ind vs sa t20 series suryakumar talks about sanju samson batting position
नवी दिल्ली : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील एकदिवसीय (ODI) मालिकेची सांगता झाल्यानंतर आता क्रिकेटप्रेमींना पाच सामन्यांच्या रोमांचक टी-२० मालिकेची मेजवानी मिळणार आहे. या मालिकेची सुरुवात मंगळवारपासून (९ डिसेंबर) होत आहे. या मालिकेमुळे भारतीय संघात अनेक महत्त्वाचे बदल झाले असून, मुख्य म्हणजे दुखापतीतून सावरलेला सलामीचा फलंदाज शुभमन गिल (Shubman Gill) याचे दमदार पुनरागमन होत आहे.
शुभमन गिल हा अभिषेक शर्मा याच्यासह डावाची सुरुवात करू शकतो. गिलच्या कमबॅकमुळे गेल्या काही काळापासून सातत्याने चांगली कामगिरी करणाऱ्या संजू सॅमसन (Sanju Samson) याच्या फलंदाजीच्या क्रमावर परिणाम झाला आहे.
या सर्व चर्चांदरम्यान, संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) याने पत्रकार परिषदेत आपल्या भात्यातील अनेक रहस्ये उलगडली. सूर्या स्वतः या मालिकेत तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी उतरणार आहे.
गिलच्या पुनरागमनानंतर सॅमसनला आता पाचव्या क्रमांकावर फलंदाजी करावी लागणार आहे, तर गेल्या वर्षीपर्यंत संजू हा अभिषेक शर्मासोबत सलामीला येऊन चांगली कामगिरी करत होता. याच पार्श्वभूमीवर, संजूच्या फलंदाजी क्रमाबाबत कर्णधार सूर्यकुमारने महत्त्वाचे मत व्यक्त केले.
सूर्या म्हणाला, ‘आम्हाला आमच्या कॉम्बिनेशनमध्ये जास्त बदल करायचे नाहीत. आम्ही कशा प्रकारचे क्रिकेट खेळू इच्छितो, याची आमची रणनिती तयार आहे. याव्यतिरिक्त मोठे बदल करण्याचा आमचा कोणताही विचार नाही.’
संजूच्या भूमिकेवर बोलताना 'सूर्या' पुढे म्हणाला, ‘संजू हा एक असा फलंदाज आहे जो टॉप ऑर्डरमध्येही खेळू शकतो. सलामीवीर म्हणून त्याने आधीही उत्तम कामगिरी केली आहे. गिलला त्याच्या क्षमतेनुसार संधी मिळाली, त्यामुळे त्याला संजूच्या पुढे खेळायला मिळाले. पण संजूलाही पुरेशा संधी मिळाव्यात, याची आम्ही खात्री केली आहे.’
शुभमन गिल आणि संजू सॅमसन यांसारख्या प्रतिभावान खेळाडूंच्या उपस्थितीमुळे कर्णधाराला निश्चितच चांगली 'डोकेदुखी' झाली आहे. यावर बोलताना सूर्यकुमारने संघाच्या भविष्यातील रणनीतीवर प्रकाश टाकला. तो म्हणाला, ‘सलामीवीरांव्यतिरिक्त, बाकीच्या सर्व खेळाडूंना परिस्थितीनुरूप लवचिक असणे आवश्यक आहे. त्यांना वेगवेगळ्या क्रमावर जुळवून घ्यावे लागेल. गिल आणि संजू हे दोघेही आमच्या टी-२० वर्ल्ड कपच्या नियोजनात आहेत. ते दोघेही वेगवेगळ्या भूमिका उत्तम प्रकारे पार पाडू शकतात. ही गोष्ट संघासाठी एक मोठी सकारात्मक बाब आहे आणि एका अर्थाने 'गोड डोकेदुखी' देखील आहे.’
टी-२० विश्वचषक २०२६ फेब्रुवारी-मार्चमध्ये होणार आहे. या स्पर्धेच्या तयारीसाठी भारत आणि दक्षिण आफ्रिका या दोघांसाठी ही मालिका खूप महत्त्वाची आहे. सूर्याने स्पष्ट केले की, ‘टी-२० वर्ल्ड कपपूर्वी आम्हाला दोन बलवान संघांविरुद्ध १० टी-२० सामने खेळायचे आहेत. एक दक्षिण आफ्रिका आणि दुसरी न्यूझीलंड. त्यामुळे सध्या आमचे संपूर्ण लक्ष या मालिकांवर केंद्रित आहे. जसजसे आम्ही वर्ल्ड कपजवळ जाऊ, तसतसे आम्ही हळूहळू आमचे संपूर्ण लक्ष टी-२० वर्ल्ड कपच्या तयारीवर केंद्रित करू.’