स्पोर्ट्स

IND vs ENG Test : दुसऱ्या कसोटीपूर्वी भारतीय संघात मोठा बदल, वेगवान गोलंदाज मायदेशी परतणार

लीड्स कसोटी सामन्यात भारतीय संघाच्या पराभवाची दोन प्रमुख कारणे होती; एक म्हणजे खराब क्षेत्ररक्षण आणि दुसरे म्हणजे बुमराह वगळता इतर कोणत्याही गोलंदाजाला अपेक्षेनुसार कामगिरी करता आली नाही.

रणजित गायकवाड

इंग्लंडविरुद्धच्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यात भारतीय संघाला 5 गडी राखून पराभव पत्करावा लागला. या सामन्यात भारतीय गोलंदाजांना 371 धावांच्या लक्ष्याचा बचाव करण्यात पूर्णपणे अपयश आले. दरम्यान, दुसऱ्या कसोटी सामन्यापूर्वी भारतीय संघाने एक मोठा निर्णय घेतला असून, वेगवान गोलंदाज हर्षित राणा याला मुख्य संघातून मुक्त (रिलीज) केले आहे. या मालिकेतील पुढील सामना भारतीय संघाला 2 जुलैपासून बर्मिंगहॅमच्या मैदानावर खेळायचा आहे.

हर्षित राणा मायदेशी परतणार

इंग्लंडविरुद्धच्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी जेव्हा भारतीय संघाची घोषणा करण्यात आली, तेव्हा त्यात हर्षित राणाचे नाव नव्हते. राणा भारत-अ संघाचा भाग होता, जिथे त्याला इंग्लंड लायन्स संघाविरुद्धच्या 2 अनौपचारिक कसोटी सामन्यांच्या मालिकेत खेळायचे होते. या मालिकेनंतर खबरदारीचा उपाय म्हणून राणाला संघात सामील करण्यात आले होते, तर उर्वरित खेळाडू मायदेशी परतले होते. आता लीड्स कसोटी सामना संपल्यानंतर, संघ व्यवस्थापनाने हर्षित राणाला संघातून मुक्त करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे तो आता मायदेशी परतणार आहे.

बीसीसीआयच्या एका सूत्राने नाव न सांगण्याच्या अटीवर वृत्तसंस्था पीटीआयला सांगितले की, ‘हर्षित राणाला संघातून मुक्त करण्यात आले आहे. दोन जुलैपासून सुरू होणाऱ्या दुसऱ्या कसोटीसाठी तो भारतीय संघासोबत बर्मिंगहॅमला जाणार नाही.’

बुमराह वगळता लीड्स कसोटीत इतर गोलंदाज निष्प्रभ

लीड्स कसोटी सामन्यात भारतीय संघाच्या पराभवाची दोन प्रमुख कारणे होती; एक म्हणजे खराब क्षेत्ररक्षण आणि दुसरे म्हणजे जसप्रीत बुमराह वगळता इतर कोणत्याही गोलंदाजाला अपेक्षेनुसार कामगिरी करता आली नाही. यामध्ये सर्वात खराब कामगिरी प्रसिद्ध कृष्णाची राहिली, ज्याने या सामन्यात एकूण 220 धावा दिल्या आणि केवळ 5 गडी बाद केले. दुसरीकडे, मोहम्मद सिराजलाही केवळ 2 गडी बाद करण्यात यश आले. त्यामुळे, बर्मिंगहॅम कसोटी सामन्यात भारतीय संघाच्या अंतिम 11 खेळाडूंमध्ये बदल निश्चित मानला जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT