भारताचा उदयोन्मुख डावखुरा फलंदाज यशस्वी जैस्वाल याने पुन्हा एकदा सिद्ध केले आहे की, कठोर परिश्रम, जिद्द आणि प्रतिभेपुढे कोणतेही आव्हान मोठे नसते. मुंबईतील आझाद मैदानाच्या तंबूतून आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या मैदानापर्यंतचा प्रवास करणाऱ्या या युवा खेळाडूने आता थेट जागतिक व्यासपीठावर आपला प्रभाव सिद्ध केला आहे.
प्रतिष्ठित अमेरिकन नियतकालिक 'टाईम' (TIME) मासिकाने 2025 साठी जाहीर केलेल्या 'टाईम 100 नेक्स्ट' (TIME100 Next) यादीत यशस्वी जैस्वालला स्थान देऊन त्याच्या कर्तृत्वाला सलाम केला आहे. हा सन्मान मिळवणारा तो केवळ भारताचाच नव्हे, तर जगातील एकमेव क्रिकेटपटू ठरला आहे, हे विशेष.
‘टाईम’ मासिकाने जगभरातील विविध क्षेत्रांतील व्यक्तींची या यादीसाठी निवड केली आहे; मग ते मनोरंजन, क्रीडा, राजकारण, फॅशन किंवा इतर कोणतेही क्षेत्र असो. ज्यांनी-ज्यांनी आपापल्या क्षेत्रात प्रभाव सोडला आहे, अशा व्यक्तींना TIME100 Next यादीत समाविष्ट करण्यात आले आहे. महत्त्वाचे म्हणजे, या यादीत स्थान मिळवण्यासाठी 'टाईम'ने वयाची कोणतीही मर्यादा ठेवली नव्हती.
क्रीडा जगताचा विचार केल्यास, ‘टाईम’ मासिकाच्या 2025 च्या ‘100 नेक्स्ट’ यादीत या क्षेत्रातून एकूण पाच ॲथलीट्सना स्थान देण्यात आले आहे. हे पाचही खेळाडू वेगवेगळ्या खेळांशी संबंधित आहेत. यात लॅमिन यामल (फुटबॉलपटू, स्पेन), पेज ब्यूकर्स (महिला-बास्केटबॉलपटू, अमेरिका), टेलर फ्रिट्झ (पुरुष टेनिसपटू, अमेरिका), जिनो थितिकुल (महिला-गोल्फर, थायलंड) आणि यशस्वी जैस्वाल (क्रिकेटपटू, भारत) यांचा समावेश आहे.
TIME100 Next यादीतील सर्वात खास गोष्ट म्हणजे, यात स्थान मिळवणारा जैस्वाल हा जगातील एकमेव क्रिकेटपटू आहे. याव्यतिरिक्त, या यादीत 50 हून अधिक महिलांनी आपले स्थान निश्चित केले आहे. या यादीत स्थान मिळवणारी सर्वात तरुण व्यक्ती 16 वर्षीय एलिस्टन बेरी आहे.
जैस्वाल हा भारताच्या उदयोन्मुख क्रिकेटपटूंपैकी एक आहे. गेल्या काही वर्षांत तो भारताच्या कसोटी संघाचा महत्त्वाचा भाग बनला आहे. त्याने एकदिवसीय (वनडे) आणि टी-20 सामन्यांमध्येही भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केले आहे. आता तो जगभरात चर्चेचा विषय ठरला आहे. ‘टाईम’ मासिकाच्या अंकात त्याचे नाव प्रकाशित झाले आहे आणि तो शीर्ष 100 प्रभावशाली व्यक्तींच्या यादीचा भाग बनला आहे.
यशस्वी जैस्वाल अखेरचा इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत भारतीय संघाकडून खेळताना दिसला होता. त्याची आशिया कप 2025 साठी निवड झाली नव्हती. आता तो वेस्ट इंडिजविरुद्ध मायदेशात होणाऱ्या कसोटी मालिकेत खेळताना दिसणार आहे. भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील दोन सामन्यांची कसोटी मालिका गुरुवारी 2 ऑक्टोबर पासून सुरू होणार आहे, ज्यामध्ये यशस्वी जैस्वाल मैदानात उतरेल. जैस्वालने इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत उत्कृष्ट फलंदाजी केली होती आणि आता वेस्ट इंडिजविरुद्धच्या पुढील दोन सामन्यांमध्येही तो धावा कुटण्यासाठी सज्ज झाला आहे.