india u19 cricket team vs england captain ayush mhatre smashes 340 runs
लंडन : 19 वर्षांखालील भारतीय संघाचा कर्णधार आयुष म्हात्रेने इंग्लंडविरुद्धच्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत उत्कृष्ट फलंदाजीचे प्रदर्शन केले. तो या मालिकेत केवळ भारताकडूनच नव्हे, तर दोन्ही संघांमधील सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला. आयुषने इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या आणि दुसऱ्या, अशा दोन्ही कसोटी सामन्यांमध्ये शतक झळकावले.
आयुष म्हात्रेने इंग्लंडविरुद्धच्या दोन कसोटी सामन्यांतील चार डावांमध्ये एकूण 328 चेंडूंचा सामना करत 340 धावा वसूल केल्या. या कामगिरीदरम्यान त्याची सरासरी 85.00 तर स्ट्राइक रेट 103.65 इतका प्रभावी राहिला. या चार डावांमध्ये त्याने दोन शतके आणि एक अर्धशतक झळकावले. त्याची 126 धावांची सर्वोत्तम खेळी दुसऱ्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या डावात साकारली. आयुषने या चार डावांमध्ये अनुक्रमे 102, 32, 80 आणि 126 धावांची खेळी केली. या खेळींमध्ये त्याने 9 षटकार आणि 46 चौकार लगावले.
इंग्लंडविरुद्धच्या या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत भारताकडून सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत विहान मल्होत्रा दुसऱ्या क्रमांकावर राहिला. त्याने चार डावांमध्ये एक शतक आणि दोन अर्धशतकांसह 277 धावा केल्या.
याच मालिकेत भारताकडून सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांमध्ये अभिज्ञान कुंडू तिसऱ्या स्थानी राहिला. त्याने दोन सामन्यांतील चार डावांमध्ये दोन अर्धशतकांसह 166 धावा केल्या. त्याची सर्वोत्तम धावसंख्या 90 होती. दरम्यान, वैभवने या मालिकेत निराशाजनक कामगिरी केली; त्याने एका अर्धशतकाच्या मदतीने केवळ 90 धावा केल्या, ज्यात 56 ही त्याची सर्वोत्तम धावसंख्या होती.