स्पोर्ट्स

IND vs SL : अवघे २ बळी आणि मोठा पराक्रम! श्रीलंकेविरुद्ध मैदानात उतरताच जडेजा रचणार इतिहास, चक्क वीरेंद्र सेहवागला टाकणार मागे

Ravindra Jadeja IND vs SL Test Series : जडेजा शतकाच्या उंबरठ्यावर?

रणजित गायकवाड

मुंबई : भारतीय क्रिकेट संघ सध्या श्रीलंका दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर जोरदार तयारीत व्यस्त आहे. येत्या १५ ऑगस्टपासून भारत आणि यजमान श्रीलंका यांच्यात दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेला सुरुवात होत आहे. या मालिकेत मैदानात उतरताच भारताचा स्टार अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजा माजी स्फोटक फलंदाज वीरेंद्र सेहवागच्या एका खास विक्रमाची बरोबरी करेल.

२००९ मध्ये आंतरराष्ट्रीय पदार्पण केल्यापासून जडेजाने आतापर्यंत तिन्ही प्रकारांत (फॉरमॅट) मिळून एकूण ३७३ आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात अंतिम ११ खेळाडूंमध्ये स्थान मिळवताच, तो भारताकडून सर्वाधिक आंतरराष्ट्रीय सामने खेळणाऱ्या खेळाडूंच्या यादीत वीरेंद्र सेहवागची (३७४ सामने) बरोबरी करेल. सेहवागने १९९९ ते २०१३ या काळात ३७४ सामने खेळले होते.

सर्वाधिक आंतरराष्ट्रीय सामने खेळणारे भारतीय खेळाडू

  • सचिन तेंडुलकर : ६६४ सामने

  • विराट कोहली : ५६२ सामने

  • एमएस धोनी : ५३८ सामने

  • रोहित शर्मा : ५१४ सामने

  • राहुल द्रविड : ५०९ सामने

  • मोहम्मद अझरुद्दीन : ४३३ सामने

  • अनिल कुंबळे : ४०३ सामने

  • युवराज सिंग : ४०२ सामने

  • वीरेंद्र सेहवाग : ३७४ सामने

  • रवींद्र जडेजा : ३७३ सामने

३५० कसोटी बळींचा टप्पा गाठण्याची सुवर्णसंधी

केवळ सामन्यांची संख्याच नव्हे, तर या मालिकेत जडेेजाच्या नजरा एका मोठ्या गोलंदाजी विक्रमावरही असतील. श्रीलंकेविरुद्ध अवघे २ बळी मिळवताच जडेजा कसोटी क्रिकेटमध्ये ३५० बळींचा टप्पा पूर्ण करेल. अशी कामगिरी करणारा तो भारताचा केवळ पाचवा गोलंदाज ठरेल. आतापर्यंत अनिल कुंबळे, रविचंद्रन अश्विन, कपिल देव आणि हरभजन सिंग या दिग्गज खेळाडूंनाच हा पराक्रम करता आला आहे. विशेष म्हणजे, या अभिजात क्लबमध्ये स्थान मिळवणारे कपिल देव हे एकमेव वेगवान गोलंदाज आहेत.

कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक बळी घेणारे भारतीय गोलंदाज

  • अनिल कुंबळे: ६१९ बळी

  • रविचंद्रन अश्विन: ५३७ बळी

  • कपिल देव: ४३४ बळी

  • हरभजन सिंग: ४१७ बळी

  • रवींद्र जडेजा: ३४८ बळी

१०० कसोटी सामन्यांच्या उंबरठ्यावर जडेजा

३७ वर्षीय रवींद्र जडेजाने आतापर्यंत खेळलेल्या ८९ कसोटी सामन्यांच्या १३३ डावांमध्ये ४०९६ धावा केल्या आहेत, तर १६७ डावांमध्ये गोलंदाजी करताना ३४८ फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवला आहे. आगामी काळात भारतासाठी १०० कसोटी सामने खेळून ऐतिहासिक टप्पा गाठण्याची नामी संधी जडेजाकडे आहे. आतापर्यंत फक्त १४ भारतीय खेळाडूंनाच १०० किंवा त्याहून अधिक कसोटी सामने खेळण्याचा बहुमान मिळाला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT