मुंबई : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील टी-२० मालिकेला बुधवारपासून (२१ जानेवारी) सुरुवात होत आहे. मात्र, या महत्त्वपूर्ण मालिकेच्या एक दिवस आधीच न्यूझीलंडच्या संघात अचानक मोठा बदल करण्यात आला आहे. न्यूझीलंडचा अष्टपैलू खेळाडू मायकेल ब्रेसवेल दुखापतग्रस्त झाल्याने पाहुण्या संघासमोर पेच निर्माण झाला असून, त्याच्या जागी २४ वर्षीय युवा वेगवान गोलंदाजाचा संघात समावेश करण्यात आला आहे.
इंदूरमध्ये खेळल्या गेलेल्या तिसऱ्या आणि शेवटच्या एकदिवसीय सामन्यादरम्यान मायकेल ब्रेसवेलला दुखापत झाली होती. त्याच्या डाव्या पायाच्या स्नायूला ताण आल्याने त्याला मैदान सोडावे लागले होते. याच कारणामुळे तो पहिल्या टी-२० सामन्यात खेळण्याची शक्यता धूसर आहे.
ब्रेसवेलसोबतच वेगवान गोलंदाज ॲडम मिल्ने हा देखील हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीतून सावरत आहे. परिणामी, हे दोन्ही अनुभवी खेळाडू किमान पहिल्या तीन टी-२० सामन्यांना मुकणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यांच्या अनुपस्थितीत आता २४ वर्षीय वेगवान गोलंदाज ख्रिस्टियन क्लार्क याला टी-२० संघात पाचारण करण्यात आले आहे.
नुकत्याच पार पडलेल्या एकदिवसीय मालिकेत ख्रिस्टियन क्लार्कने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. आपल्या पहिल्याच मालिकेत क्लार्कने प्रभावी गोलंदाजी करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले. त्याने ३ एकदिवसीय सामन्यांत ७ बळी टिपले असून, रोहित शर्मा आणि विराट कोहली यांसारख्या दिग्गज फलंदाजांना आपल्या माऱ्याने त्रस्त केले होते. त्याच्या याच चमकदार कामगिरीची पावती म्हणून त्याला टी-२० संघात स्थान मिळाले आहे.
टी-२० विश्वचषक २०२६ च्या पार्श्वभूमीवर ही मालिका दोन्ही संघांसाठी 'ड्रेस रिहर्सल' मानली जात आहे. ७ फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या विश्वचषकापूर्वी ब्रेसवेल आणि मिल्ने यांसारख्या महत्त्वाच्या खेळाडूंची दुखापत न्यूझीलंडसाठी चिंतेची बाब ठरली आहे. हे खेळाडू विश्वचषकापर्यंत पूर्णपणे तंदुरुस्त होतील की नाही, याबाबत साशंकता आहे.
मिचेल सँटनर (कर्णधार), मायकेल ब्रेसवेल, मार्क चॅपमन, ख्रिस्टियन क्लार्क (पहिल्या ३ सामन्यांसाठी), डेव्हन कॉन्वे, जेकब डफी, जॅक फॉल्क्स, मॅट हेन्री, काईल जेमिसन, बेवोन जेकब्स, डॅरेल मिचेल, जेम्स नीशम, ग्लेन फिलिप्स, रचिन रवींद्र, टिम रॉबिन्सन आणि ईश सोधी.