स्पोर्ट्स

IND vs PAK ODI : भारत-पाक महासंग्रामाचा पुन्हा थरार; 'या' दिवशी दोन्ही संघ भिडणार, तिलक वर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया सज्ज

Asia Cup Rising Stars 2026 : युवा ब्रिगेडच्या खांद्यावर भारताची धुरा

रणजित गायकवाड

India vs Pakistan Asia Cup Rising Stars odi match 2026

दोहा: क्रिकेट विश्वातील सर्वात प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या भारत आणि पाकिस्तान यांच्यातील आणखी एका हाय-व्होल्टेज सामन्याची जय्यत तयारी पूर्ण झाली आहे. अवघ्या काही दिवसांतच हे दोन्ही पारंपरिक प्रतिस्पर्धी पुन्हा एकदा आमनेसामने येणार आहेत. हा क्रिकेटचाच सामना असला, तरी यावेळेस मैदानात उतरणारे खेळाडू काहीसे वेगळे असतील. काही दिवसांपूर्वीच भारतीय संघाने पाकिस्तानला पराभूत करत १९ वर्षांखालील आशिया कप २०२६ चे विजेतेपद पटकावले होते. आता या रविवारी पुन्हा एकदा तशाच एका थरारक महामुकाबल्याचा आनंद लुटण्यासाठी क्रीडाप्रेमींनी सज्ज व्हायला हवे.

आशियाई क्रिकेट परिषदेच्या (ACC) वतीने 'आशिया कप रायझिंग स्टार २०२६' या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या १९ नोव्हेंबर, गुरुवारपासून या स्पर्धेला दिमाखदार सुरुवात होणार आहे. स्पर्धेच्या पहिल्या दिवशी सलामीच्या सामन्यात बांगलादेश आणि हाँगकाँग हे संघ एकमेकांशी भिडतील, तर याच दिवशी होणाऱ्या दुसऱ्या सामन्यात श्रीलंका आणि अफगाणिस्तान यांच्यात लढत रंगेल. या स्पर्धेचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे काही देशांनी आपले पूर्ण ताकदीचे प्रमुख संघ मैदानात उतरवले आहेत, तर काही देशांनी आपल्या 'अ' (A) संघांना संधी दिली आहे. यामध्ये भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांचे 'अ' संघ सहभागी होत आहेत.

या स्पर्धेतील भारतीय 'अ' संघाच्या मोहिमेची सुरुवात २० नोव्हेंबर, शुक्रवारपासून होणार असून सलामीच्या सामन्यात भारताची गाठ नेपाळशी पडणार आहे. याच दिवशी पाकिस्तानी संघाचा पहिला सामना संयुक्त अरब अमिराती (UAE) विरुद्ध खेळवला जाईल. या स्पर्धेसाठी भारतीय संघाची घोषणा यापूर्वीच करण्यात आली असून, युवा फलंदाज तिलक वर्माकडे संघाच्या नेतृत्वाची धुरा सोपवण्यात आली आहे, तर आक्रमक फलंदाज रिंकू सिंह उपकर्णधारपदाची जबाबदारी सांभाळणार आहे. भारतीय संघाने दोहा येथे दाखल होऊन आपल्या सरावालाही जोरदार सुरुवात केली आहे.

क्रीडाविश्वाचे लक्ष लागून राहिलेला भारत आणि पाकिस्तान यांच्यातील बहुप्रतिक्षित महामुकाबला २२ नोव्हेंबर रोजी दोहा येथे खेळवला जाणार आहे. नेपाळविरुद्धचा पहिला सामना खेळल्यानंतर भारतीय संघ आपल्या दुसऱ्या सामन्यात पाकिस्तानचा सामना करेल. भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी ३:३० वाजता या सामन्याला सुरुवात होईल. या महत्त्वाच्या लढतीत युवा प्रतिभावान खेळाडू वैभव सूर्यवंशी आणि अभिषेक शर्मा हे देखील आपली चमक दाखवताना पाहायला मिळतील.

आशिया कप रायझिंग स्टार्स २०२६ स्पर्धेसाठी निवडण्यात आलेल्या भारतीय 'अ' संघात तिलक वर्मा (कर्णधार), रिंकू सिंह (उपकर्णधार), अभिषेक शर्मा, वैभव सूर्यवंशी, प्रभसिमरन सिंह, कुमार कुशाग्र, सूर्यांश शेडगे, शाहबाज अहमद, विप्रज निगम, हर्ष दुबे, तनुश कोटियन, हर्षित राणा, प्रिंस यादव, अर्शद खान आणि आयुष बडोनी या खेळाडूंचा समावेश करण्यात आला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT