भारताची मलेशियावर एकतर्फी मात (Pudhari File Photo)
स्पोर्ट्स

Asia Cup Hockey 2025 | भारताची मलेशियावर एकतर्फी मात

राजगीर येथे सुरू असलेल्या आशिया चषक हॉकी स्पर्धेत भारतीय संघाने मलेशियाचा 4-1 असा पराभव करत स्पर्धेतील आपले आव्हान कायम राखले.

पुढारी वृत्तसेवा

राजगिर : वृत्तसंस्था

राजगीर येथे सुरू असलेल्या आशिया चषक हॉकी स्पर्धेत भारतीय संघाने मलेशियाचा 4-1 असा पराभव करत स्पर्धेतील आपले आव्हान कायम राखले. चीनने कोरियावर मिळवलेल्या विजयामुळे ‘सुपर 4’ फेरीतील अंतिम फेरीसाठीची चुरस वाढली असून, चारही संघांना अंतिम फेरी गाठण्याची संधी आहे.

गुरुवारी झालेल्या सामन्यात कोरियाविरुद्धच्या निराशाजनक बरोबरीनंतर भारताला या विजयाची नितांत गरज होती. सामन्याच्या सुरुवातीला पिछाडीवर पडल्यानंतर भारतीय खेळाडूंनी दुसर्‍या क्वार्टरमध्ये तीन गोल डागत सामन्याचे चित्र पालटले. मनप्रीत सिंग, सुखजीत सिंग, शिलानंद लाक्रा आणि विवेक सागर प्रसाद यांनी गोल केले. दिवसाच्या सुरुवातीला, चीनने कोरियावर 3-0 असा सनसनाटी विजय मिळवल्यामुळे ‘सुपर 4’ फेरीतील अंतिम सामन्यांपूर्वी सर्व समीकरणे खुली झाली आहेत.

सामन्याच्या सुरुवातीलाच मलेशियाने जोरदार प्रतिहल्ला चढवला. भारतीय बचाव फळी गोंधळलेली असतानाच शफिक हसनने पहिल्याच मिनिटात गोल करून मलेशियाला आघाडी मिळवून दिली. हसनने पुन्हा एकदा डाव्या बाजूने भारतीय बचावफळीसाठी अडचणी निर्माण केल्या.

कोरियाविरुद्धच्या सामन्यात विंग्सवरून केलेली आक्रमणे भारतासाठी निष्फळ ठरली होती. दुसर्‍या क्वार्टरची सुरुवात भारताने चांगली केली आणि त्यांना एकामागोमाग एक 5 पेनल्टी कॉर्नर मिळाले. हे सर्व वाचवण्यात आले, पण 16व्या मिनिटाला मनप्रीतने चेंडू नेटमध्ये टाकून गोल केला. एका चांगल्या मुव्हनंतर सुखजीतने 18व्या मिनिटाला गोल केला. 24व्या मिनिटाला ही आघाडी आणखी मजबूत झाली. दिलप्रीतने शिलानंद लाक्राला गोल करण्यासाठी पास दिला.

मलेशियाने दुसर्‍या अर्ध्या भागाची सुरुवात पेनल्टी कॉर्नरने केली, पण कृष्ण पाठकने उत्कृष्ट बचाव करत त्यांना गोल करण्यापासून रोखले. एका पेनल्टी कॉर्नरचा गोलपोस्टला लागून आलेला चेंडू विवेक सागर प्रसादने नेटमध्ये टाकत गोल केला. मनप्रीतने विंगवरून दिलेल्या पासवर विवेकने 38व्या मिनिटाला गोल नोंदवला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT