IND vs OMA
अबू धाबी: आशिया चषक स्पर्धेत शुक्रवारी ओमानचा ४३ वर्षीय खेळाडू आमिर कलीमच्या झुंझार अर्धशतकाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. अनुभवी कलीमने उष्णता आणि क्रॅम्प्सची पर्वा न करता, भारताच्या बलाढ्य गोलंदाजीसमोर ओमानला विजय मिळवून देण्याचा आटोकाट प्रयत्न केला. त्याच्या ६४ धावांच्या खेळीमुळे ओमानने जागतिक विजेत्या भारताला विजयासाठी कडवी झुंज दिली.
आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत अंतिम साखळी सामन्यात गुरुवारी तुलनेने दुबळा समजल्या जाणाऱ्या ओमान संघाने विजेतेपदाचा प्रबळ दावेदार समजल्या जाणाऱ्या भारतीय संघाला चांगलेच झुंजवले. भारताने हा सामना जरी २१ धावांनी जिंकला तरी ओमानने २० षटकांत ४ बाद १६७ धावा काढत दिलेली झुंज कौतुकास्पद ठरली. भारताकडून संजू सॅमसनने ४५ चेंडूंत ५६ धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली, तर ओमानकडून अमीर कलीमने ४६ चेंडूंत ६४ धावा तर हमद मिझनि ३३ चेंडूंत ५१ धावा काढत भारतीय गोलंदाजांचा धैर्यान सामना केला. विशेष म्हणजे या लढतीत ओमानने भारताचे आठ फलंदाज बाद केले.
पाकिस्तानातून स्थलांतरित झालेला कलीम २०१२ पासून ओमान क्रिकेटचा भाग आहे. कधी गोलंदाज तर कधी मधल्या फळीतील फलंदाज अशा विविध भूमिकांतून प्रवास करत त्याने आता सलामीवीर म्हणून आपले स्थान पक्के केले आहे. भारतासारख्या मजबूत संघाविरुद्ध त्याने मोठी खेळी साकारत आपण आजही तंदुरुस्त असल्याचे दाखवून दिले.
हम्माद मिर्झा (५१) सोबत दुसऱ्या विकेटसाठी ९३ धावांची दमदार भागीदारी करत कलीमने ओमानच्या विजयाच्या आशा पल्लवित केल्या. एका क्षणासाठी भारताचे गोलंदाजही गोंधळल्याचे दिसले. मात्र, हार्दिक पांड्याने सीमारेषेवर कलीमचा अविश्वसनीय झेल घेत ही जोडी फोडली आणि सामन्याचे चित्र पालटले.
कलीमच्या खेळीमुळे ओमानने दिलेली झुंज कौतुकास्पद होती, पण अखेर भारताने २१ धावांनी विजय मिळवला. भारताकडून संजू सॅमसन (५६) आणि अभिषेक शर्मा (३८) यांनी दमदार फलंदाजी केली होती. गोलंदाजीत अर्शदीप सिंगने आपला १०० वा टी-२० बळी घेतला. कलीमच्या या खेळीचे ओमानचा कर्णधार जतींदर सिंगने कौतुक केले. तो म्हणाला, "आमच्या खेळाडूंनी दाखवलेल्या जिद्दीचा आणि मेहनतीचा मला अभिमान आहे. त्यांनी दडपणाखाली उत्तम कामगिरी केली."
कलीमची ही खेळी केवळ धावांची नोंद नव्हती, तर ४३ व्या वर्षीही अनुभव आणि जिद्द एखाद्या बलाढ्य संघालाही धक्का देऊ शकते, हे त्याने पुन्हा एकदा सिद्ध करून दाखवले.