India won by 24 runs
भारताने ऑस्ट्रेलियावर 24 धावांनी विजय मिळवला.  Pudhari File Photo
स्पोर्ट्स

IND Vs AUS : ऑस्ट्रेलियाची नांगी ठेचली; टीम इंडिया सेमी फायनलमध्ये

पुढारी वृत्तसेवा

अँटिग्वा; वृत्तसंस्था : कर्णधार रोहित शर्माने केलेल्या दे दणादण 92 धावा आणि त्यानंतर गोलंदाजांचा भेदक मारा याच्या जोरावर भारताने ऑस्ट्रेलियावर 24 धावांनी विजय मिळवला. या विजयाने भारत टी-20 वर्ल्डकपच्या उपांत्य फेरीत पोहोचला आहे. सुपर-8 फेरीतील या सामन्यात ऑस्ट्रेलिया पराभूत झाल्याने त्यांच्यावर आता वर्ल्डकपमधून बाहेर होण्याची टांगती तलवार आली. आता सुपर-8 फेरीच्या शेवटच्या सामन्यात अफगाणिस्तानने बांगलादेशला हरवले तर ऑस्ट्रेलिया स्पर्धेतून आऊट होईल. उपांत्य फेरीत भारतासमोर इंग्लंडचे आव्हान असणार आहे.

  • मिचेल स्टार्कच्या षटकात कुटलेल्या 29 धावा

  • रोहितने 19 चेंडूंत वेगवान अर्धशतक पूर्ण

  • रोहितची टी-20 वर्ल्ड कपमधील ही भारताकडून दुसरी सर्वोत्तम वैयक्तिक खेळी

  • टी-20 वर्ल्डकपमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध वेगवान अर्धशतकाचा विक्रम रोहितने नावावर

भारताकडून रोहित शर्माने अनेक विक्रमांचा डोंगर पार करीत 92 धावा करून मजबूत धावसंख्येचा पाया घातला. यावर भारताने 5 बाद 205 धावा केल्या. हे आव्हान ऑस्ट्रेलियाला पेलवले नाही. त्यांनी 20 षटकांत 7 बाद 181 धावा केल्या. ट्रॅव्हिस हेडने (76) चांगली झुंज दिली, परंतु अक्षर पटेलने घेतलेल्या अविश्वसनीय झेलने मॅच फिरली. भारताने या विजयासह कसोटी अजिंक्यपद फायनल आणि वन डे वर्ल्ड कप फायनलच्या पराभवाचा वचपा काढला. भारतीय संघ 2007, 2014, 2016, 2022 व 2024 असे पाचवेळा ट्वेंटी-20 वर्ल्ड कपच्या सेमी फायनलमध्ये पोहोचला आहे.

हेड, मार्श जोडीचा झंझावात

सोमवारच्या सामन्यात भारताच्या द्विशतकी आव्हानाचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाचा डेव्हिड वॉर्नर (6) पहिल्याच षटकांत बाद झाला. अर्शदीपच्या गोलंदाजीवर सूर्यकुमारने स्लीपमध्ये त्याचा झेल घेतला, पण याचा ऑस्ट्रेलियाच्या ट्रॅव्हिस हेड आणि मिचेल मार्श यांच्यावर परिणाम झाला नाही. त्यांनी पॉवर प्लेमध्ये 65 धावा चोपल्या. हेड, मार्श जोडीचा झंझावात थांबत नव्हता त्यामुळे भारताच्या गोटात चिंता वाढली होती. शेवटी कुलदीप यादवने ही जोडी फोडली. त्याने मार्शला अक्षर पटेलकडे झेल देण्यास भाग पाडले. अक्षरने मिडविकेट सीमारेषेवर अफलातून झेल घेतला. मार्शने 37 धावा केल्या.

मार्श गेला तरी हेड थांबत नव्हता, त्याने प्रत्येक गोलंदाजावर प्रहार केला. त्यामुळे धावगती दहाच्या खाली येत नव्हती. त्याने 24 चेेंडूंत अर्धशतक गाठले. मार्शच्या जागी आलेला मॅक्सवेलही हात धुवून घेत होता. शेवटी ही जोडीपण कुलदीपनेच फोडली. त्याने मॅक्सवेलचा (19) त्रिफळा उडवला. यानंतर आलेल्या मार्कस स्टोईनिसला (2) अक्षर पटेलने स्थिरावू दिले नाही. एकीकडे विकेट पडत असल्या तरी हेड मात्र हेडेक देत होता. शेवटी हे वादळ थोपवण्यासाठी रोहितचे बुमरास्त्र उपयोगी आले. बुमराहचा स्लोअर ऑफकटर हेडला समजला नाही, त्याचा फटका चुकला आणि उंच उडालेला झेल कव्हरवरील रोहित शर्माने आरामात टिपला. हेडने 43 चेंडूंत 76 धावा करताना 9 चौकार आणि 4 षटकार ठोकले. यानंतर अर्शदीपसिंगने मॅथ्यू वेडला बाद केले. कुलदीप यादवने हा जमिनीलगत झेपावत उत्कृष्ट झेल टीपला. टीम डेव्हिडला (15) अर्शदीपने बाद केले. यानंतर भारताच्या विजयाची औपचारिकता उरली. ऑस्ट्रेलियाला 20 षटकांत 7 बाद 181 धावा करता आल्या.

ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून गोलंदाची निर्णय

अँटिग्वाच्या मैदानात पावसाळी वातावरणात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून भारताला फलंदाजी दिली. वन डे वर्ल्डकप फायनलचा सर्व राग रोहितने ऑस्ट्रेलियन गोलंदाजांवर काढला. विराट कोहली शून्यावर बाद झाल्यानंतर रोहितने अचानक गिअर बदलला आणि मिचेल स्टार्कच्या एका षटकात 29 धावा कुटल्या. दरम्यान, ऋषभ पंतही (15) मोठा फटका मारण्याच्या नादात बाद झाला. ज्या स्टार्कला रोहितने धुतले होते, त्यानेच हिटमॅनची विकेट घेतली. रोहित 41 चेंडूंत 7 चौकार व 8 षटकारांसह 92 धावांवर त्रिफळाचीत झाला. शिवम दुबे व सूर्या यांनी धावगती वाढवण्याची जबाबदारी पार पाडली. या दोघांची 19 चेंडूंत 32 धावांची भागीदारी स्टार्कने तोडली. सूर्या 16 चेंडूंत 3 चौकार व 2 षटकारांसह 31 धावांवर झेलबाद झाला.

मिचेल मार्शने 4 धावांवर हार्दिक पंड्याचा सोपा झेल टाकला. 15 षटकांत भारताच्या 4 बाद 162 धावा होत्या आणि शेवटच्या 5 षटकांत हार्दिक व शिवम यांनी अपेक्षित फटकेबाजी केली. शिवम 22 चेंडूंत 28 धावांवर झेलबाद झाला. हार्दिकने 17 चेंडूंत 27 धावा चोपल्या आणि भारताने 5 बाद 205 धावा केल्या. भारताने शेवटच्या 5 षटकांत 43 धावा केल्या.

SCROLL FOR NEXT