Virat Kohli Australia vs India 3rd ODI
सिडनी : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत दोन सामन्यांमध्ये शून्यावर बाद झालेल्या विराट कोहलीच्या फॉर्मवर माजी भारतीय फिरकीपटू आर. अश्विनने मोठे आणि महत्त्वाचे विधान केले आहे. आज होत असलेल्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात जर विराटने मोठी धावसंख्या केली नाही, तर लोक बोट दाखवायला सुरुवात करतील, अशी स्पष्ट चिंता अश्विनने व्यक्त केली आहे.
आर. अश्विनचा विराट कोहलीला इशारा
मालिकेतील दोन डावात शून्य धावांवर बाद झाल्यामुळे विराट कोहलीच्या एकदिवसीय क्रिकेटमधील भविष्याबद्दल चर्चांना ऊत आला आहे. तर दुसरीकडे, रोहित शर्माने दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात ७३ धावांची झुंझार खेळी करत फॉर्ममध्ये परत येण्याचे संकेत दिले आहेत. रोहितप्रमाणेच विराट कोहलीनेही सिडनीतील सामन्यात दमदार पुनरागमन करावे, अशी आशा अश्विनने त्याच्या यूट्यूब शोमध्ये व्यक्त केली.
अश्विन म्हणाला, "तो परत येईल आणि सिडनीमध्ये मोठी धावसंख्या करेल अशी मला आशा आहे. गुरुवारी रोहितसोबत जे झाले, ते विराट कोहलीला सिडनीमध्ये गरजेचे आहे, कारण भारतात आपण सामना का हरलो यावर चर्चा करत नाही, तर आपण कोणामुळे हरलो यावर जास्त चर्चा करतो. लोक बोट दाखवायला सुरुवात करण्यापूर्वी, विराट धावा करेल अशी मला आशा आहे."
आऊट होण्याची पद्धत चिंतेचा विषय
ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज झेवियर बार्टलेटविरुद्ध विराट कोहली ज्या पद्धतीने बाद झाला, त्याबद्दलही अश्विनने चिंता व्यक्त केली. "विराटने चेंडूची लाईन ओळखण्यात चूक केली. त्याचा पाय चेंडूच्या दिशेने आला होता. ही गोष्ट सांगते की, त्याला खेळपट्टीवर अधिक वेळ घालवण्याची गरज आहे. सिडनीमध्ये विराट धावा करणार नाही, असे कोणतेही कारण नाही. पण मला वाटते की तो मागील दोन सामन्यांमध्ये ज्या पद्धतीने बाद झाला, त्याबद्दल खूप विचार करत असेल. हे सोपे नाही, पण विराट यातून बाहेर पडेल अशी मला आशा आहे," असे अश्विनने नमूद केले.
दोन सामन्यांनंतर ऑस्ट्रेलियाने ही मालिका २-० ने जिंकली आहे, त्यामुळे सिडनीतील तिसरा सामना टीम इंडियासाठी केवळ प्रतिष्ठेचा असणार आहे.