विशाखापट्टणम : पहिल्या सामन्यात मिळवलेल्या दणदणीत विजयानंतर, भारतीय महिला क्रिकेट संघ आज (मंगळवार दि. 23) श्रीलंकेविरुद्ध होणाऱ्या दुसऱ्या टी-20 सामन्यात पुन्हा एकदा वर्चस्व गाजवत आघाडी मजबूत करण्यावर भर देईल. मागील लढतीतील अनुभव पाहता, भारताला येथे क्षेत्ररक्षणाच्या आघाड्यावर व्यापक सुधारण्ाा करणे आवश्यक असेल. या लढतीला सायंकाळी 7 वाजता सुरुवात होईल.
गेल्या महिन्यात ऐतिहासिक विश्वचषक जिंकल्यानंतर आपला पहिलाच आंतरराष्ट्रीय सामना खेळणाऱ्या हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने या मालिकेतील पहिल्या सामन्यात 8 गड्यांनी विजय मिळवला. फलंदाजी आणि गोलंदाजीच्या जोरावर श्रीलंकेला 121 धावांत रोखण्यात भारताला यश आले आणि त्यानंतर हा धावांचा पाठलागही भारताने सहज केला. असे असले, तरी क्षेत्ररक्षणातील त्रुटी, विशेषतः सुटलेले झेल चिंतेचा विषय ठरले आहेत.
विश्वचषक विजयानंतर भारतीय संघाला सहा आठवड्यांची विश्रांती मिळाली होती. त्यानंतर खेळाडूंनी बंगळूरमधील ‘सेंटर ऑफ एक्सलन्स’मध्ये आठवडाभराच्या सराव शिबिरात सहभाग घेतला. कागदावरील संघ पाहता चमरी अटापट्टूच्या नेतृत्वाखालील श्रीलंकन संघाविरुद्ध भारतीय संघाचे पारडे जड मानले जात आहे. विश्वचषकातील फॉर्म कायम राखत जेमिमा रॉड्रिग्सने पहिल्या सामन्यात उत्कृष्ट फलंदाजी केली. तिने लंकेची फिरकी गोलंदाज शशीनी गिमहानीविरुद्ध 6 चौकारही वसूल केले होते.
भारतासाठी या मालिकेतील सर्वात मोठी जमेची बाजू म्हणजे 20 वर्षीय डावखुरी फिरकी गोलंदाज वैष्णवी शर्मा. डब्ल्यूपीएल लिलावात दुर्लक्षित राहिलेल्या वैष्णवीने पहिल्या सामन्यात विकेट मिळवली नसली, तरी अत्यंत किफायतशीर गोलंदाजी करत केवळ 16 धावा दिल्या आणि एकही चौकार जाऊ दिला नाही. दुसरीकडे, सलामीवीर शफाली वर्माचा आपल्या शैलीला साजेशा या प्रकारात सातत्य राखण्याचा प्रयत्न असेल. आगामी ऑस्ट्रेलिया दौऱ्यापूर्वी रॉड्रिग्स, हरमनप्रीत आणि दीप्ती शर्मा यांसारख्या अनुभवी खेळाडूंना या मालिकेत उत्तम सराव करून घेता येईल.
भारत : हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मानधना (उपकर्णधार), दीप्ती शर्मा, स्नेह राणा, जेमिमा रॉड्रिग्स, शफाली वर्मा, हरलीन देओल, अमनजोत कौर, अरुंधती रेड्डी, क्रांती गौड, रेणुका सिंग ठाकूर, रिचा घोष (यष्टिरक्षक), जी. कमलिनी (यष्टिरक्षक), श्री चरणी, वैष्णवी शर्मा.
श्रीलंका : चमरी अटापट्टू (कर्णधार), हसिनी परेरा, विश्मी गुणरत्ने, हर्षिता समरविक्रमा, निलाक्षिका डी सिल्वा, कविशा दिलहारी, इमेशा दुलानी, कौशिनी नुथ्यंगना, माल्शा शहानी, इनोका रणवीरा, शशिनी गिमहानी, निमेशा मदुशनी, काव्या कविंदी, रश्मिका सेवांडी, मल्की मदारा.
आम्ही आमच्या क्षेत्ररक्षणावर काम करत आहोत. झेल का सुटत आहेत, हे समजत नाही. मैदानात ओलावा असला, तरी ते निमित्त होऊ शकत नाही. यावर आम्हाला गांभीर्याने विचार करण्याची गरज असून, पुढच्या सामन्यात आम्ही अधिक चांगल्या रणनीतीसह मैदानात उतरू.-कर्णधार हरमनप्रीत कौर
हेड टू हेड : 26
भारत विजयी : 20
श्रीलंका विजयी : 5
निकाल नाही : 1