Asia Cup Hockey | मलेशियाचा कोरियाला दे धक्का; अखिमुल्लाह अन्वरची हॅट्ट्रिक

बांगला देशचा चायनीज तैपेईवर 8-3 ने विजय
Asia Cup Hockey
Asia Cup Hockey | मलेशियाचा कोरियाला दे धक्का; अखिमुल्लाह अन्वरची हॅट्ट्रिकFile Photo
Published on
Updated on

राजगीर (बिहार); वृत्तसंस्था : येथे सुरू असलेल्या आशिया चषक हॉकी स्पर्धेत शनिवारी ‘ब’ गटात एक मोठा उलटफेर पाहायला मिळाला. मलेशियाने शानदार खेळ करत गतविजेत्या कोरियाला 4-1 असा जबरदस्त धक्का दिला. मलेशियाच्या विजयाचा शिल्पकार ठरला तो अखिमुल्लाह अन्वर, ज्याने शानदार हॅट्ट्रिक नोंदवली. दुसर्‍या सामन्यात बांगला देशने चायनीज तैपेईचा 8-3 असा धुव्वा उडवला.

मलेशियाविरुद्धच्या सामन्याच्या सुरुवातीला पाच वेळच्या विजेत्या कोरियाने वर्चस्व निर्माण केले. दुसर्‍याच मिनिटाला जिओनह्यो जिनच्या मैदानी गोलमुळे कोरियाने 1-0 अशी आघाडी घेतली. मात्र, त्यानंतर मलेशियाने जबरदस्त पुनरागमन केले. अखिमुल्लाह अन्वरने (29 व्या, 34 व्या आणि 58 व्या मिनिटाला) तीन गोल करत हॅट्ट्रिक साधली, तर अशरान हमसानीने एक गोल करून संघाचा विजय निश्चित केला.

बांगला देशचा दणदणीत विजय

दिवसातील दुसर्‍या सामन्यात बांगला देशने चायनीज तैपेईचा 8-3 असा धुव्वा उडवला. बांगला देशने सामन्याच्या उत्तरार्धात तब्बल पाच गोल करत आपले वर्चस्व सिद्ध केले. बांगला देशकडून मोहम्मद अब्दुल्ला, रकिबूल हसन आणि अशरफुल इस्लाम यांनी प्रत्येकी दोन गोल केले, तर सोहानूर सोबुज आणि रेझौल बाबू यांनी प्रत्येकी एक गोल केला. चायनीज तैपेईकडून त्सुंग-यू हसिहने दोन, तर त्सुंग-जेन शिहने एक गोल केला.

विजयानंतर भारतासमोर आज जपानचे तगडे आव्हान

आशिया चषक हॉकी स्पर्धेतील सलामीच्या सामन्यात चीनविरुद्ध झालेल्या सुमार कामगिरीला मागे टाकून, भारतीय पुरुष हॉकी संघाला आता जपानच्या धोकादायक आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे. रविवारी होणार्‍या या सामन्यात विजय मिळवण्यासाठी भारताला आपला सर्वोत्तम खेळ दाखवावा लागेल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news