ind vs sa odi series team india number 4 batting order problem
भारतीय संघाचा उपकर्णधार श्रेयस अय्यर गंभीर दुखापतीमुळे दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या आगामी एकदिवसीय मालिकेत खेळण्याची शक्यता धूसर झाली आहे. त्यामुळे, त्याच्या अनुपस्थितीत चौथ्या क्रमांकावर कोण फलंदाजीची जबाबदारी सांभाळणार, हा कळीचा प्रश्न उपस्थित झाला आहे. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात ३० नोव्हेंबर ते ६ डिसेंबर या कालावधीत तीन एकदिवसीय सामने खेळले जाणार आहेत.
द. आफ्रिकेविरुद्धच्या दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेपाठोपाठ भारतीय संघ तीन एकदिवसीय सामन्यांची मालिकाही खेळणार आहे. या मालिकेसाठी भारतीय संघात ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळलेल्या मागील मालिकेपेक्षा बदल दिसण्याची शक्यता आहे. कारण उपकर्णधार श्रेयस अय्यर त्या मालिकेत गंभीररीत्या जखमी झाला होता आणि ताज्या अहवालानुसार, तो दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळू शकेल याबाबत शंका आहे. दुसरीकडे, अष्टपैलू हार्दिक पंड्या संघात परतण्याची शक्यता असून, यष्टिरक्षक-फलंदाज ऋषभ पंत देखील आता तंदुरुस्त झाला आहे.
अय्यरच्या दुखापतीनंतर आता चौथ्या क्रमांकावर कोण फलंदाजी करणार? हा प्रश्न निर्माण झाला आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत श्रेयस अय्यरनेच या स्थानाची जबाबदारी यशस्वीरित्या सांभाळली होती. त्याने एकदिवसीय विश्वचषक २०२३ सह अनेक महत्त्वाच्या प्रसंगी चौथ्या क्रमांकावर उत्कृष्ट कामगिरी केली आहे. त्याच्या या दमदार प्रदर्शनामुळे युवराज सिंगच्या निवृत्तीनंतर भारतीय संघाला भेडसावणारी 'चौथ्या क्रमांकाची' मोठी समस्या दूर झाली होती. पण, आता अय्यर सारखा महत्त्वाचा खेळाडू दुखापतग्रस्त झाल्यामुळे, भारतीय संघाला पुन्हा एकदा या कठीण प्रश्नाचे उत्तर शोधावे लागणार आहे.
या संदर्भात, 'इंडियन एक्सप्रेस'ने बीसीसीआयच्या एका सूत्राच्या हवाल्याने सांगितले आहे की, अय्यर दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत खेळण्याबाबत शंका आहे. कारण अय्यरला तंदुरुस्त होण्यासाठी अजून वेळ लागेल. तसेच, बोर्डालाही त्याच्या दुखापतीतून सावरण्याच्या प्रक्रियेत कोणतीही घाई करायची नाहीये. जानेवारी महिन्यात होणाऱ्या न्यूझीलंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी अय्यर पूर्णपणे तंदुरुस्त होईल असा विश्वास आहे.
श्रेयस अय्यर जर द. आफ्रिकेविरुद्धच्या एकदिवसीय संघातून बाहेर पडला, तर ऋषभ पंत किंवा तिलक वर्मा यापैकी एखाद्याची संघात एंट्री होऊ शकते. हे दोन्ही खेळाडू अय्यरच्या अनुपस्थितीत चौथ्या क्रमांकाची जबाबदारी सांभाळू शकतात. फलंदाजीच्या शैलीचा विचार केल्यास, तिलक वर्मा हा अय्यरच्या गैरहजेरीत या स्थानासाठी प्रभावी पर्याय ठरू शकतो, असे तज्ज्ञांचे मत आहे
दुसरीकडे, अनुभवी अष्टपैलू रवींद्र जडेजा देखील ऑस्ट्रेलिया मालिकेचा भाग नव्हता, पण द. आफ्रिकेविरुद्धची मालिका भारतात होणार असल्यामुळे त्याचे संघात पुनरागमन होण्याची शक्यता आहे. निवड समितीचे अध्यक्ष अजित आगरकर यांनीही ऑस्ट्रेलियात चार फिरकीपटूंची गरज नसल्याचे म्हटले होते, पण भारतातील मालिकेत जडेजा पुन्हा संघात दिसू शकतो. त्यामुळे जडेजाही चौथ्या स्थानासाठी उत्कृष्ट पर्याय ठरू शकतो, असे काहींचे म्हणणे आहे. आता अजित आगरकर यांच्या अध्यक्षतेखालील निवड समिती काय निर्णय घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.