स्पोर्ट्स

IND vs NZ 2nd T20 : टीम इंडिया दुस-या सामन्यात 2 बदलांसह मैदानात उतरणार? कुलदीप यादवला संधी मिळण्याची शक्यता

भारतीय संघाचा डोळा आता दुसऱ्या सामन्यावरही कब्जा करून आघाडी दुप्पट करण्यावर

रणजित गायकवाड

रायपूर : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील ५ टी-२० सामन्यांच्या मालिकेतील दुसरी लढत शुक्रवारी (दि. २२) रायपूरच्या शहीद वीर नारायण सिंह आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर रंगणार आहे. नागपूरमधील पहिल्या सामन्यात दिमाखदार विजय मिळवून मालिकेची दणदणीत सुरुवात करणाऱ्या भारतीय संघाचा डोळा आता दुसऱ्या सामन्यावरही कब्जा करून आघाडी दुप्पट करण्यावर असेल. हा सामना सायंकाळी ७:०० वाजता सुरू होईल.

सलामीच्या जोडीत बदलाची शक्यता कमी

पहिल्या सामन्यात ४८ धावांनी विजय मिळवल्यानंतर भारतीय संघ व्यवस्थापन आपल्या 'प्लेइंग ११' मध्ये काही धोरणात्मक बदल करण्याची शक्यता आहे. फलंदाजीचा विचार करता, पहिल्या सामन्यात संजू सॅमसन अपयशी ठरला असला तरी, तो अभिषेक शर्मा सोबत सलामीला दिसेल. तिसऱ्या क्रमांकावर ईशान किशनला पुन्हा एकदा संधी मिळण्याची दाट शक्यता आहे. टी-२० विश्वचषक २०२६ च्या संघात स्थान मिळाल्यामुळे त्याला आपली लय गवसण्यासाठी पुरेसे सामने खेळवले जाणार आहे हे निश्चित.

सूर्यकुमार लयीत, रिंकू सिंहला बढती मिळणार?

चौथ्या क्रमांकावर कर्णधार सूर्यकुमार यादव स्वतः मैदानात उतरेल. गेल्या काही काळापासून फॉर्मसाठी झगडणाऱ्या 'स्काय'ने नागपूरमध्ये २२ चेंडूत ३२ धावांची खेळी करत लयीत परतण्याचे संकेत दिले आहेत. पाचव्या क्रमांकावर 'फिनिशर' रिंकू सिंहला पाठवले जाऊ शकते. पहिल्या सामन्यात २० चेंडूत नाबाद ४४ धावांची तुफानी खेळी करणाऱ्या रिंकूला फलंदाजीच्या क्रमवारीत बढती दिली जाण्याची शक्यता आहे.

अक्षर पटेलच्या दुखापतीने कुलदीपचा मार्ग मोकळा?

सहाव्या क्रमांकावर हार्दिक पंड्या अष्टपैलू म्हणून आपली जबाबदारी पार पाडेल. मात्र, अष्टपैलू अक्षर पटेलला गेल्या सामन्यात दुखापत झाली होती, त्याच्या सहभागाबाबत अद्याप संभ्रम आहे. जर अक्षर फिट नसेल, तर 'चायनामन' गोलंदाज कुलदीप यादवची अंतिम अकरामध्ये एन्ट्री निश्चित मानली जात आहे. याशिवाय शिवम दुबेच्या जागी हर्षित राणाला आजमावले जाऊ शकते, मात्र याची शक्यता कमी आहे. वेगवान गोलंदाजीची धुरा जसप्रीत बुमराह आणि अर्शदीप सिंह या जोडीवर असेल, तर फिरकीसाठी वरुण चक्रवर्ती सज्ज असेल.

भारताची संभाव्य प्लेइंग ११

संजू सॅमसन (यष्टीरक्षक), अभिषेक शर्मा, ईशान किशन, सूर्यकुमार यादव (कर्णधार), रिंकू सिंह, हार्दिक पंड्या, अक्षर पटेल/कुलदीप यादव, शिवम दुबे/हर्षित राणा, वरुण चक्रवर्ती, अर्शदीप सिंह, जसप्रीत बुमराह.

थेट प्रक्षेपण कधी आणि कुठे?

  • तारीख : २३ जानेवारी २०२६, शुक्रवार.

  • स्थळ : शहीद वीर नारायण सिंह आंतरराष्ट्रीय स्टेडियम, रायपूर.

  • वेळ : सायंकाळी ७:०० वाजता (टॉस सायंकाळी ६:३० वाजता).

  • टीव्ही प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स नेटवर्क (Star Sports Network).

  • मोबाईल/ओटीटी : जिओ हॉटस्टार (Jio Hotstar) ॲपवर थेट प्रक्षेपण पाहता येईल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT