गुवाहाटी : भारताला दक्षिण आफ्रिकेविरुद्धची दोन कसोटी सामन्यांची मालिका 1-1 अशी बरोबरीत आणण्यासाठी शनिवारपासून (22 नोव्हेंबर) गुवाहाटी येथील ‘एएमएल’ स्टेडियमवर होणारा दुसरा आणि अंतिम कसोटी सामना जिंकणे आवश्यक आहे. विशेष म्हणजे, गुवाहाटीची खेळपट्टी दोन्ही संघांसाठी अनोळखी असल्यामुळे हा सामना दोन्ही संघांसाठी एक नवीन आव्हान निर्माण करणार आहे.
माजी सलामीवीर आकाश चोप्रा यांच्या मते, ही खेळपट्टी दोन्ही संघांसाठी नवीन असली, तरी अशा प्रकारच्या भारतीय खेळपट्ट्यांवर खेळण्याचा पूर्वानुभव असल्यामुळे भारतीय संघाला थोडासा फायदा मिळेल.
आकाश चोप्रा यांनी सांगितले की, गुवाहाटीमध्ये क्रिकेट कसे खेळले जाईल, याची कोणालाही कल्पना नाही. कारण, हे कसोटी सामन्यांसाठी नवीन ठिकाण आहे. येथे प्रथमश्रेणी क्रिकेट झाले आहे आणि अलीकडील महिला विश्वचषक सामन्यांदरम्यान खेळपट्टीने मोठी वळणे घेतली होती. जर तुम्ही पहिल्यांदा येथे खेळत असाल, तर शुभमन गिल असो किंवा साई सुदर्शन किंवा ऋषभ पंत, त्यांच्यासाठी खेळपट्टी तीच आहे, जी टेम्बा बावुमा किंवा रायन रिकेल्टन यांच्यासाठी असेल. त्यामुळे दोन्ही संघांसाठी हे आव्हान आहे.
चोप्रा म्हणाले, आम्ही अजूनही भारतात खेळत आहोत. आम्ही अशा प्रकारच्या खेळपट्ट्यांवर खेळत मोठे झालो आहोत. गुवाहाटी वेगळी असू शकते; पण येथील माती कुठून तरी भारतातूनच आली असेल.
गुवाहाटी कसोटीत शुभमन गिल मानेच्या स्नायूंच्या ताणामुळे खेळणार नाही. त्यामुळे तिसऱ्या क्रमांकावर कोणाला संधी द्यायची, याबद्दलही चर्चा सुरू आहे. याविषयी चोप्रा यांनी साई सुदर्शनला तिसऱ्या क्रमांकावर कायम ठेवण्याचे समर्थन केले.
ते म्हणाले की, कसोटी क्रिकेटमध्ये तिसरा क्रमांक महत्त्वाचा असतो आणि त्यासाठी तंत्रशुद्ध फलंदाजीची क्षमता आणि जास्त वेळ क्रीझवर थांबण्याची क्षमता असलेल्या खेळाडूला प्राधान्य दिले पाहिजे. सुदर्शनला वेस्ट इंडिजविरुद्ध दिल्लीत 87 धावांची खेळी करून त्याने संधी साधली होती. त्याला सातत्यपूर्ण संधी मिळणे आवश्यक आहे.