India New Zealand Tour 2026 Pudhari
स्पोर्ट्स

India VS New Zealand 2026: 40 दिवस, 12 सामने आणि मोठे आव्हान! टीम इंडियाचा न्यूझीलंड दौरा जाहीर, 7 वर्षांनंतर घडणार खास गोष्ट

India New Zealand Tour 2026: न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाने भारताच्या 2026 दौऱ्याचे संपूर्ण वेळापत्रक जाहीर केले आहे. या दौऱ्यात टीम इंडिया 40 दिवसांत 5 टी-20, 5 वनडे आणि 2 कसोटी असे एकूण 12 सामने खेळणार आहे.

Rahul Shelke

India New Zealand Tour 2026: भारतीय क्रिकेट चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे. न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाने भारताच्या आगामी न्यूझीलंड दौऱ्याचे संपूर्ण वेळापत्रक जाहीर केले आहे. ऑक्टोबर ते डिसेंबरदरम्यान होणाऱ्या या दौऱ्यात टीम इंडिया तब्बल 40 दिवसांत 12 आंतरराष्ट्रीय सामने खेळणार आहे.

या दौऱ्यात भारत आणि न्यूझीलंड यांच्यात 5 टी-20, 5 वनडे आणि 2 कसोटी सामने खेळवले जाणार आहेत. 22 ऑक्टोबरपासून सुरू होणारा हा दौरा 1 डिसेंबरपर्यंत चालणार आहे.

विशेष म्हणजे सात वर्षांनंतर भारतीय संघ न्यूझीलंडमध्ये कसोटी मालिका खेळताना दिसणार आहे. त्यामुळे या दौऱ्याकडे क्रिकेटविश्वाचे विशेष लक्ष लागले आहे.

7 वर्षांनंतर न्यूझीलंडमध्ये कसोटी मालिका

भारतीय संघाने न्यूझीलंडमध्ये अखेरची कसोटी मालिका 2019 मध्ये खेळली होती. त्यानंतर भारताने न्यूझीलंडचा दौरा केला असला तरी तो केवळ मर्यादित षटकांच्या मालिकांसाठी होता. त्यामुळे तब्बल सात वर्षांनंतर भारतीय संघ पुन्हा एकदा न्यूझीलंडच्या आव्हानात्मक परिस्थितीत कसोटी क्रिकेट खेळताना दिसणार आहे. त्याचबरोबर 2022 नंतर प्रथमच भारतीय संघ न्यूझीलंडमध्ये मर्यादित षटकांची मालिका खेळणार आहे.

टी-20 मालिकेने होणार दौऱ्याची सुरुवात

भारतीय संघाच्या दौऱ्याची सुरुवात 22 ऑक्टोबरपासून पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेने होईल. पहिले दोन टी-20 सामने 22 आणि 24 ऑक्टोबर रोजी क्राइस्टचर्च येथे खेळले जातील. तिसरा सामना 27 ऑक्टोबरला वेलिंग्टनमध्ये होणार आहे. चौथा टी-20 सामना 30 ऑक्टोबरला ऑकलंड येथे रंगणार असून पाचवा आणि अंतिम सामना 1 नोव्हेंबर रोजी हॅमिल्टनमध्ये खेळवला जाईल.

4 नोव्हेंबरपासून वनडे मालिकेला सुरुवात

टी-20 मालिका संपल्यानंतर दोन्ही संघ 5 सामन्यांच्या वनडे मालिकेत आमनेसामने येतील. पहिला वनडे सामना 4 नोव्हेंबर रोजी ऑकलंडमध्ये होईल. दुसरा सामना 7 नोव्हेंबरला वेलिंग्टनमध्ये, तर तिसरा सामना 10 नोव्हेंबरला हॅमिल्टन येथे खेळवला जाईल. मालिकेतील शेवटचे दोन सामने 13 आणि 15 नोव्हेंबर रोजी माउंट माऊंगानुई येथे पार पडतील.

कसोटी मालिकेवर सर्वांचे लक्ष

वनडे मालिका संपल्यानंतर अवघ्या तीन दिवसांनी कसोटी मालिकेला सुरुवात होईल. पहिली कसोटी 19 ते 23 नोव्हेंबरदरम्यान वेलिंग्टन येथे खेळली जाईल. तर दुसरी आणि अंतिम कसोटी 27 नोव्हेंबर ते 1 डिसेंबर या कालावधीत क्राइस्टचर्च येथे होणार आहे.

न्यूझीलंडसाठीही ऐतिहासिक मालिका

आयसीसीच्या माहितीनुसार, न्यूझीलंडने यापूर्वी कधीही एका दौऱ्यात 12 आंतरराष्ट्रीय सामन्यांची मालिका आयोजित केलेली नाही. त्यामुळे ही मालिका न्यूझीलंड क्रिकेटसाठीही ऐतिहासिक ठरणार आहे.

भारतीय संघासाठी हा दौरा अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. विशेषतः कसोटी क्रिकेटमध्ये परदेशातील कामगिरी सुधारण्याचे मोठे आव्हान संघासमोर असेल. त्यामुळे रोहित शर्मा, शुभमन गिल, यशस्वी जैस्वाल आणि इतर खेळाडूंच्या कामगिरीकडे चाहत्यांचे लक्ष लागले आहे.

40 दिवस चालणाऱ्या या मोठ्या दौऱ्यात टीम इंडिया न्यूझीलंडमध्ये किती यशस्वी ठरते, याची उत्सुकता आता क्रिकेटप्रेमींना लागली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT