T20 World Cup 2026 Pudhari
स्पोर्ट्स

IND vs PAK: पाकिस्तानवर विजय मिळाला… पण वर्ल्डकप ट्रॉफी हातातून जाण्याची शक्यता, भारतासाठी धोक्याची घंटा

T20 World Cup 2026: भारताने पाकिस्तानवर 61 धावांनी दणदणीत विजय मिळवत सुपर-8 मध्ये प्रवेश केला आहे. मात्र 15 फेब्रुवारी आणि महाशिवरात्रीचा जुना योगायोग पुन्हा आल्याने चाहत्यांमध्ये चिंता निर्माण झाली आहे.

Rahul Shelke

IND vs PAK Win Sparks Concern: T20 वर्ल्ड कपच्या ग्रुप स्टेजमध्ये भारताने पाकिस्तानवर दणदणीत विजय मिळवत सुपर-8 मध्ये प्रवेश केला. कोलंबोमधील आर. प्रेमदासा स्टेडियम येथे झालेल्या या सामन्यात भारताने पाकिस्तानला तब्बल 61 धावांनी पराभूत केलं. सामना जितका एकतर्फी होता, तितकाच पाकिस्तानचा शरणागती पत्करणारा खेळ अनेकांना आश्चर्यचकित करणारा ठरला.

या विजयामुळे टीम इंडियाचा आत्मविश्वास नक्कीच वाढला आहे. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ सध्या जेवढ्या दमदार पद्धतीने खेळतोय, ते पाहता यावेळी भारत पुन्हा एकदा विश्वविजेतेपद पटकावेल, अशी आशा चाहत्यांना वाटू लागली आहे. मात्र या विजयामागे एक विचित्र योगायोग असून, त्यामुळे काही क्रिकेटप्रेमींच्या मनात थोडी चिंता निर्माण झाली आहे.

कारण भारत–पाकिस्तान हा सामना रविवारी 15 फेब्रुवारीला खेळवला गेला आणि हा दिवस महाशिवरात्रीचा होता. विशेष म्हणजे, ही पहिली वेळ नाही की 15 फेब्रुवारीला भारताने पाकिस्तानला वर्ल्ड कपमध्ये हरवलं आहे. 2015 च्या वर्ल्ड कपमध्येही याच तारखेला टीम इंडियाने पाकिस्तानवर विजय मिळवला होता.

इतकंच नव्हे, तर 2003 च्या वर्ल्ड कपमध्येही भारत–पाकिस्तान सामना महाशिवरात्रीच्या दिवशीच झाला होता आणि त्यावेळीही भारताने पाकिस्तानवर मात केली होती. म्हणजे 2003, 2015 आणि आता 2026, या तिन्ही वेळा भारताने पाकिस्तानला हरवलं आहे.

2003 मध्ये पाकिस्तानवर विजय मिळवल्यानंतर टीम इंडिया फायनलमध्ये पोहोचली, पण अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाकडून पराभव झाला आणि विश्वचषक हातातून गेला. 2015 मध्येही पाकिस्तानला हरवल्यानंतर भारत उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियाकडून पराभूत झाला आणि पुन्हा एकदा ट्रॉफी मिळवण्याचं स्वप्न अपूर्ण राहिलं.

आता पुन्हा 15 फेब्रुवारी, पुन्हा महाशिवरात्र आणि पुन्हा पाकिस्तानवर मोठा विजय मिळवला आहे, हा सगळा योगायोग पाहता, “पुन्हा इतिहासाची पुनरावृत्ती होणार तर नाही ना?” असा प्रश्न काहींच्या मनात घर करू लागला आहे.

मात्र यावेळी परिस्थिती वेगळी असल्याचं अनेक तज्ज्ञ मानतात. सध्याचा भारतीय संघ अधिक संतुलित आहे. फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण या तिन्ही विभागांत टीम इंडिया मजबूत दिसत आहे. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली संघात आत्मविश्वास स्पष्टपणे जाणवतो.

आता प्रश्न एवढाच आहे की, 2003 आणि 2015 च्या इतिहासाची पुनरावृत्ती होणार की यावेळी टीम इंडिया तो बदलून नवा अध्याय लिहिणार? याचं उत्तर येत्या काही सामन्यांत मिळेल. कारण पाकिस्तानवर विजय मिळाला असला, तरी खरी परीक्षा अजून बाकी आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT