मँचेस्टर : भारत आणि इंग्लंड यांच्यात मँचेस्टर येथे सुरू असलेल्या कसोटी सामन्यात, भारतीय संघाच्या केएल राहुल आणि शुभमन गिल या जोडीने एक महत्त्वपूर्ण विक्रम आपल्या नावे केला आहे. दुसऱ्या डावात फलंदाजी करताना या दोघांनी केलेल्या भागीदारीमुळे इंग्लंडच्या भूमीवर 23 वर्षे जुना विक्रम मोडीत निघाला आहे.
भारत आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिकेतील चौथ्या सामन्याचा पाचवा दिवस सध्या सुरू आहे. या सामन्याच्या दुसऱ्या डावात भारतीय संघाची सुरुवात अत्यंत निराशाजनक झाली होती. धावफलकावर एकही धाव न लावता भारताने आपले दोन प्रमुख गडी गमावले होते. यानंतर, तिसऱ्या गड्यासाठी केएल राहुल आणि शुभमन गिल यांनी डाव सावरला. या दोघांनी मिळून तिसऱ्या गड्यासाठी 188 धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी रचली. ही भागीदारी करताना त्यांनी तब्बल 417 चेंडूंचा सामना केला आणि यासह इंग्लंडमध्ये एक नवा इतिहास रचला.
इंग्लंडमध्ये एका भागीदारीत सर्वाधिक चेंडू खेळण्याचा विक्रम यापूर्वी राहुल द्रविड आणि संजय बांगर यांच्या नावावर होता. त्यांनी 2002 साली लीड्स कसोटीत 170 धावांची भागीदारी करताना 405 चेंडूंचा सामना केला होता. तर सचिन तेंडुलकर आणि सौरव गांगुली या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहेत. या जोदीने त्याच्या भागीदारीत 357 चेंडू खेळले होते.
चौथ्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या डावात केएल राहुलला एक उत्कृष्ट शतक झळकावण्याची संधी होती, मात्र त्याचे शतक केवळ 10 धावांनी हुकले. त्याने 230 चेंडूंत 8 चौकारांसह 90 धावांची उत्कृष्ट खेळी साकारली. इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सने त्याला पायचीत (LBW) करून तंबूत परत पाठवले.
दुसरीकडे, भारतीय संघाचा कर्णधार शुभमन गिलने या डावात एक शानदार शतक झळकावले आहे. त्याने 228 चेंडूंत आपले शतक पूर्ण केले. या वृत्तानुसार, 85 षटकांचा खेळ संपल्यानंतर भारतीय संघाने 3 गडी गमावून 213 धावा केल्या आहेत. सद्यस्थितीत, भारतीय संघ इंग्लंडपेक्षा 98 धावांनी पिछाडीवर असून, गिलसोबत वॉशिंग्टन सुंदर खेळपट्टीवर उपस्थित आहे. हा सामना वाचवण्यासाठी भारतीय फलंदाजांना पाचव्या दिवशी अत्यंत संयमी आणि दृढ फलंदाजी करणे आवश्यक आहे.