भारतीय खेळाडूंनी हस्तांदोलन न केल्याच्या घटनेनंतर पाकिस्तानने आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेकडे (ICC) सामनाधिकाऱ्याबद्दल तक्रार दाखल केली आहे. इतकेच नव्हे तर, त्यांनी तत्काळ सामनाधिकारी अँडी पायक्रॉफ्ट यांना पूर्ण स्पर्धेतून हटवण्याची मागणीही केली आहे.
भारतीय संघाने हस्तांदोलन केले नाही म्हणून पाकिस्तानने थेट आयसीसीचे दार ठोठावले आहे. वृत्तांनुसार, पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने आयसीसीकडे भारत-पाकिस्तान सामन्याचे सामनाधिकारी पायक्रॉफ्ट यांना आशिया चषकातून हटवण्याची मागणी केली आहे. ही कारवाई तत्काळ करण्यात यावी, असेही रडगाणे पाकिस्तानने गायले आहे.
रविवारी, १४ सप्टेंबर रोजी दुबईत झालेल्या सामन्यानंतर भारतीय खेळाडूंनी पाकिस्तानी संघासोबत हस्तांदोलन केले नव्हते. टीम इंडियाच्या या कृतीमुळे पाकिस्तानचा तिळपापड झाला आहे. या घटनेला मूळतः सामनाधिकारीच जबाबदार आहेत. याच कारणामुळे पीसीबीने आयसीसीकडे त्यांना पदावरून हटवण्याची मागणी केली आहे.
पीसीबीने आयसीसीकडे दाखल केलेल्या तक्रारीत सामनाधिकारी अँडी पायक्रॉफ्ट यांच्यावर आयसीसीच्या ‘आचारसंहिते’चे (Code of Conduct) उल्लंघन केल्याचा आरोप केला आहे. शिवाय, ‘स्पिरिट ऑफ क्रिकेट’ (Spirit of Cricket) संदर्भात एमसीसीच्या (MCC) नियमांचे पालन करण्यातही सामनाधिकारी अपयशी ठरले आहेत, असे त्यांचे म्हणणे मांडले आहे. याच मुद्द्यांचा आधार घेऊन पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने सामनाधिकाऱ्याविरुद्ध आघाडी उघडली आहे.
आयसीसी काय निर्णय घेणार?
पाकिस्तानने दाखल केलेल्या तक्रारीनंतर आता सर्वांचे लक्ष आयसीसीच्या भूमिकेकडे लागले आहे. क्रिकेटची सर्वोच्च संस्था या प्रकरणात काय भूमिका घेते, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.
दरम्यान, पाकिस्तानचे काही माजी क्रिकेटपटूही या प्रकरणी आयसीसीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करताना दिसले आहेत. यात रशीद लतीफ आणि बासित अली यांचा समावेश आहे. रशीद लतीफने भारतीय खेळाडूंच्या कृतीवर संतप्त होऊन सोशल मीडियाद्वारे ‘आयसीसी कुठे आहे?’ असा प्रश्न उपस्थित केला आहे. तर बासित अलीने ‘आयसीसीचा प्रमुख भारतीय असल्यामुळे पाकिस्तान संघासोबत असे वर्तन केवळ आशिया चषकातच नाही, तर आयसीसीच्या स्पर्धांमध्येही होईल,’ असा आरोप केला आहे.
हस्तांदोलन न करण्याच्या या घटनेदरम्यान, भारताने दुबईत झालेल्या सामन्यात पाकिस्तानचा ७ गडी आणि २५ चेंडू राखून पराभव केला. पाकिस्तानने भारतासमोर १२८ धावांचे लक्ष्य ठेवले होते, जे भारताने ३ गडी गमावून सहज साध्य केले.