रोसेयो (डॉमिनिका); वृत्तसंस्था : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील पहिला कसोटी सामना यशस्वी जैस्वालने चांगलाच गाजवला. त्याने भारतासाठी कसोटी पदार्पण करताना शतक झळकावले. पदार्पणात शतक करणारा तो सतरावा भारतीय फलंदाज ठरला आहे. त्याच्यासोबत रोहित शर्मानेही शतकी खेळी करून आपणही फॉर्मात परतल्याचे दाखवून दिले. या दोघांच्या शतकांच्या जोरावर भारताने मजबूत स्थिती प्राप्त केली असून चहापानाला खेळ थांबला तेव्हा भारताच्या 2 बाद 245 धावा झाल्या होत्या. भारताकडे यावेळी 95 धावांची आघाडी होती. यशस्वी जैस्वाल 116 धावांवर तर विराट कोहली 4 धावांवर खेळत होता. रोहित शर्मा 103 धावा करून बाद झाला. त्याने कसोटीतील दहावे शतक झळकावले. शुभमन गिलने निराशा केली. तो 6 धावांवर बाद झाला. (IND vs WI)
भारताने पहिल्याच दिवशी सामन्यावर पूर्णपणे आपले वर्चस्व राखले होते. रविचंद्रन अश्विनच्या नेतृत्वाखालील गोलंदाजांनी केलेल्या प्रभावी कामगिरीमुळे भारताने दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिल्या डावात वेस्ट इंडिजला 150 धावांत गुंडाळले.
वेस्ट इंडिजने प्रथम नाणेफेक जिंकत फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, पण हा निर्णय काही संघाच्या पथ्यावर पडला नाही आणि संघ अगदी थोडक्यात ऑलआऊट झाला. त्यानंतर भारताने दिवसअखेरीस नाबाद 80 धावा केल्या होत्या. त्यानंतर दुसर्या दिवशी म्हणजे गुरुवारी सकाळीही ही भागीदारी फुलली. उपहाराला खेळ थांबला तेव्हा भारताच्या बिनबाद 146 धावा झाल्या होत्या. रोहित 68 आणि यशस्वी जैस्वाल 62 धावांवर खेळत होते. वेस्ट इंडिजकडून पदार्पण करणारा अॅलिक अथानागेच भारतीय गोलंदाजांसमोर टिकू शकला. मात्र, त्याचे अर्धशतक हुकले. 47 धावा करून तो डावातील अश्विनचा चौथा बळी ठरला. अश्विनने दिवसाच्या सुरुवातीच्या सत्रात तेजनारायण चंद्रपॉल (12) आणि कर्णधार क्रेग ब्रेथवेट (20) यांना बाद केले, तर तिसरा वेगवान गोलंदाज म्हणून खेळत असलेल्या शार्दूल ठाकूरने (15 धावांत एक विकेट) रॅमन रेफरला यष्टिरक्षक इशान किशनकडून झेलबाद केले. तर लंच ब्रेकच्या आधी जडेजाने जर्मेन ब्लॅकवूडला (14) बाद केले. (IND vs WI)
दुसर्या सत्राच्या चौथ्या षटकात जडेजाने जोशुआ डॅसिल्वा (2) याला आर्म बॉल कट टाकला आणि चेंडू बॅटच्या बाहेरील कड घेऊन किशनच्या ग्लोव्हजमध्ये गेला. यानंतर अथानागेला अनुभवी जेसन होल्डरने चांगली साथ दिली. एका टोकाला साथीदार भक्कम उभा राहिल्यानंतर अथानागेचा आत्मविश्वास वाढला आणि त्याने जडेजा आणि अश्विनविरुद्ध शानदार चौकार मारले. या डावखुर्या फलंदाजाने अश्विनविरुद्धही षटकार ठोकला. या दोघांमध्ये सहाव्या विकेटसाठी 108 चेंडूंत 41 धावांची भागीदारी सिराजने मोडली. सिराजच्या बाऊन्सरला षटकार मारण्याच्या प्रयत्नात स्क्वेअर लेग बाऊंड्रीजवळ शार्दूलने होल्डरला झेलबाद केले. अश्विनने अल्झारी जोसेफला (चार) बाद करून आंतरराष्ट्रीय सामन्यात त्याच्या विकेटस्ची संख्या 700 वर नेली आणि नंतर अथानागेची चांगली खेळी संपवली. दिवसाच्या शेवटच्या सत्रात जडेजाने केमार रोचला (एक) तर अश्विनने जोमेल वॅरिकनला (एक) बाद करून वेस्ट इंडिजच्या डावावर शिक्कामोर्तब केले. रहकीम कॉर्नवॉल 19 धावांवर नाबाद राहिला. (IND vs WI)
177 – रोहित शर्मा, कोलकाता (2013)
134 – पृथ्वी शॉ, राजकोट (2018)
100 – यशस्वी जैस्वाल रोसेयू (2023)
भारतासाठी पदार्पणात शतक करणारे युवा फलंदाज
18 वर्षे 329 दिवस : पृथ्वी शॉ (2018)
20 वर्षे 126 दिवस : अब्बास अली बेग (1959)
20 वर्षे 276 दिवस : गुंडाप्पा विश्वनाथ (1969)
21 वर्षे 196 दिवस : यशस्वी जैस्वाल (2023)
21 वर्षे 327 दिवस : मो. अझरुद्दिन (1984)
भारताकडून पदार्पणात पहिले कसोटी शतक हे लाला अमरनाथ यांनी 1955 साली झळकावले होते. त्यानंतर यशस्वी हा पदार्पणात शतक झळकावणारा 17 वा खेळाडू ठरला आहे.
हेही वाचा :