स्पोर्ट्स

Jemimah Rodrigues ODI Century : जेमिमा रॉड्रिग्जचा झंझावात! द. आफ्रिकेच्या गोलंदाजांना फोडले, भारतासाठी ठोकले तिसरे वेगवान शतक

द. आफ्रिकेविरुद्ध वेगवान शतक झळकावून जेमिमा रॉड्रिग्जने इतिहास रचला. तिचे हे वनडे करियरमधील दुसरे शतक आहे.

रणजित गायकवाड

jemimah rodrigues third fastest odi century for team india

कोलंबो : भारतीय महिला क्रिकेटचा नाजूक पण धारदार चेहरा असलेल्या जेमिमा रॉड्रिग्जने तिच्या बॅटमधून धावांचा पाऊस पाडत नवा इतिहास रचला. बुधवारी (दि. 7) दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात तिने फटकेबाजीची झंझावाती झलक दाखवत तिसऱ्या क्रमांकाचे सर्वात जलद शतक ठोकले.

भारतीय महिला संघ सध्या श्रीलंकेत वनडे तिरंगी मालिका खेळत आहे. यामध्ये यजमान संघाव्यतिरिक्त द. आफ्रिकेचा संघ आहे. दरम्यान, 7 मे रोजी भारताचा सामना द. आफ्रिकेशी झाला. या सामन्यात भारताकडून जेमिमा रॉड्रिग्जने शानदार फलंदाजी केली आणि झंझावाती शतक झळकावले. तिने 89 चेंडूत 15 चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने शतक पूर्ण केले, जे भारतासाठी एकदिवसीय सामन्यांमध्ये कोणत्याही महिला फलंदाजाने केलेले तिसरे सर्वात जलद शतक ठरले आहे. जेमिमाच्या 101 चेंडूत 123 धावांच्या खेळीमुळे भारताने निर्धारित 50 षटकांत 9 गडी गमावून 337 धावा फटकावल्या.

जेमिमाचा कहर

जेमिमाने सामना रंगात आणताना फक्त फटकेबाजी केली नाही, तर प्रेक्षकांच्या श्वासांचाही वेग वाढवला. तिने केवळ 89 चेंडूंमध्ये शतक पूर्ण केले. या खेळीसह तिने भारतीय क्रिकेट इतिहासात नवा विक्रम नोंदवला. तिच्या या खेळीमुळे दक्षिण आफ्रिकेवर जबरदस्त दडपण आलं आणि भारताने सहजपणे सामन्यावर पकड मिळवली.

विक्रम

भारताकडून महिला क्रिकेटमध्ये सर्वात जलद शतक ठोकण्याचा विक्रम स्मृती मानधनाच्या नावावर आहे. या वर्षी तिने आयर्लंडविरुद्ध 70 चेंडूत शतक पूर्ण केले होते. दुसरे सर्वात जलद शतक ठोकण्याचा पराक्रम हरमनप्रीत कौरने केला आहे. तिने 2024 मध्ये द. आफ्रिकेविरुद्ध 87 चेंडूत शतक झळकावले. आता या यादीत जेमिमा रॉड्रिग्जचा समावेश झाला आहे.

भारतासाठी महिला क्रिकेटमधील सर्वात जलद वनडे शतक

  • 70 चेंडू : स्मृती मानधना विरुद्ध आयर्लंड (2025)

  • 87 चेंडू : हरमनप्रीत कौर विरुद्ध दक्षिण आफ्रिका (2024)

  • 89 चेंडू : जेमिमा रॉड्रिग्ज विरुद्ध दक्षिण आफ्रिका (2025)

  • 90 चेंडू : हरमनप्रीत कौर विरुद्ध ऑस्ट्रेलिया (2017)

  • 90 चेंडू : जेमिमा रॉड्रिग्ज विरुद्ध आयर्लंड (2025)

यासह, जेमिमा द. आफ्रिकेविरुद्ध एकदिवसीय सामन्यात मोठी एकदिवसीय खेळी करणारी दुसरी महिला फलंदाज बनली आहे. या यादीत स्मृती मानधना टॉपवर आहे. तिने 2018 मध्ये किम्बर्ली येथे 136 धावांची खेळी साकारली होती.

शतक कधी झालं, कसं झालं याकडे माझे लक्षच नव्हतं. मी फक्त माझ्या संघासाठी खेळत होते. यादरम्यान प्रत्येक चेंडूचा आनंद घेत होते.
जेमिमा रॉड्रिग्ज

कौतुकाचा वर्षाव

तिच्या खेळीवर संपूर्ण क्रिकेट जगतातून कौतुकाचा वर्षाव होत आहे. माजी खेळाडू, समालोचक आणि चाहत्यांनी सोशल मीडियावर जेमिमावर स्तुतिसुमने उधळली आहेत. तिच्या बॅटने पुन्हा सिद्ध केलं की, ती भारतीय महिला संघाच्या भविष्यातली अत्यंत महत्त्वाची फलंदाज आहे. या शतकासह जेमिमाने केवळ सामना जिंकवला नाही, तर तिच्या नावावर एक ऐतिहासिक कामगिरी कोरली आहे. तिची ही खेळी भारताच्या आगामी मोहिमांसाठी आत्मविश्वासाचे बळ देणारी ठरेल, यात शंका नाही.

जेमिमा ही महिलांच्या एकदिवसीय क्रिकेटमध्ये 100 धावांचा टप्पा गाठणारी सातवी भारतीय फलंदाज ठरली आहे.

  • स्मृती मानधना : 10 शतके

  • मिताली राज : 7 शतके

  • हरमनप्रीत कौर : 6 शतके

  • पूनम राऊत : 3 शतके

  • जया शर्मा : 2 शतके

  • जेमिमा रॉड्रिग्स : 2 शतके

  • तिरुश कामिनी : 2 शतके

दीप्ती आणि मानधनानेही झळकावले अर्धशतक

या सामन्यात, प्रथम फलंदाजी करताना भारतीय महिला संघाने 50 षटकांत 9 गडी गमावून 337 धावा केल्या. जेमिमा रॉड्रिग्ज व्यतिरिक्त दीप्ती शर्माने 84 चेंडूत 93 धावा केल्या. तर सलामीवीर स्मृती मानधनानेही (51) शानदार अर्धशतक फटकावले. मानधनाने रॉड्रिग्जसोबत 88 धावांची भागीदारी केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT