स्पोर्ट्स

IND vs AFG : अफगाणिस्तानविरुद्धच्या T20 मालिकेसाठी टीम इंडियाची लवकरच घोषणा; हार्दिक-बुमराहच्या निवडीवर टांगती तलवार

रणजित गायकवाड

मुंबई : श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी मालिकेत चमकदार कामगिरी केल्यानंतर आता भारतीय क्रिकेट संघ पुन्हा एकदा टी-२० मालिकेच्या तयारीला लागला आहे. पुढील महिन्यात, म्हणजेच सप्टेंबरमध्ये भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात तीन सामन्यांची टी-२० मालिका खेळवली जाणार आहे. मुख्य निवडकर्ता अजित आगरकर यांच्या अध्यक्षतेखालील निवड समिती ३ सप्टेंबरपर्यंत या मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. अफगाणिस्तानविरुद्धच्या या संघात अनेक युवा व नव्या चेहऱ्यांना संधी मिळण्याचे संकेत मिळत आहेत.

भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील या टी-२० मालिकेला १३ सप्टेंबरपासून प्रारंभ होणार आहे. क्रिकेट चाहत्यांसाठी आनंदाची बाब म्हणजे या मालिकेतील तिन्ही सामने नवी दिल्ली येथील अरुण जेटली स्टेडियमवर रंगणार आहेत. सर्व सामने सायंकाळी ७ वाजता सुरू होणार असल्याने राजधानीतील क्रिकेट रसिकांसाठी ही एक मोठी पर्वणी ठरणार आहे.

आशियाई क्रीडा स्पर्धेतील खेळाडूंवर पुन्हा विश्वास?

'टाइम्स ऑफ इंडिया'च्या वृत्तानुसार, निवड समिती या मालिकेसाठी २०२६ च्या आशियाई क्रीडा स्पर्धेतील संघ रचनेवरच पुन्हा एकदा विश्वास दाखवण्याची शक्यता आहे. हा निर्णय झाल्यास श्रेयस अय्यर भारतीय संघाचे नेतृत्व करताना दिसेल. याशिवाय इशान किशन, अभिषेक शर्मा, वैभव सूर्यवंशी आणि तिलक वर्मा यांसारख्या युवा गुणवान खेळाडूंचे संघातील स्थान निश्चित मानले जात आहे.

हार्दिक, बुमराहच्या तंदुरुस्तीकडे सर्वांचे लक्ष

दुसरीकडे, 'मिस्ट्री स्पिनर' वरुण चक्रवर्ती आता पूर्णपणे तंदुरुस्त असल्याचे समजते, त्यामुळे त्याचेही टी-२० संघात पुनरागमन होण्याची शक्यता बळावली आहे. तथापि, अंतिम संघ निवडण्यापूर्वी निवड समितीसमोर हार्दिक पांड्या, जसप्रीत बुमराह आणि नितीश कुमार रेड्डी यांच्या तंदुरुस्तीचे मूल्यमापन करण्याचे मोठे आव्हान असेल. हार्दिक आणि नितीश हे दोघेही गेल्या काही काळापासून दुखापतींशी झुंजत आहेत. हे खेळाडू पूर्णपणे तंदुरुस्त ठरल्यासच त्यांची संघात निवड केली जाईल.

वेगवान अष्टपैलू खेळाडूचा शोध कायम

भारतीय संघ सध्या दर्जेदार वेगवान अष्टपैलू खेळाडूच्या समस्येला सामोरा जात आहे. या भूमिकेसाठी शिवम दुबेलाही संधी देऊन चाचपणी करण्यात आली, मात्र त्यात फारसे यश आले नाही. संघात एका सक्षम वेगवान अष्टपैलू खेळाडूचा अभाव असल्याने कुलदीप यादवसारख्या आक्रमक फिरकीपटूला अंतिम अकरामध्ये खेळवणे कठीण जाते, ज्याचा थेट परिणाम संघाच्या एकूण संतुलनावर होत असल्याचे दिसून येत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT