स्पोर्ट्स

IND vs AUS ODI : भारतीय महिलांनी ऑस्ट्रेलियाला लोळवले! थरारक विजयासह मालिकेवर कब्जा

मालिकेतील पहिला सामना जिंकल्यानंतर, दुसऱ्या सामन्यातही भारतीय संघाने उत्कृष्ट कामगिरी करत दोन गडी राखून विजयश्री खेचून आणली.

रणजित गायकवाड

ठळक मुद्दे :

  • भारतीय महिला 'अ' संघांचा ऑस्ट्रेलियावर सलग दुसरा विजय.

  • अत्यंत चुरशीच्या झालेल्या सामन्यात एक चेंडू, दोन गडी राखून विजय.

  • भारताची तीन सामन्यांच्या मालिकेत २-० अशी विजयी आघाडी.

भारतीय महिला 'अ' संघाने ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आपली विजयी घोडदौड कायम ठेवली आहे. ऑस्ट्रेलिया महिला 'अ' संघाविरुद्धच्या दुसऱ्या वनडे सामन्यात भारताने अत्यंत रोमहर्षक विजय मिळवला. या विजयासह भारताने तीन सामन्यांच्या मालिकेवरही आपले वर्चस्व प्रस्थापित केले आहे. मालिकेतील पहिला सामना जिंकल्यानंतर, दुसऱ्या सामन्यातही भारतीय संघाने उत्कृष्ट कामगिरी करत दोन गडी राखून विजयश्री खेचून आणली. भारताने विजयासाठीचे लक्ष्य सामन्यातील केवळ एक चेंडू शिल्लक असताना पूर्ण केले.

एलिसा हिलीची धडाकेबाज खेळी, शतक हुकले

सध्या भारतीय महिला 'अ' संघ ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर असून, तेथे तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळवली जात आहे. मालिकेतील पहिला सामना जिंकून भारताने आधीच आघाडी घेतली होती. आता दुसरा सामनाही जिंकल्याने भारताने मालिका आपल्या नावे केली आहे.

या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियन 'अ' संघाने निर्धारित ५० षटकांत ९ गडी गमावून २६५ धावा केल्या. त्यामुळे भारतीय संघासमोर विजयासाठी २६६ धावांचे मोठे लक्ष्य होते. ऑस्ट्रेलियाच्या या मोठ्या धावसंख्येत यष्टीरक्षक फलंदाज एलिसा हिलीचे विशेष योगदान राहिले. तिने ८७ चेंडूंमध्ये ९१ धावांची महत्वपूर्ण खेळी साकारली. तिचे शतक अवघ्या नऊ धावांनी हुकले असले तरी, संघाला एक मोठी धावसंख्या उभारून देण्यात तिने मोलाचा वाटा उचलला.

शेफाली वर्मा स्वस्तात परतली

या मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करताना भारतीय संघाची सुरुवात निराशाजनक झाली. स्फोटक सलामीवीर शेफाली वर्मा अवघ्या चार धावांवर बाद झाली. त्यानंतर आलेली धारा गुर्जर खाते न उघडताच तंबूत परतल्याने संघाला मोठा धक्का बसला. मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करताना सुरुवातीलाच दोन प्रमुख गडी गमावल्याने भारतीय संघासाठी विजय कठीण वाटू लागला होता.

यस्तिका भाटियाने सांभाळली एक बाजू

अशा कठीण परिस्थितीत, यस्तिका भाटियाने एक बाजू लावून धरली आणि संघाचा डाव सावरला. तिने ७१ चेंडूंमध्ये ६६ धावांची मोलाची खेळी केली. त्यानंतर सहाव्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आलेल्या कर्णधार राधा यादवने तर अप्रतिम कामगिरी केली. तिने ७८ चेंडूंमध्ये ६० धावांची शानदार खेळी साकारली. सामना भारताच्या हातून निसटत असताना राधाच्या फलंदाजीनेच विजयाच्या आशा पल्लवित ठेवल्या.

याशिवाय, भारताच्या विजयात तनुजा कंवरचे योगदानही महत्त्वपूर्ण ठरले. तिने ५७ चेंडूंमध्ये ५० धावांची उत्कृष्ट खेळी करत संघाला विजयाच्या उंबरठ्यावर आणून ठेवले. तर, अखेरच्या षटकांमध्ये प्रेरणा रावतने ३३ चेंडूंमध्ये ३२ धावांचे मोलाचे योगदान दिले आणि ती शेवटपर्यंत नाबाद राहिली, ज्यामुळे भारताचा विजय निश्चित झाला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT