स्पोर्ट्स

IND vs PAK Semifinal : भारत-पाकिस्तान पुन्हा आमनेसामने येण्याची शक्यता; काय आहे नेमके समीकरण?

T20 World Cup IND vs PAK Semifinal Equation : सुपर 8 मध्ये भारत ‘X’ तर पाकिस्तानला ‘Y‘ गटात स्थान मिळणार

रणजित गायकवाड

IND vs PAK T20 World Cup Chances of India vs Pakistan Clash Again

नवी दिल्ली : टी-२० विश्वचषक २०२६ च्या रणांगणात भारतीय वाघांनी आपल्या डरकाळीने कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानला पुरते गारद केले आहे. साखळी सामन्यात पाकिस्तानचा मानहानीकारक पराभव करत टीम इंडियाने 'सुपर-८' फेरीचे तिकीट दिमाखात खिशात घातले आहे. भारताच्या या विजयाने प्रतिस्पर्धी छावणीत धडकी भरली असून, स्पर्धेच्या पुढच्या टप्प्यात पुन्हा एकदा पाकिस्तानला चारी मुंड्या चित करण्याची नामी संधी निर्माण झाली आहे.

'ग्रुप-ए' मधील सामन्यात १५ फेब्रुवारीच्या रात्री भारतीय क्रिकेट संघाच्या 'विजयी रथा'ने पाकिस्तानच्या आव्हानाला ६१ धावांच्या महाकाय फरकाने चिरडून टाकले. या विजयासह ‘सूर्य’सेनेचे 'सुपर-८' मधील स्थान पक्के झाले असून, आता पुढील फेरीत त्यांना अधिक दमदार कामगिरी करावी लागणार आहे. साखळी फेरीत भारताचा अद्याप एक सामना शिल्लक आहे. १८ फेब्रुवारी रोजी टीम इंडिया नेदरलँड्सविरुद्ध मैदानात उतरेल. त्यानंतर २२ फेब्रुवारीपासून भारताचा 'सुपर-८' मधील प्रवास सुरू होईल. विशेष म्हणजे, या विश्वचषकात भारत आणि पाकिस्तान यांच्यात पुन्हा एकदा थरार पाहायला मिळू शकतो.

सुपर-८ मध्ये भारत-पाक सामना होणार नाही

आयसीसीने जाहीर केलेल्या टी-२० विश्वचषक २०२६ च्या वेळापत्रकानुसार, २० संघांची चार गटांत (अ, ब, क आणि ड) विभागणी करण्यात आली आहे. प्रत्येक गटातील अव्वल दोन संघ 'सुपर-८' साठी पात्र ठरतील. 'सुपर-८' मध्ये या संघांची विभागणी 'एक्स' आणि 'वाय' अशा दोन गटांत करण्यात आली आहे. नियमानुसार, भारतीय संघ 'एक्स' गटाचा भाग असेल, तर पाकिस्तानला 'वाय' गटात स्थान देण्यात आले आहे. त्यामुळे 'सुपर-८' फेरीत हे दोन्ही संघ एकमेकांविरुद्ध खेळताना दिसणार नाहीत.

सेमीफायनलमध्ये पडणार गाठ?

भारतीय संघाचा सध्याचा फॉर्म पाहता 'सुपर-८' मध्ये त्यांना रोखणे प्रतिस्पर्धी संघांसाठी कठीण मानले जात आहे. जर भारतीय संघ 'एक्स' गटात अव्वल स्थानी राहिला, तर त्यांचा उपांत्य सामना 'वाय' गटातील दुसऱ्या क्रमांकाच्या संघाशी होईल. जर पाकिस्तानने आपल्या गटात दुसरे स्थान पटकावले, तर सेमीफायनलमध्ये भारत-पाक सामना निश्चित होईल. याउलट, भारत जर आपल्या गटात दुसऱ्या क्रमांकावर राहिला आणि पाकिस्तानने 'वाय' गटात अव्वल स्थान मिळवले, तरीही उपांत्य फेरीत हे दोन संघ आमनेसामने येतील.

अंतिम सामन्यातही शक्य आहे महामुकाबला

मोठ्या पराभवानंतरही स्पर्धेत टिकून राहण्याचा प्रयत्न करणे हा पाकिस्तानच्या संघाचा पूर्वेतिहास राहिला आहे. पण सद्यस्थितीतील पाक संघाचे प्रदर्शन पाहता पुढील वाटचाल त्यांच्यासाठी आव्हानात्मक वाटत आहे. असे असले तरी क्रिकेटमधील अनिश्चितता नाकारता येत नाही. जर उपांत्य फेरीत भारत आणि पाकिस्तान आमनेसामने आले नाहीत आणि दोन्ही संघांनी आपापल्या बाद फेरीतील सामन्यांत विजय मिळवून अंतिम फेरीत धडक मारली, तर टी-२० विश्वचषक २०२६ चा निर्णायक किताब जिंकण्यासाठी या दोन पारंपरिक प्रतिस्पर्ध्यांमध्ये पुन्हा एकदा लढत पाहायला मिळू शकते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT