नागपूर : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील टी-२० मालिकेचा थरार बुधवारपासून (२१ जानेवारी) सुरू होत आहे. मालिकेतील पहिल्या सामन्यापूर्वी भारतीय संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादवने एक मोठी घोषणा केली असून, यामुळे भारतीय संघाची फलंदाजीची फळी कशी असेल, याचे चित्र स्पष्ट झाले आहे. विशेष म्हणजे, भारताचा एक धडाकेबाज खेळाडू तब्बल २६ महिन्यांनंतर टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन करण्यासाठी सज्ज झाला आहे.
भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पाच सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना नागपूरच्या मैदानावर रंगणार आहे. या सामन्यासाठी बीसीसीआयने आधीच संघ जाहीर केला होता, ज्यामध्ये संजू सॅमसन आणि ईशान किशन या दोन यष्टिरक्षक फलंदाजांचा समावेश आहे. संजू सॅमसन हा यष्टिरक्षणासाठी पहिली पसंती असेल हे निश्चित होते, मात्र तिलक वर्मा पहिल्या तीन सामन्यांतून बाहेर पडल्यामुळे ईशान किशनसाठी संघात स्थान मिळवण्याचे दरवाजे उघडले आहेत.
ईशान किशन हा प्रामुख्याने सलामीवीर असला तरी, टी-२० क्रिकेटमध्ये तिसऱ्या क्रमांकाच्या फलंदाजाला अनेकदा सलामीवीराचीच भूमिका पार पाडावी लागते. सामन्यासंदर्भात माध्यमांशी संवाद साधताना कर्णधार सूर्यकुमार यादवने स्पष्ट केले की, अभिषेक शर्मा आणि संजू सॅमसन ही जोडी डावाची सुरुवात करेल, तर ईशान किशन तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी उतरेल. खुद्द कर्णधार सूर्यकुमार यादव चौथ्या क्रमांकावर आणि हार्दिक पंड्या पाचव्या क्रमांकावर खेळताना दिसतील.
ईशान किशनने १४ मार्च २०२१ रोजी इंग्लंडविरुद्ध अहमदाबादमध्ये आंतरराष्ट्रीय पदार्पण केले होते. मात्र, कामगिरीतील चढ-उतारामुळे तो दीर्घकाळ संघाबाहेर राहिला. त्याने आपला शेवटचा टी-२० सामना २८ नोव्हेंबर २०२३ रोजी खेळला होता. त्यानंतर संघातून वगळण्यात आलेल्या ईशानने देशांतर्गत क्रिकेटमध्ये दमदार कामगिरी करून पुन्हा एकदा राष्ट्रीय संघात आपले स्थान पक्के केले आहे. आगामी टी-२० वर्ल्डकपसाठीही त्याची निवड झाली असल्याने ही मालिका त्याच्यासाठी महत्त्वाची ठरणार आहे.
ईशान किशनने आतापर्यंत ३२ टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये ७९६ धावा केल्या आहेत. यामध्ये ६ अर्धशतकांचा समावेश असून त्याची सरासरी २५.६७ इतकी आहे. टी-२० क्रिकेटमध्ये सरासरीपेक्षा 'स्ट्राईक रेट'ला अधिक महत्त्व दिले जाते आणि ईशानचा १२४.३७ चा स्ट्राईक रेट त्याच्या आक्रमक शैलीची साक्ष देतो. आता या पाच सामन्यांच्या मालिकेत ईशान किशनला किती संधी मिळतात आणि तो त्याचे सोने कसे करतो, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.