स्पोर्ट्स

IND vs ENG : ट्रक ड्रायव्हरच्या मुलाचा इंग्लंडवर हल्लाबोल! हरवंश सिंगचे 9व्या क्रमांकावर येत वादळी शतक, 9 षटकारांची आतषबाजी

हरवंश हा मूळचा गुजरातच्या कच्छ प्रदेशातील गांधीधाम येथील रहिवासी आहे. त्याचे कुटुंब सध्या कॅनडा येथे स्थायिक असून, त्याचे वडील ब्रॅम्पटनमध्ये ट्रकचालक म्हणून कार्यरत आहेत.

रणजित गायकवाड

ind vs eng u19 son of truck driver harvansh singh hit century in 52 balls

भारताच्या 19 वर्षांखालील क्रिकेट संघाने सध्या इंग्लंड दौऱ्यावर असताना एका सराव सामन्यात लॉफबरो येथे आमंत्रित एकादश संघाविरुद्ध खेळताना शानदार कामगिरी केली. या सामन्यात टीम इंडियाच्या हरवंश सिंग या युवा खेळाडूने नवव्या क्रमांकावर फलंदाजीला येत 9 षटकार ठोकून धडाकेबाज शतक झळकावले. एका ट्रक चालकाचा मुलगा असलेल्या हरवंशने आपल्या या वादळी खेळीने सर्वांचे लक्ष वेधून घेत क्रिकेट विश्वामध्ये खळबळ उडवून दिली आहे.

हरवंश हा मूळचा गुजरातच्या कच्छ प्रदेशातील गांधीधाम येथील रहिवासी आहे. त्याचे कुटुंब सध्या कॅनडा येथे स्थायिक असून, त्याचे वडील ब्रॅम्पटनमध्ये ट्रकचालक म्हणून कार्यरत आहेत.

भारताच्या 19 वर्षांखालील संघाला यजमान इंग्लंडविरुद्ध पाच युवा एकदिवसीय आणि दोन युवा कसोटी सामन्यांची मालिका खेळायची आहे. या मालिकेचा प्रारंभ 27 जून रोजी होणार आहे. तत्पूर्वी, लॉफबरो येथे 50 षटकांचा सराव सामना खेळवण्यात आला.

यजमान संघाने टॉस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. आयपीएल 2025 मध्ये एमएस धोनीच्या सीएसके संघाकडून सलामी देणारा आयुष म्हात्रे आणि वैभव सूर्यवंशी यांनी भारतीय डावाची सुरुवात केली. पण ही जोडी सपशेल अपयशी ठरली. दोघांमी मिळून केवळ 18 धावाच केल्या. डावाच्या दुसऱ्या षटकात म्हात्रे, तर पाचव्या षटकात सूर्यवंशी तंबूत परतला.

हरवंश सिंग पंगालियाची झंझावाती खेळी

भारतीय संघाची 13 व्या षटकात अवस्था 5 बाद 91 अशी झाली. त्यानंतर कनिष्क चौहान (79) आणि राहुल कुमार (73) यांनी संघाचा डाव सावरला. त्यांनी 112 चेंडूंमध्ये 140 धावांची भागीदारी रचली.

36 व्या षटकात भारताची धावसंख्या 7 बाद 251 असताना, हरवंश सिंग पंगालिया आर. एस. अंबरीशच्या साथीने फलंदाजीसाठी मैदानात उतरला. या जोडीने 126 धावांची भागीदारी केली, ज्यामध्ये अंबरीशने 47 चेंडूंमध्ये 72 धावांचे योगदान देत उत्कृष्ट फटकेबाजी केली. अंबरीश बाद झाला तेव्हा पंगालिया 33 चेंडूंमध्ये 47 धावांवर खेळत होता आणि त्यानंतरच्या चेंडूवर चौकार मारून त्याने आपले अर्धशतक पूर्ण केले.

डावाच्या अंतिम तीन षटकांमध्ये, 18 वर्षीय हरवंश सिंगने इंग्लिश गोलंदाजांवर जोरदार हल्ला चढवला. त्याने 48 व्या षटकाची सुरुवात करणा-या मॅनी लम्सडेनच्या गोलंदाजीवर सलग दोन षटकार ठोकले. ज्यानंतर गोलंदाजाने सलग दोन नो-बॉल देखील टाकले.

पुढील षटकात हरवंश सिंगने मॅथ्यू फिरबँकलाही एक षटकार लगावला. त्यानंतर डावाच्या अंतिम षटकात, त्याने लम्सडेनला एक चौकार आणि सलग तीन षटकार ठोकत डावाची प्रभावी समाप्ती केली. शेवटच्या षटकारासह त्याने केवळ 52 चेंडूत शतक पूर्ण केले. विशेष म्हणजे, त्याचे दुसरे अर्धशतक अवघ्या 18 चेंडूंमध्ये आले. यासह भारताने 9 बाद 442 धावांची विशाल धावसंख्या उभारली.या युवा तळाच्या फलंदाजाने आपल्या धडाकेबाज खेळीत नऊ षटकार लगावले, ज्यामध्ये लेग-साइडची सीमारेषा हे त्याचे आवडते लक्ष्य ठरली.

हरवंश हा एक यष्टीरक्षक-फलंदाज असून, देशांतर्गत क्रिकेटमध्ये सौराष्ट्र युवा संघाचे प्रतिनिधित्व करतो. मागील वर्षी ऑक्टोबर महिन्यात, ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या एका युवा सामन्यात त्याने सात चौकार आणि सहा षटकारांसह 117 धावांची खेळी केली होती.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT