स्पोर्ट्स

Ravindra Jadeja : २ बळी घेताच रवींद्र जडेजा रचणार इतिहास! ३४ हजारहून अधिक धावा करणाऱ्या दिग्गजाला टाकणार मागे

भारतीय क्रिकेट संघ द. आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी सज्ज झाला आहे. पहिला सामना १४ नोव्हेंबरपासून कोलकाता येथील ईडन गार्डन्सवर खेळला जाणार आहे.

रणजित गायकवाड

भारतीय क्रिकेट संघाचा ऑस्ट्रेलिया दौरा नुकताच संपला आहे. आता 'टीम इंडिया' मायदेशात दक्षिण आफ्रिकेच्या संघाशी दोन हात करण्यास सज्ज झाली आहे. दक्षिण आफ्रिकेचा संघ आपल्या भारत दौऱ्याची सुरुवात २ सामन्यांच्या कसोटी मालिकेने करणार आहे. यानंतर दोन्ही संघांमध्ये ३ एकदिवसीय आणि ५ सामन्यांची टी-२० मालिका खेळली जाईल.

कसोटी मालिकेतील पहिला सामना १४ नोव्हेंबरपासून कोलकाताच्या ऐतिहासिक ईडन गार्डन्स स्टेडियमवर रंगणार आहे. तब्बल ६ वर्षांनंतर या मैदानावर कसोटी सामना खेळवला जाईल. यापूर्वी नोव्हेंबर २०१९ मध्ये भारत आणि बांगलादेश यांच्यात या मैदानावर लढत झाली होती.

ईडन गार्डन्सवर खेळल्या जाणाऱ्या या कसोटी सामन्यात सर्वांच्या नजरा भारतीय कर्णधार शुभमन गिल, डावखुरा सलामीवीर यशस्वी जैस्वाल, विकेटकीपर ऋषभ पंत आणि केएल राहुल यांच्यावर खिळलेल्या असतील, पण यासोबतच स्टार अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजा देखील गोलंदाजी आणि फलंदाजीने महत्त्वाचे योगदान देण्यासाठी उत्सुक असेल. या सामन्यात जड्डूला भारताचा महान माजी खेळाडू सचिन तेंडुलकरला मागे टाकण्याची एक सुवर्णसंधी मिळणार आहे.

सचिन तेंडुलकर मागे पडणार?

वास्तविक पाहता, रवींद्र जडेजाने ईडन गार्डन्सवर खेळलेल्या ३ कसोटी सामन्यांच्या ६ डावांत ४ बळी घेतले आहेत. आता द. आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात केवळ २ विकेट्स घेताच, ईडन गार्डन्सवरील कसोटी बळींच्या बाबतीत तो ‘मास्टर-ब्लास्टर’ तेंडुलकरला मागे टाकणार आहे.

ईडन गार्डन्सवर तेंडुलकरच्या नावावर १३ कसोटी सामन्यांच्या १२ डावांमध्ये ५ बळींची नोंद आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक ३४,३५७ धावा करणारा सचिनचा कोलकाता येथील सर्वोत्तम गोलंदाजीचा विक्रम ३१ धावांत ३ बळी असा आहे. तर, जडेजाचा सर्वोत्तम विक्रम ४१ धावांत ३ बळी असा आहे.

जडेजाला खास क्लबमध्ये सामील होण्याची संधी

जडेजाने त्याच्या कसोटी कारकिर्दीमध्ये ८७ कसोटींच्या १६९ डावांत ३३८ बळी घेतले आहेत. द. आफ्रिकेविरुद्धच्या या मालिकेत जडेजाला ३५० कसोटी बळी पूर्ण करण्याची देखील एक उत्कृष्ट संधी असेल. यासाठी त्याला २ कसोटी सामन्यांच्या मालिकेत केवळ १२ बळी घ्यावे लागतील. असे झाल्यास, तो कसोटी क्रिकेटमध्ये ३५० किंवा त्याहून अधिक बळी घेणारा पाचवा भारतीय गोलंदाज ठरेल. आतापर्यंत हा पराक्रम केवळ अनिल कुंबळे, आर अश्विन, कपिल देव आणि हरभजन सिंह यांनीच केला आहे.

सर्वाधिक कसोटी बळी घेणारे भारतीय गोलंदाज

  • अनिल कुंबळे : ६१९ विकेट्स

  • आर अश्विन : ५३७ विकेट्स

  • कपिल देव : ४३४ विकेट्स

  • हरभजन सिंग : ४१७ विकेट्स

  • रवींद्र जडेजा : ३३८ विकेट्स

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT