स्पोर्ट्स

IND vs NZ Test : ५८ वर्षांत २ मालिका विजय! न्यूझीलंडमध्ये कशी आहे टीम इंडियाची कसोटी कामगिरी? कर्णधार गिलसमोर मोठे आव्हान

न्यूझीलंडचा संघ घरच्या मैदानावर आपली ही विजयी घोडदौड कायम ठेवण्यास उत्सुक

रणजित गायकवाड

मुंबई : टी-२० आणि एकदिवसीय मालिकांच्या यशस्वी समाप्तीनंतर आता भारत आणि न्यूझीलंड यांच्यात दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेचा थरार रंगणार आहे. दोन्ही संघांमधील या प्रतिष्ठेच्या कसोटी मालिकेला येत्या गुरुवारपासून (१९ नोव्हेंबर) सुरुवात होत असून, पहिला सामना वेलिंग्टन येथील प्रसिद्ध 'बेसिन रिझर्व्ह' मैदानावर खेळवला जाणार आहे. या दौऱ्यात आतापर्यंत भारतीय संघाने टी-२० आणि एकदिवसीय मालिका जिंकून आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. मात्र, कसोटी क्रिकेटमध्ये घरच्या मैदानावर भारताविरुद्ध असलेला आपला अलीकडचा दबदबा कायम राखण्यासाठी आणि विजयाची परंपरा पुढे नेण्यासाठी यजमान न्यूझीलंडचा संघ सर्वतोपरी प्रयत्न करेल.

आयसीसी जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या (WTC २०२५-२७) गुणतालिकेत अव्वल स्थानावर विराजमान असलेला न्यूझीलंडचा संघ घरच्या मैदानावर आपली ही विजयी घोडदौड कायम ठेवण्यास उत्सुक आहे. टॉम लॅथमच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या किवी संघाने भारताविरुद्ध मायदेशात आणि परदेशात खेळलेल्या गेल्या तिन्ही कसोटी सामन्यांमध्ये शानदार विजय संपादन केले आहेत. त्यामुळे विजयाची हीच मालिका पुढे सुरू ठेवण्याच्या इराद्याने यजमान संघ मैदानात उतरेल.

या मालिकेसाठी न्यूझीलंडने आपला पूर्ण ताकदीचा आणि अनुभवी संघ जाहीर केला आहे. याउलट, भारतीय संघात निवड झालेल्या १६ खेळाडूंपैकी केवळ तीनच खेळाडूंना न्यूझीलंडच्या खेळपट्ट्यांवर कसोटी सामने खेळण्याचा अनुभव आहे. त्यामुळे अनुभवाची ही कमतरता भरून काढत मजबूत किवी संघाशी दोन हात करणे, ही बाब कर्णधार शुभमन गिलसाठी अत्यंत चिंतेची आणि आव्हानात्मक ठरू शकते.

भारतीय संघाने १९६८ च्या सुरुवातीला पहिल्यांदाच न्यूझीलंडचा दौरा केला होता. तेव्हापासून आजतागायत भारताने न्यूझीलंडमध्ये एकूण १० कसोटी मालिका खेळल्या आहेत, परंतु त्यापैकी केवळ दोनच मालिका जिंकण्यात भारतीय संघाला यश आले आहे. नवाब मन्सूर अली खान पतौडी यांच्या नेतृत्वाखाली भारताने आपल्या पहिल्याच न्यूझीलंड दौऱ्यात चार सामन्यांची कसोटी मालिका ३-१ अशा फरकाने जिंकून ऐतिहासिक कामगिरी नोंदवली होती. यानंतर पुढील मालिका विजयासाठी भारताला तब्बल ४१ वर्षांची प्रदीर्घ प्रतीक्षा करावी लागली. अखेर २००९ मध्ये महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली भारताने हा दुष्काळ संपवत दुसरा मालिका विजय साकारला. या दोन विजयांच्या मधल्या काळात काही मालिका अनिर्णित राहिल्या, तर सहा सामन्यांमध्ये यजमान किवी संघाने बाजी मारली.

एकूण सामन्यांच्या आकडेवारीवर नजर टाकल्यास, भारतीय संघाने न्यूझीलंडच्या भूमीवर आतापर्यंत २५ कसोटी सामने खेळले असून, त्यापैकी केवळ ५ सामन्यांमध्येच भारताला विजयाची चव चाखता आली आहे. विशेष म्हणजे, या पाच विजयांपैकी तीन विजय भारताने १९६८ च्या आपल्या पहिल्याच दौऱ्यात मिळवले होते. या शतकाच्या सुरुवातीपासूनचा विचार केल्यास, भारताने न्यूझीलंडमध्ये खेळलेल्या एकूण ९ कसोटी सामन्यांपैकी केवळ एकाच सामन्यात विजय मिळवला आहे, तर ५ सामन्यांत पराभव पत्करावा लागला आहे आणि ३ सामने अनिर्णित राहिले आहेत. तसेच, न्यूझीलंडच्या मागील कसोटी दौऱ्यात भारतीय संघाला लाजिरवाण्या 'क्लीन स्वीप'ला सामोरे जावे लागले होते. त्यामुळे हा जुना इतिहास बदलून नव्या जोमाने मैदानात उतरण्याचे मोठे आव्हान कर्णधार गिल आणि भारतीय संघासमोर असणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT