IND vs PAK T20 World Cup 2026: सुरुवातीला भारताविरुद्ध सामना खेळण्यास नकार देणाऱ्या पाकिस्तानने अखेर आपला निर्णय बदलला आहे. 15 फेब्रुवारी रोजी कोलंबोमध्ये खेळणार असल्याची माहिती दिली आहे. हा सामना वर्ल्ड कप 2026 मधील सर्वात हायव्होल्टेज सामना मानला जातो. हा सामना आर. प्रेमदासा स्टेडियम, कोलंबो येथे होणार आहे.
काही दिवसांपूर्वी पाकिस्तानने भारताविरुद्ध सामना न खेळण्याचा निर्णय घेतला होता. मात्र मंगळवारी रात्री उशिरा पाकिस्तान सरकारने ‘यू-टर्न’ घेतला आणि आपल्या क्रिकेट संघाला सामना खेळण्याचे आदेश दिले.
International Cricket Council,
Pakistan Cricket Board
Bangladesh Cricket Board
या तिन्ही संस्थांची लाहोरमध्ये चर्चा झाली. त्यानंतर पाकिस्तान सरकारने अधिकृत प्रसिद्धीपत्रक काढत सांगितलं की, जागतिक क्रिकेटचं हित आणि श्रीलंका–बांग्लादेशसारख्या मैत्रीपूर्ण देशांच्या विनंतीचा विचार करून हा निर्णय घेतला आहे.
पाकिस्तानचे पंतप्रधान शेहबाज शरीफ यांना पीसीबी अध्यक्ष मोहसिन नकवी यांनी या चर्चांचा सविस्तर अहवाल दिला. यानंतर सरकारने अंतिम निर्णय घेतला. याशिवाय बांग्लादेशकडून आलेल्या औपचारिक विनंत्या, श्रीलंका आणि इतर सदस्य देशांचे समर्थनपत्रही पाकिस्तानने लक्षात घेतले. श्रीलंकेचे राष्ट्राध्यक्ष अनुरा कुमार दिसानायके यांनीही थेट फोन करून हा वाद सौहार्दपूर्ण मार्गाने सोडवण्याची विनंती केल्याचं समोर आलं आहे. या सगळ्या घडामोडीनंतर पाकिस्तानने भारताविरुद्ध सामना खेळला जाईल असे सांगितले.
• एका भारत–पाकिस्तान ICC सामन्याची अंदाजे किंमत
सुमारे ₹2,200 कोटींपेक्षा अधिक
• ब्रॉडकास्टरला होणाऱ्या जाहिरातींचा महसूल
एका सामन्यातून ब्रॉडकास्टरला मिळणारा जाहिरात महसूल अंदाजे ₹200 ते ₹250 कोटी
• 10 सेकंदाच्या जाहिरातीची किंमत
भारत–पाकिस्तान सामन्यात 10 सेकंदांच्या एका जाहिरातीचा दर कमाल ₹40 लाख
• भारताच्या मीडिया राइट्स डीलचे मूल्य
भारताच्या मीडिया हक्कांचा सध्याचा करार (JioStar – ICC) अंदाजे ₹25,000 कोटी
• पाकिस्तान क्रिकेट बोर्डचे वार्षिक उत्पन्न
PCB चे एकूण वार्षिक उत्पन्न सुमारे ₹295 कोटी
• या सामन्याला मिळणारा प्रेक्षकवर्ग
जगभरात 100 कोटींपेक्षा अधिक प्रेक्षक
या संपूर्ण प्रकरणात बांग्लादेशवर कारवाई होणार का, याकडेही लक्ष होतं. भारतात खेळायला नकार दिल्यामुळे बांग्लादेशला वर्ल्ड कपमधून बाहेर करण्यात आलं होतं आणि त्यांच्या जागी स्कॉटलंडला संधी देण्यात आली होती. मात्र आयसीसीने स्पष्ट केलं आहे की बांग्लादेश क्रिकेट बोर्डवर कोणताही आर्थिक दंड लावला जाणार नाही. पीसीबी आणि बीसीबीसोबत चर्चा करून हा निर्णय घेण्यात आला.
या साऱ्या घडामोडींना सुरुवात झाली होती बांग्लादेशचा वेगवान गोलंदाज मुस्तफिजूर रहमान आयपीएलमधून बाहेर झाल्यानंतर. यानंतर बांग्लादेशने सुरक्षेचं कारण देत भारतात येण्यास नकार दिला आणि आयसीसीकडे तक्रार केली.
आयसीसीने समजावण्याचा प्रयत्न केला, पण बांग्लादेश तयार झाला नाही. अखेर त्यांना स्पर्धेबाहेर ठेवण्यात आलं. त्यानंतर पाकिस्तानने बांग्लादेशच्या समर्थनार्थ भारताविरुद्ध सामना न खेळण्याची भूमिका घेतली आणि वाद आणखी चिघळला. शेवटी आयसीसी, पीसीबी आणि बीसीबी यांच्या संयुक्त चर्चेनंतर हा पेच सुटला आणि पाकिस्तानने बहिष्काराचा निर्णय मागे घेतला.
थोडक्यात सांगायचं तर, क्रिकेट बोर्डांच्या हालचाली झाल्यानंतर अखेर भारत–पाकिस्तान सामना निश्चित झाला आहे. आता 15 फेब्रुवारी रोजी ‘मेन इन ग्रीन’ मैदानात उतरणार असून जगभरातील क्रिकेट चाहते या सामन्याकडे डोळे लावून बसले आहेत. हा सामना केवळ दोन संघांमधला नाही, तर प्रतिष्ठेचा असणार आहे.