माने आपल्या कारकिर्दीत आतापर्यंत १९,७०० आंतरराष्ट्रीय धावा केल्या आहेत. जर त्याने या मालिकेत ३०० धावा जोडल्या, तर तो २०,००० धावा पूर्ण करणारा चौथा भारतीय फलंदाज ठरेल. यापूर्वी ही कामगिरी सचिन तेंडुलकर, विराट कोहली आणि राहुल द्रविड यांनी केली आहे.

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया एकदिवसीय मालिकेचे वेळापत्रक

  • पहिली लढत : १९ ऑक्टोबर, पर्थ

  • दुसरी लढत : २३ ऑक्टोबर, अ‍ॅडलेड

  • तिसरी आणि अंतिम लढत : २५ ऑक्टोबर, सिडनी

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT