हैदराबाद : नुकत्याच पार पडलेल्या आशिया चषक स्पर्धेमध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात तीन धमाकेदार सामने खेळले गेले. या तिन्ही सामन्यांमध्ये पाक संघाला टीम इंडियाने पराभवाची धूळ चारली. अंतिम सामन्यात तर तिलक वर्माने पाकिस्तान संघाचे वस्त्रहरण करण्यात मोलाचा वाटा उचलला.
आशिया चषकच्या अंतिम सामन्यात पाकिस्तानविरुद्ध नाबाद 69 धावांची मॅच विनिंग खेळी करून भारताला विजेतेपद मिळवून देणाऱ्या युवा फलंदाज तिलक वर्माची सर्वत्र चर्चा आहे. 28 सप्टेंबर रोजी दुबईत झालेल्या या अत्यंत चुरशीच्या अंतिम सामन्यात तिलकने 53 चेंडूंमध्ये 3 चौकार आणि 4 षटकार लगावले. या दमदार कामगिरीमुळेच टीम इंडियाला अंतिम षटकात रोमांचक विजय नोंदवता आला.
अंतिम सामन्याचा नायक ठरलेला तिलक टीम इंडियाला चॅम्पियन बनवून भारतात परतला आहे. 29 सप्टेंबर रोजी आपल्या हैदराबाद शहरात त्याचे आगमन होताच, त्याचे भव्य स्वागत करण्यात आले. येथे माध्यमांशी संवाद साधताना, त्याने कर्णधार सूर्यकुमार यादव याच्या वक्तव्याचा पुनरुच्चार करत स्पष्ट केले की, सध्याच्या काळात पाकिस्तान भारताची बरोबरी करू शकत नाही.
माध्यमांशी संवाद साधताना तिलकने सांगितले की, कर्णधार सूर्यकुमार यादव याच्या मताशी तो सहमत आहे. आता भारत-पाकिस्तान ही फार मोठी प्रतिस्पर्धा राहिलेली नाही. पाकिस्तानचा संघ आमच्या संघासमोर टिकाव धरण्याच्या लायकीचा नाही. मात्र, प्रत्येक संघाप्रमाणे त्यांनीही वेगवेगळ्या व्यूहरचना आखल्या होत्या. भारत-पाकिस्तान सामन्यात दबाव निश्चितच होता, असे त्याने मान्य केले.
रोमांचक अंतिम लढतीबद्दल बोलताना तिलक म्हणाला की, 147 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना त्याच्यावर दबाव होता, परंतु त्याच्या मनात केवळ आपला संघच कसा जिंकेल याचा विचार होता. 140 कोटी भारतीयांसाठी सामना जिंकणे हेच प्राधान्य होते, अशी भावना त्याने व्यक्त केली.
तिलक ज्यावेळी फलंदाजीसाठी मैदानावर उतरला, त्यावेळी भारताची धावसंख्या 2 बाद 10 अशी होती आणि लवकरच ती 3 बाद 20 झाली. त्याने सांगितले की, या कठीण परिस्थितीत पाकिस्तानी खेळाडू मानसिक दबाव आणण्याचा प्रयत्न करत होते. तो म्हणाला, ‘टीम इंडियाच्या तीन विकेट्स पडताच, पाकिस्तानच्या खेळाडूंनी आमच्यावर दबाब वाढवण्यासाठी जोरदार स्लेजिंग सुरू केले. पण कसल्याही परिस्थितीत भारताला विजय मिळवून देऊ असे मनाशी पक्के केले. प्रतिस्पर्ध्यांना बॅटनेच प्रत्युत्तर द्यायचे हे ठरवले. यादरम्यान, पाक खेळाडूंच्या स्लेजिंगच्या जाळ्यात अडकायचे नाही याचाही निश्चय केला. ज्यात यश आले,’ असे त्याने सांगितले.
वेगवान गोलंदाज हारिस रऊफने टाकलेल्या अखेरच्या षटकात भारताला विजयासाठी १० धावांची आवश्यकता होती. त्या क्षणापर्यंत आपण दबावातून बाहेर पडलो होतो, असे तिलक वर्माने सांगितले. तो म्हणाला, ‘मी अखेरच्या षटकात दबावाखाली नव्हतो. मला माहीत होते की मी सामना जिंकणार आहे. मी फक्त माझ्या देशाचा विचार करत होतो आणि प्रत्येक चेंडूवर लक्ष केंद्रित करत होतो. देशासाठी चांगली कामगिरी करण्याबद्दल माझा स्वतःवर विश्वास होता आणि मला याचा खूप अभिमान आहे,’ अशी भावना त्याने व्यक्त केली.