स्पोर्ट्स

IND va AUS Test : टीम इंडिया पराभवाच्या छायेतून थेट विजयाच्या उंबरठ्यावर! ऑस्ट्रेलियाची अवस्था बिकट

भारतासाठी राघवी बिष्टने ९३ धावांची महत्त्वपूर्ण खेळी साकारली.

रणजित गायकवाड

india a women vs australia a women test match

भारतीय महिला 'अ' संघ आणि ऑस्ट्रेलियन महिला 'अ' संघ यांच्यात सुरू असलेला कसोटी सामना अत्यंत रोमांचक स्थितीत पोहोचला आहे. भारताने आता सामन्यावर आपली पकड मजबूत करण्यास सुरुवात केली असून, कांगारू संघ काहीसा पिछाडीवर असल्याचे चित्र आहे. पहिल्या दिवशी भारतीय संघ दबावाखाली होता, तशीच काहीशी अवस्था दुसऱ्या दिवसाचा खेळ संपताना ऑस्ट्रेलिया संघाची झाली. दुसऱ्या दिवशी भारताने जोरदार पुनरागमन करत ऑस्ट्रेलियाला बॅकफूटवर ढकलले.

भारताच्या पहिल्या डावात २९९ धावा

भारतीय महिला 'अ' संघ सध्या ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर आहे. या दौऱ्यात सुरुवातीला टी-२० मालिका, त्यानंतर वनडे मालिका खेळवण्यात आली आणि आता अखेरीस कसोटी सामना खेळवला जात आहे. विशेष म्हणजे, हा कसोटी सामना पाच दिवसांचा नसून, केवळ चार दिवसांचा आहे. पहिल्या दिवशी भारतीय संघ फलंदाजीसाठी मैदानात उतरला, परंतु १०० धावा होण्यापूर्वीच संघाचे पाच गडी बाद झाले. मात्र, दुसऱ्या दिवशी भारतीय संघाने उत्कृष्ट खेळ करत आपली धावसंख्या २९९ पर्यंत पोहोचवली.

राघवी बिष्टची ९३ धावांची शानदार खेळी

भारतासाठी राघवी बिष्टने ९३ धावांची महत्त्वपूर्ण खेळी साकारली. या खेळीदरम्यान तिने १६ चौकार लगावले. तिचे शतक हुकले असले तरी, तिने संघाला मजबूत स्थितीत पोहोचवण्याचे महत्त्वपूर्ण काम केले. इतकेच नव्हे तर, खालच्या फळीतील व्ही. जे. जोशीताने ५१ धावांचे योगदान दिले. यामुळेच भारतीय संघाला जवळपास ३०० धावांचा टप्पा गाठता आला. एका क्षणी २०० धावांचा आकडाही मोठा वाटत होता, परंतु टीम इंडियाच्या महिला खेळाडूंनी कमालीची झुंजार वृत्ती दाखवत एक सन्मानजनक धावसंख्या उभारली आहे.

पुढील दोन दिवस ठरणार अत्यंत रोमांचक

यानंतर फलंदाजीसाठी उतरलेला ऑस्ट्रेलियन संघ बॅकफूटवर गेला आहे. दुसऱ्या दिवसाचा खेळ थांबला तेव्हा, ऑस्ट्रेलिया संघाने १५८ धावांवर आपले पाच गडी गमावले होते. भारतातर्फे कर्णधार राधा यादव आणि सायमा ठाकूर यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले, तर तितास साधूने एक बळी मिळवला.

ऑस्ट्रेलियन संघ अजूनही भारताच्या धावसंख्येपेक्षा १४१ धावांनी पिछाडीवर आहे आणि सामन्याचे दोन दिवस शिल्लक आहेत. ऑस्ट्रेलियाचा डाव लवकरात लवकर गुंडाळून पहिल्या डावात आघाडी घेण्याचा भारतीय संघाचा प्रयत्न असेल. ही आघाडी दुसऱ्या डावात अत्यंत उपयुक्त ठरू शकते. त्यामुळे, सामन्याचे उर्वरित दोन दिवस अत्यंत महत्त्वपूर्ण आणि रोमांचक ठरण्याची शक्यता आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT