स्पोर्ट्स

IND vs SA 1st T20 : आगामी वर्ल्डकपची ड्रेस रिहर्सल..! शुभमन गिल-पंड्याचे पुनरागमन, सूर्यकुमारच्या फॉर्मची चिंता

उभय संघांतील पहिल्या टी-20 लढतीला मंगळवारी सायंकाळी 7 वाजता सुरुवात होईल.

रणजित गायकवाड

ind vs sa 1st t20 gill & pandya return concerns over suryakumar's form

कटक : भारत व दक्षिण आफ्रिका यांच्यातील 5 सामन्यांच्या टी-20 मालिकेला मंगळवारी (दि.9) कटक येथे पहिल्या टी-20 लढतीने प्रारंभ होत असून, या मालिकेच्या माध्यमातून भारतीय संघात शुभमन गिल आणि हार्दिक पंड्या यांचे पुनरागमन होत आहे. अवघ्या तीन-एक महिन्यांच्या उंबरठ्यावर आलेल्या आयसीसी टी-20 विश्वचषक स्पर्धेच्या उंबरठ्यावर भारत-द. आफ्रिका यांच्यातील ही मालिका खऱ्या अर्थाने विश्वचषकाची ड्रेस रिहर्सल ठरणार आहे. मंगळवारी उभय संघांतील पहिल्या टी-20 लढतीला सायंकाळी सात वाजता सुरुवात होईल.

ही मालिका म्हणजे फेब्रुवारीत होणाऱ्या प्रतिष्ठेच्या विश्वचषक स्पर्धेसाठी भारताच्या औपचारिक तयारीची सुरुवात आहे. या स्पर्धेपूर्वी भारत 10 टी-20 सामने खेळणार आहे. यातील 5 सामने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध आणि त्यानंतर 5 सामने न्यूझीलंडविरुद्ध होणार आहेत. आगामी विश्वचषकात 7 फेब्रुवारी रोजी वानखेडेवर अमेरिकेविरुद्धच्या सामन्याने भारत आपल्या विजेतेपद राखण्याच्या मोहिमेला सुरुवात करेल.

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध या मालिकेच्या माध्यमातून भारतीय संघ आपला अंतिम एकादश सुनिश्चित करण्यासाठी प्रयत्नशील असेल. त्यामुळे येथील 5 सामन्यांत संघाची जडणघडण ठरवण्यावर भारतीय संघव्यवस्थापनाचा भर असणार आहे. मागील टी-20 विश्वचषक जिंकल्यानंतर भारतीय संघाने आपल्या कामगिरीत उत्तम सातत्य राखले असून त्यानंतर त्यांची कामगिरी 26 विजय व 4 पराभव अशी राहिली आहे. दुबईतील आशिया चषक जेतेपदाच्या मोहिमेत तर संघाने सलग 7 विजय मिळवण्याचा पराक्रम गाजवला आहे.

यापूर्वी कसोटी मालिकेत पहिल्या सामन्यात स्लॉग स्वीप मारण्याच्या प्रयत्नात मानेचा स्नायू दुखावल्यामुळे जवळपास एक महिना क्रिकेटपासून दूर राहिलेल्या शुभमन गिलचे आता संघात पुनरागमन झाले आहे. मागील आयपीएलपासून तो सातत्याने क्रिकेट खेळत असून, भारताच्या आगामी व्यस्त हंगामामुळे त्याच्या वर्कलोडवर बारकाईने लक्ष ठेवले जाईल. 33 टी-20 सामन्यांमध्ये 29.89 च्या सरासरीने 837 धावा करणाऱ्या गिलसाठी ही मालिका आयसीसी स्पर्धेच्या दृष्टीने एक महत्त्वाची तयारी ठरणार आहे.

ऑस्ट्रेलिया दौऱ्यात 2-1 ने जिंकलेल्या मालिकेत 163 धावांसह भारताकडून सर्वाधिक धावा करणारा अभिषेक देशांतर्गत क्रिकेटमध्येही तुफानी फॉर्मात आहे. सय्यद मुश्ताक अली टी-20 स्पर्धेत, या डावखुऱ्या फलंदाजाने 50.66 च्या सरासरीने आणि 249 पेक्षा जास्तच्या अविश्वसनीय स्ट्राईक रेटने 304 धावा केल्या. यात बंगालविरुद्ध 52 चेंडूंत झळकावलेल्या 148 धावांच्या खेळीचा समावेश आहे.

दुसरीकडे, दक्षिण आफ्रिकेच्या संघात वेगवान गोलंदाज एनरिचचे पुनरागमन झाले आहे. गेल्या वर्षीच्या टी-20 विश्वचषक अंतिम सामन्यानंतर तो प्रथमच आंतरराष्ट्रीय सामना खेळणार आहे. अनुभवी डावखुरा फिरकीपटू केशव महाराजही मर्यादित षटकांच्या संघात परतला आहे. मात्र, स्टार फलंदाज टोनी डी झोर्झी आणि युवा वेगवान गोलंदाज क्वेना मफाका हे दुखापतीमुळे पाच सामन्यांच्या मालिकेतून बाहेर झाल्याने प्रोटियाज संघाला मोठा धक्का बसला आहे.

सूर्यकुमारच्या फॉर्मची चिंता

मालिकेपूर्वी कर्णधार सूर्यकुमार यादवचा प्रदीर्घ खराब फॉर्म चिंतेचे ठरत आले आहे. आयपीएल 2025 मध्ये मुंबई इंडियन्सकडून 717 धावा आणि आंतरराष्ट्रीय टी-20 सामन्यांतील त्याची निराशाजनक कामगिरी यात मोठी तफावत आहे. गेल्या वर्षी जुलैमध्ये पूर्णवेळ टी-20 कर्णधार झाल्यापासून, त्याचा फॉर्म घसरला असून त्याने 15 डावांत 15.33 च्या सरासरीने केवळ 184 धावा केल्या आहेत. गेल्या 20 सामन्यांत त्याला एकही अर्धशतक झळकावता आलेले नाही आणि त्याचा स्ट्राईक रेट 2022 मधील 187+ वरून 127.77 पर्यंत खाली आला आहे.

संभाव्य संघ

भारत : सूर्यकुमार यादव (कर्णधार), शुभमन गिल (उपकर्णधार), अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, संजू सॅमसन (यष्टिरक्षक), जितेश शर्मा (यष्टिरक्षक), हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, शिवम दुबे, वॉशिंग्टन सुंदर, जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंग, हर्षित राणा, कुलदीप यादव, वरुण चक्रवर्ती.

दक्षिण आफ्रिका : एडन मार्कराम (कर्णधार), ओटनील बार्टमन, कॉर्बिन बॉश, डेवाल्ड ब्रेविस, क्विंटन डी कॉक, टोनी डी झोर्झी, डोनोव्हन फरेरा, रीझा हेंड्रिक्स, मार्को यान्सेन, जॉर्ज लिंडे, केशव महाराज, क्वेना मफाका, डेव्हिड मिलर, लुंगी एन्गिडी, एनरिच, ट्रिस्टन स्टब्स.

सामन्याची वेळ : सायं. 7 वा.

महत्त्वाचे खेळाडू

हार्दिक पंड्या

आशिया चषकादरम्यान झालेल्या स्नायूंच्या दुखापतीमुळे 2 महिन्यांहून अधिक काळ बाहेर राहिल्यानंतर, हार्दिक पंड्याने सय्यद मुश्ताक अली स्पर्धेत बडोद्याकडून 42 चेंडूंत नाबाद 77 धावांची खेळी करून दमदार पुनरागमन केले. त्यानंतर त्याने पूर्ण क्षमतेने गोलंदाजी करत 52 धावांत 1 बळीही घेतला. तो संघाच्या एक दिवस आधीच येथे दाखल झाला आणि त्याने बाराबती स्टेडियमवर एकट्याने सराव केला.

जसप्रीत बुमराह

दिग्गज स्पीडस्टार जसप्रीत बुमराहला टी-20 क्रिकेटमध्ये 100 बळींचा माईलस्टोन सर करण्यासाठी केवळ एका बळीची आवश्यकता आहे. याशिवाय, 500 बळी सर करण्यासाठीही त्याला अवघ्या 18 बळींची गरज आहे. हे दोन्ही विक्रम त्याच्या रडारवर असणार आहेत. टी-20 मध्ये बळींचे शतक करणारा तो डावखुरा अर्शदीप सिंगनंतर भारताचा केवळ दुसराच गोलंदाज ठरेल. सध्या बुमराहच्या खात्यावर 80 सामन्यांत 18.11 च्या सरासरीने 99 बळी घेतले आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT