स्पोर्ट्स

Operation Sindoor चा पाक क्रिकेट बोर्डालाही दणका! विदेशी क्रिकेटपटू PSL सोडून मायदेशी परतण्याच्या तयारीत

भारताच्या 'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला मोठा धक्का बसणार आहे. अनेक विदेशी क्रिकेटपटू PSL सोडून मायदेशी परतण्याच्या तयारीत आहेत.

रणजित गायकवाड

england cricket players wants to leave psl after operation sindoor

नवी दिल्ली : भारताने 7 मे रोजी पाकिस्तानमध्ये ऑपरेशन सिंदूर (Operation Sindoor) राबवत पहलगाम हल्ल्याचा (Pahalgam Attack) बदला घेतला. भारताच्या या कारवाईनंतर पाकिस्तानमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे. याचा परिणाम पाकिस्तान सुपर लीगवर (PSL) देखील दिसून येतो आहे.

पाकिस्तान क्रिकेट बोर्डने (PCB) जाहीर केलं होतं की PSL सुरू राहील, मात्र त्यांनी सामन्यांबाबत मोठा निर्णय घेतला आहे. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानमध्ये खेळत असलेले विदेशी खेळाडूंमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. ते PSL सोडून आपल्या मायदेशी परतण्याची तयारी करत आहेत.

सर्व सामने कराचीला हलवले

वृत्तानुसार 7 मे रोजी गद्दाफी स्टेडियममध्ये एक बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला PCB अधिकारी, सर्व फ्रँचायझींचे मालक आणि प्रतिनिधी उपस्थित होते. बैठकीत स्पर्धेच्या सुरक्षेबाबत चर्चा झाली आणि अखेरीस PCBने निर्णय घेतला की आता लीगमधील उर्वरित सर्व सामने कराचीमध्ये खेळवले जातील.

इंग्लंड क्रिकेट बोर्डने खेळाडूंशी केला संपर्क

भारत-पाकिस्तान सीमेवरील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर इंग्लंड क्रिकेट बोर्ड पाकिस्तानमध्ये असलेल्या आपल्या खेळाडूंशी सातत्याने संपर्कात आहे. त्यांनी या परिस्थितीबाबत बोलण्यासाठी एक आपत्कालीन संपर्क क्रमांक जारी केला आहे. सध्या इंग्लिश बोर्डने खेळाडूंना परत येण्यास मनाई केली आहे, मात्र जर UK सरकारने ECB ला आदेश दिला, तर खेळाडूंना तातडीने मायदेशी आणले जाऊ शकते.

‘हे’ खेळाडू परतण्याच्या तयारीत

पाकिस्तान सुपर लीगमध्ये इंग्लंडचे सात खेळाडू सहभागी आहेत. यात सॅम बिलिंग्स, जेम्स विंस, टॉम करन, डेविड विली, क्रिस जॉर्डन, टॉम कोहलर आणि ल्यूक वुड हे विविध संघांचे प्रतिनिधित्व करत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, डेविड विली आणि क्रिस जॉर्डन यांनी त्यांच्या फ्रँचायझी मुल्तान सुल्तान्सकडे इंग्लंडला जाण्याबाबत विनंती केली आहे. मुल्तान सुल्तान्सची टीम प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडली असून त्यांचा लीग फेझमध्ये केवळ एक सामना बाकी आहे.

इंग्लंडव्यतिरिक्त इतर देशांच्या खेळाडूंचा सहभाग

इंग्लंडशिवाय पाकिस्तान सुपर लीगमध्ये इतर अनेक आंतरराष्ट्रीय खेळाडूही सहभागी आहेत. यामध्ये ऑस्ट्रेलियाचा डेविड वॉर्नर (कराची किंग्स), वेस्ट इंडिजचा जेसन होल्डर (इस्लामाबाद युनायटेड) आणि दक्षिण आफ्रिकेचा रासी व्हान डर डुसेन (इस्लामाबाद युनायटेड) यांचा समावेश आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT