India T20 World Cup Semi Final Qualification Scenario: टी20 विश्वचषकातील सुपर-8 मध्ये भारताने झिम्बाब्वेविरुद्ध 72 धावांनी दमदार विजय मिळवत सेमीफायनलची आशा कायम ठेवली आहे. चेन्नईतील एमए चिदंबरम स्टेडियम येथे झालेल्या या सामन्यात सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली भारताने चमकदार कामगिरी केली.
आता गट-1 मधून उरलेल्या एका सेमीफायनल जागेसाठी भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात थेट लढत होणार आहे. रविवारी, 1 मार्च रोजी कोलकात्याच्या ईडन गार्डन्स येथे होणारा सामना निर्णायक ठरणार आहे.
दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 76 धावांनी झालेल्या पराभवानंतर भारताचा नेट रन रेट -3.800 इतका घसरला होता. मात्र झिम्बाब्वेविरुद्धच्या मोठ्या विजयामुळे तो -0.100 वर पोहोचला. तरीही वेस्ट इंडिजचा नेट रन रेट +1.791 इतका मजबूत आहे. त्यामुळे पुढील सामना भारतासाठी ‘करो या मरो’ असणार आहे.
भारताने वेस्ट इंडिजवर विजय मिळवला, तर सुपर-8 मधील तीन सामन्यांत चार गुणांसह तो थेट सेमीफायनलमध्ये प्रवेश करेल.
भारताचा पराभव झाल्यास त्यांचा प्रवास येथेच संपेल आणि वेस्ट इंडिज पुढे जाईल.
जर पावसामुळे सामना अनिर्णित राहिला, तर दोन्ही संघांचे तीन गुण होतील. मात्र चांगल्या नेट रन रेटमुळे वेस्ट इंडिजला सेमीफायनलचं तिकीट मिळेल आणि भारत स्पर्धेबाहेर जाईल.
टॉस हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना भारताने 4 बाद 256 धावांचा डोंगर उभा केला. टी20 विश्वचषकातील भारताची ही सर्वोच्च धावसंख्या आहे. अभिषेक शर्माने 30 चेंडूत 55 धावांची खेळी करत मजबूत पायाभरणी केली. संजू सॅमसन, ईशान किशन आणि कर्णधार सूर्यकुमार यादव यांनीही योगदान दिले.
अखेरीस हार्दिक पांड्याने 23 चेंडूत नाबाद 50 धावांची तडाखेबंद खेळी करत सामना एकतर्फी केला. तिलक वर्माने केवळ 16 चेंडूत 44 धावा ठोकत झिम्बाब्वेच्या गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला.
उत्तरात ब्रायन बेनेटने 59 चेंडूत नाबाद 97 धावांची झुंज दिली, पण इतर फलंदाजांकडून साथ मिळाली नाही. अर्शदीप सिंगने 3 विकेट घेत भारताला विजयाच्या जवळ आणले आणि टी20 विश्वचषकात भारतासाठी सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज ठरला. आता सर्वांच्या नजरा भारत वेस्ट इंडिज सामन्याकडे आहेत.