अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर वेस्टइंडीजविरुद्ध खेळल्या जात असलेल्या पहिल्या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी भारतीय गोलंदाजांनी आपले वर्चस्व सिद्ध केले. मोहम्मद सिराजच्या नेतृत्वाखालील भारतीय गोलंदाजांनी वेस्टइंडीजला पहिल्या डावात मोठी धावसंख्या उभारण्यापासून रोखले. प्रथम फलंदाजी करताना वेस्टइंडीजने पहिल्या डावात १६२ धावा केल्या. दिवसाचा खेळ संपेपर्यंत भारताने पहिल्या डावात दोन गडी गमावून १२१ धावा केल्या असून, ते सध्या वेस्टइंडीजपेक्षा ४१ धावांनी पिछाडीवर आहेत. दिवसाखेर के.एल. राहुल ५३ धावांवर आणि शुभमन गिल १८ धावांवर नाबाद तंबूत परतले. वेस्टइंडीजकडून जेडन सील्स आणि रोस्टन चेस यांना प्रत्येकी एक यश मिळाले.
वेस्टइंडीजचा डाव लवकर संपवल्यानंतर यशस्वी जैस्वाल आणि के.एल. राहुल या सलामी जोडीने भारताला चांगली सुरुवात करून दिली. दोघांनी पहिल्या विकेटसाठी ६८ धावांची भागीदारी केली. सील्सने यशस्वीला बाद करत भारताला पहिला धक्का दिला. यशस्वीने ५४ चेंडूंमध्ये सात चौकारांच्या मदतीने ३६ धावा केल्या. जेडन सील्सच्या गोलंदाजीवर यशस्वी जैस्वालचा झेल यष्टीरक्षक शाई होप याने घेतला. त्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीस आलेला साई सुदर्शन सात धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. ९० धावांवर भारताला दुसरा धक्का बसला. कर्णधार रोस्टन चेसने साई सुदर्शनला पायचीत केले.
दोन गडी झटपट बाद झाल्यानंतर केएल राहुलने कर्णधार शुभमन गिलच्या साथीने संघाचा डाव सावरला. या दरम्यान राहुलने आपले अर्धशतकही पूर्ण केले. गिल आणि राहुल यांनी दिवसाचा खेळ संपेपर्यंत भारताला आणखी कोणताही धक्का बसू दिला नाही. या दोघांमध्ये तिसऱ्या विकेटसाठी आतापर्यंत ३१ धावांची भागीदारी झाली आहे. भारतीय संघाचे लक्ष्य आता दुसऱ्या दिवशी वेस्टइंडीजविरुद्ध मोठी आघाडी घेण्यावर केंद्रित असेल.
कसोटीचा पहिला दिवस भारतीय गोलंदाजांनी गाजवला. वेगवान गोलंदाजांनी मिळून वेस्ट इंडिजचे सात बळी घेतले, तर फिरकी गोलंदाजांना तीन विकेट्स मिळाल्या. भारतीय संघ या सामन्यात तीन फिरकी, दोन वेगवान आणि एक अष्टपैलू खेळाडू घेऊन मैदानात उतरला आहे. रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर आणि कुलदीप यादव हे तीन फिरकी गोलंदाज आहेत. तर बुमराह आणि सिराज हे वेगवान गोलंदाज आहेत. नितीशकुमार रेड्डी याचा अष्टपैलू म्हणून समावेश आहे. पहिल्या डावात ही रणनीती योग्य ठरली आहे.
वेस्टइंडीजचा पहिला डाव १६२ धावांत संपुष्टात आला. टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या विंडीजकडून जस्टिन ग्रीव्सने सर्वाधिक ३२ धावा केल्या. संघाचा डाव साडेचार तासांच्या आतच संपुष्टात आला. भारताकडून मोहम्मद सिराजने चार आणि जसप्रीत बुमराहने तीन बळी घेतले. याव्यतिरिक्त कुलदीप यादवला दोन आणि वॉशिंग्टन सुंदरला एक बळी मिळाला. याचमुळे पंचांनी वेळेपूर्वीच चहापानाची घोषणा केली.
वेस्टइंडीज संघाची सुरुवात खराब झाली. संघाने पहिल्या तासातच ४२ धावांत चार गडी गमावले होते. सिराजने तेजनारायण चंद्रपॉल (०), ब्रँडन किंग (१२) आणि एलिक एथनाझे (१३) यांना पॅव्हेलियनमध्ये पाठवले. तर, बुमराहने जॉन कॅम्पबेलला (८) बाद केले. त्यानंतर कर्णधार रोस्टन चेस आणि शाई होप यांनी पाचव्या विकेटसाठी ४८ धावांची भर घातली. होपला कुलदीप यादवने क्लीन बोल्ड केले आणि त्याच्या विकेटसह पंचांनी लंचची घोषणा केली. होपने २६ धावा केल्या.
दुसऱ्या सत्रात वेस्टइंडीजचा कर्णधार रोस्टन चेस २४ धावा काढून सिराजचा बळी ठरला. त्यानंतर सुंदरने खेरी पियरेला (११) पायचीत बाद केले. यानंतर बुमराहने दोन घातक यॉर्करवर जस्टिन ग्रीव्स (३२) आणि जोहान लेन (१) यांना क्लीन बोल्ड केले. अखेरीस, कुलदीपने वॉरिकाला (८) यष्टीरक्षक जुरेलकरवी झेलबाद करून वेस्टइंडीजचा डाव १६२ धावांवर गारद केला.