

अबुधाबी; वृत्तसंस्था : आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत अंतिम साखळी सामन्यात गुरुवारी तुलनेने दुबळा समजल्या जाणार्या ओमान संघाने विजेतेपदाचा प्रबळ दावेदार समजल्या जाणार्या भारतीय संघाला चांगलेच झुंजवले. भारताने हा सामना जरी 21 धावांनी जिंकला तरी ओमानने 20 षटकांत 4 बाद 167 धावा काढत दिलेली झुंज कौतुकास्पद ठरली. भारताकडून संजू सॅमसनने 45 चेंडूंत 56 धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली, तर ओमानकडून अमीर कलीमने 46 चेंडूंत 64 धावा तर हमद मिर्झाने 33 चेंडूंत 51 धावा काढत भारतीय गोलंदाजांचा धैर्याने सामना केला. विशेष म्हणजे या लढतीत ओमानने भारताचे आठ फलंदाज बाद केले.
प्रथम फलंदाजी करताना या लढतीत भारतीय संघाने ओमानसमोर 188 धावसंख्या उभारली. मधल्या फळीतील फलंदाज संजू सॅमसनने 45 चेंडूंत 56 धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. त्याने 3 चौकार आणि 3 षटकारांची आतषबाजी केली. कर्णधार सूर्यकुमार यादवने स्वतःला 11 व्या क्रमांकावर पाठवून संघातील प्रत्येक खेळाडूला फलंदाजीची संधी दिली. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना, उपकर्णधार शुभमन गिल (5 धावा) स्वस्तात बाद झाला. संजू सॅमसनने तिसर्या क्रमांकावर फलंदाजीला येत संघाचा डाव सांभाळला. सुरुवातीला त्याला काही अडचणी आल्या, तरी त्याने तीन चौकार आणि तीन षटकारांसह आपले अर्धशतक पूर्ण केले. अभिषेक शर्माने 15 चेंडूंमध्ये 38 धावांची तुफानी खेळी केली. अक्षर पटेलला (26 धावा) तिलक वर्माच्या (29 धावा) आधी फलंदाजीसाठी पाठवण्यात आले. हार्दिक पंड्यालाही काही फटके मारण्याची संधी मिळाली, पण तो दुर्दैवाने धावबाद झाला. अखेरच्या षटकांमध्ये हर्षित राणाने 13 धावांचे योगदान देत संघाची धावसंख्या 188 पर्यंत नेली.
विजयासाठी 189 धावांचे मोठे आव्हान घेऊन मैदानावर उतरलेल्या ओमानला भारत सहज हरवेल, असे वाटले होते, पण ओमानच्या फलंदाजांनी भारतीय गोलंदाजाचा धैर्याने सामना करत फलंदाजी केली. सलामीवीर जितेंदर सिंग (32 धावा) आणि अमीर कलीम (64 धावा) यांनी शानदार सलामी देत 56 धावांची भागीदारी केली. 5 चौकारांसह 32 धावा काढणार्या जितेंदरला फिरकी गोलंदाज कुलदीप यादव त्रिफळाचित केले. त्यानंतर कलीमने हमद मिर्झासह 93 धावांची शानदार भागीदारी केली. दोघांनी भारतीय गोलंदाजीचा समाचार घेतला. कलीमने 46 चेंडूंत 64 धावा काढताना 7 चौकार आणि 2 षटकार मारले, तर हमद मिर्झाने 5 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने 33 चेंडूंत 51 धावांची दमदार खेळी साकारली.
कलीमला हर्षित राणाने बाद केले. तर हमद मिर्झाला हार्दिक पंड्याने तंबूत धाडले. त्यानंतर जिकरिया इस्लाम 0, विनायक शुक्ला 2, जितेनकुमार 12 हे स्वस्तात बाद झाले. भारताकडून आठजणांनी गोलंदाजी केली. कुलदीप यादव, हार्दिक पंड्या, अर्शदीप सिंग, हर्षित राणा यांनी प्रत्येकी 1 बळी घेतला. अक्षर पटेल, शुभम दुबे, तिलक वर्मा आणि अभिषेक शर्मा यांनी गोलंदाजी केली. या लढतीत भारताने स्टार गोलंदाज जसप्रीत बुमराह आणि फिरकी गोलंदाज वरुण चक्रवर्ती या हुकमी खेळाडूंना विश्रांती दिली.