IND vs SA Team India fined for slow over rate in 2nd ODI vs South Africa
दुबई : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात संथ गोलंदाजी राखल्याबद्दल भारतीय संघाला मॅच फीच्या १० टक्के दंड ठोठावण्यात आला आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) सोमवारी ही घोषणा केली. विशेष म्हणजे, हा सामना भारताने गमावला होता आणि दक्षिण आफ्रिकेने एकदिवसीय क्रिकेटमधील भारतासमोरचा सर्वात मोठा यशस्वी पाठलाग करण्याचा विक्रम नोंदवत मालिकेत बरोबरी साधली होती.
दुसरा एकदिवसीय सामना रायपूरच्या मैदानावर पार पडला होता. त्या सामन्यात भारतीय संघाने निर्धारित वेळेत गोलंदाजीचा कोटा पूर्ण न केल्यामुळे आयसीसीने त्यांच्यावर कारवाई केली आहे. आयसीसीने दिलेल्या अधिकृत माहितीनुसार, पंचांनी सामन्यातील वेळ आणि षटकांची गती विचारात घेतल्यानंतर असे निष्पन्न झाले की, कर्णधार केएल राहुलच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने निर्धारीत वेळेपेक्षा दोन षटके कमी टाकली.
या कारवाईची पुष्टी करताना आयसीसीने स्पष्ट केले की, एमिरेट्स आयसीसी एलिट पॅनेल ऑफ मॅच रेफ्रींमधील रिची रिचर्डसन यांनी संथ गोलंदाजीच्या नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल ही दंडात्मक कारवाई केली. आयसीसीच्या खेळाडू आणि सपोर्ट स्टाफसाठी असलेल्या आचारसंहितेच्या आर्टिकल २.२२ नुसार, ‘कमीत कमी ओव्हर-रेटची चूक' या नियमाचे उल्लंघन केल्याबद्दल भारतीय संघावर औपचारिकरित्या आरोप ठेवण्यात आला होता.
नियमानुसार निर्धारित वेळेत संघाने जेवढी षटके कमी टाकली, तेवढ्या प्रत्येक षटकासाठी खेळाडूंना त्यांच्या मॅच फीच्या पाच टक्के दंड आकारला जातो. दरम्यान, भारताचा प्रभारी कर्णधार केएल राहुलने चूक मान्य केली असून दंड स्वीकारला आहे. त्यामुळे औपचारिक सुनावणीची गरज भासली नाही.
दुसऱ्या वनडेमध्ये भारताने प्रथम फलंदाजी करताना विराट कोहली आणि ऋतुराज गायकवाड यांच्या शतकांच्या जोरावर ५ बाद ३५८ धावांचा डोंगर उभा केला होता. मात्र, दक्षिण आफ्रिकेचा सलामीवीर एडन मार्करामने ९८ चेंडूंमध्ये ११० धावांची विस्फोटक खेळी केली. ज्यामुळे विजयी आव्हानाचा पाठलाग करण्यात मजबूत आधार मिळाला. त्यानंतर, डेवाल्ड ब्रेव्हिस आणि मॅथ्यू ब्रीत्झके यांच्या अर्धशतकांनी आफ्रिकेला लक्ष्याजवळ पोहचवले. अखेरीस कॉर्बिन बॉश आणि केशव महाराज यांनी संघाला चार विकेट्स आणि चार चेंडू राखून थरारक विजय मिळवून दिला.
या विजयासह दक्षिण आफ्रिकेने मालिकेतील स्कोअर १-१ अशी बरोबरी साधली. मात्र, त्यानंतर तिसऱ्या निर्णायक वनडेत भारताने शानदार पुनरागमन करत आफ्रिकेला २७० धावांवर रोखले आणि १० हून अधिक षटके शिल्लक असताना ९ गडी राखून दणदणीत विजय मिळवत मालिका जिंकली.