Rishabh Pant Apologizes To Fans
नवी दिल्ली : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेत भारताला ०-२ असा पराभव पत्करावा लागला. दुसऱ्या कसोटीत भारताला ४०८ धावांनी पराभव पत्करावा लागला. या सामन्यात टीम इंडियाचे नेत्तृत्त्व करणार्या ऋषभ पंतने नामुष्कीजनक पराभवावर आपले मौन सोडले आहे. गुवाहाटी कसोटी सामन्यात भारतीय क्रिकेटपटूंनी चांगली कामगिरी केली नाही, असे त्याने सोशल मीडियावरील पोस्टमध्ये म्हटले आहे. तसेच त्याने चाहत्यांची माफीही मागितली आहे.
पंतने इन्टाग्रामवर केलेल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे की, "गेल्या दोन आठवड्या आम्ही चांगले क्रिकेट खेळलो नाही. एक संघ म्हणून आणि वैयक्तिकरित्या आम्हाला नेहमीच सर्वोच्च पातळीवर कामगिरी करायची आहे. आता पुन्हा एकदा लाखो भारतीयांच्या चेहऱ्यावर हास्य आणायचे आहे. यावेळी अपेक्षा पूर्ण न केल्याबद्दल आम्ही दिलगीर आहोत, परंतु खेळ तुम्हाला संघ म्हणून आणि वैयक्तिकरित्या शिकण्यास, जुळवून घेण्यास आणि वाढण्यास शिकवतो."
"भारताचे प्रतिनिधित्व करणे हा आमच्या आयुष्यातील सर्वात मोठा सन्मान आहे. या संघाची क्षमता आम्हाला माहित आहे. आम्ही कठोर परिश्रम करू, पुन्हा संघटित होऊ, पुन्हा लक्ष केंद्रित करू आणि एक संघ आणि वैयक्तिकरित्या आणखी चांगले आणि मजबूत परत येऊ, असा विश्वासही पंतने व्यक्त केला आहे.
गंभीरच्या मार्गदर्शनाखाली भारताने सहा कसोटी मालिका खेळल्या आहेत. संघाने बांगलादेशविरुद्ध घरच्या मैदानावर २-० असा विजय मिळवला. त्यानंतर न्यूझीलंडने घरच्या मैदानावर भारताला ०-३ असे पराभूत केले. यानंतर ऑस्ट्रेलिया दौऱ्यात संघाला ३-१ असा पराभव पत्करावा लागला, इंग्लंडमधील पाच सामन्यांची मालिका २-२ अशी बरोबरीत साधण्यात संघाला यश आले. यानंतर भारताने वेस्ट इंडिजविरुद्ध घरच्या मैदानावर २-० असा विजय मिळवला, परंतु दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या अलिकडच्या ०-२ अशा पराभवाने पुन्हा एकदा संघाच्या मर्यादा स्पष्ट झाल्या. गौतम गंभीरच्या प्रशिक्षण काळात घरच्या मैदानावरच टीम इंडियाला नामुष्कीजनक पराभवाला सामोरे जावे लागले आहे.