बर्मिंगहॅम : दुसर्या कसोटी सामन्यात आमचा संघ पाचही दिवस पिछाडीवर राहिला, त्यामुळे पिछेहाट होणे साहजिकच होते. बुमराहच्या गैरहजेरीत भारताने येथे वर्चस्व गाजवले. त्यात आता तिसर्या कसोटीत बुमराह भारतीय संघात परतत असल्याने त्यांचे आव्हान आणखी कडवे असेल. त्यामुळे या तिसर्या कसोटीत जसप्रीत बुमराहच्या पुनरागमनाच्या आव्हानाला सामोरे जाण्यासाठी यजमान संघाला सुसज्ज राहावे लागेल, असे स्पष्ट मत इंग्लंडचे मुख्य प्रशिक्षक ब्रेंडन मॅक्युलम यांनी व्यक्त केले आहे.
यापूर्वी दुसर्या कसोटी सामन्यात बुमराहला विश्रांती देण्यात आली होती. मैदानाबाहेर बसून त्याने आपल्या सहकार्यांना इंग्लंडचा धुव्वा उडवताना पाहिले. भारताने हा सामना तब्बल 336 धावांच्या मोठ्या फरकाने जिंकून पाच कसोटी सामन्यांची मालिका 1-1 अशी बरोबरीत आणली. भारताचा एजबॅस्टन येथील हा पहिलाच कसोटी विजय ठरला.
या मालिकेत पाचपैकी केवळ तीन कसोटी सामने खेळणार असलेल्या बुमराहचे ‘क्रिकेटची पंढरी’ मानल्या जाणार्या लॉर्डस्वर पुनरागमन होणार असल्याची पुष्टी भारतीय कर्णधार शुभमन गिलने दुसर्या कसोटीतील विजयानंतर केली. त्या पार्श्वभूमीवर मॅक्युलम बोलत होते.
ईएसपीएन क्रिकइन्फोशी बोलताना मॅक्युलम म्हणाले, पुढील सामन्यात बुमराहचे पुनरागमन होण्याची दाट शक्यता आहे, याची आम्हाला कल्पना आहे. त्यामुळे आम्हाला सुनियोजित आणि सुसज्ज राहून पुढील आव्हानासाठी तयार राहावे लागेल. माझ्या मते, तेथील खेळपट्टी येथील खेळपट्टीपेक्षा खूप वेगळी असेल आणि ही आमच्यासाठी कदाचित एक चांगली गोष्ट असेल.
आपल्या संघाच्या बर्मिंगहममधील कामगिरीवर बोलताना ते पुढे म्हणाले, आम्ही पाचही दिवस पिछाडीवर होतो. माझ्या मते, भारताने उत्कृष्ट खेळ केला. शुभमन गिलने उच्च दर्जाचा खेळ केला आणि या खेळपट्टीवर उत्कृष्ट फलंदाजी केली. आम्हाला हवा तसा खेळ करता आला नाही आणि ते विजयाचे पूर्णपणे हक्कदार होते.
इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सप्रमाणेच मॅक्युलम यांनीही भारतीय वेगवान गोलंदाज आकाश दीप याचे कौतुक केले. आकाश दीप याने अंतिम दिवशी 99 धावांत 6 बळी घेत भारताच्या विजयात मोलाचा वाटा उचलला होता. माझ्या मते, आकाश दीपने या खेळपट्टीवर उत्कृष्ट गोलंदाजी केली. अशा प्रकारच्या खेळपट्ट्यांवर खेळत तो घडला असल्यामुळे त्या अनुभवाचा त्याला बराच फायदा झाला. त्याने येथे योग्य टप्प्यावर गोलंदाजी केली आणि खेळपट्टीचा पुरेपूर फायदा उचलला. तो विलक्षण होता, असे मॅक्युलम म्हणाले.
इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा घेतलेला निर्णय चुकीचा होता आणि खेळपट्टीचे मूल्यांकन करण्यात संघाकडून चूक झाली, हे मॅक्युलम यांनी मान्य केले.
खेळ जसजसा पुढे सरकत गेला, तसतसे आम्ही त्या नाणेफेकीकडे मागे वळून पाहिले आणि विचार केला की, आम्ही संधी गमावली का आणि हे कदाचित योग्य आहे. खेळपट्टी अशाप्रकारे वागेल, अशी आमची अपेक्षा नव्हती आणि त्यामुळे आमचा अंदाज थोडा चुकला.
आम्ही त्यांना 5 बाद 200 अशा स्थितीत रोखून धरले होते. परंतु, आम्ही त्या स्थितीचा फायदा उचलू शकलो नाही. जेव्हा तुम्ही नाणेफेक जिंकून गोलंदाजी करता, तेव्हा प्रतिस्पर्धी संघ 580 धावा करेल, अशी अपेक्षा नसते आणि त्या क्षणापासून आम्ही सामन्यात मागे पडलो.
आम्ही आमच्या योजनांमध्ये ताठर नसतो. आम्हाला वाटले होते की, पाच दिवसांच्या खेळात ही खेळपट्टी फलंदाजीसाठी अधिक चांगली होईल; पण आम्ही पाहिल्याप्रमाणे तसे झाले नाही.