ब्रिस्बेन : भारत आणि ऑस्ट्रेलियातील पाचवा आणि शेवटचा सामना शनिवारी (8 नोव्हेंबर) ब्रिस्बेनच्या गॅबा मैदानावर होत आहे. या मालिकेत भारताने 2-1 अशी आघाडी घेतली असून, शेवटचा सामना जिंकून कांगारूंविरुद्धच्या मालिकेचा विजयी समारोप करण्यासाठी टीम इंडिया अर्थात भारतीय संघ सज्ज झाला आहे. या सामन्यात भारतीय संघाला फलंदाजीतील अस्थिरतेवर मात करावी लागेल, तर यजमान कांगारूंपुढे भारतीय फिरकी गोलंदाजांचे आव्हान परतविण्याचे लक्ष्य असेल.
पाच सामन्यांच्या मालिकेत अभेद्य आघाडी घेतल्याने भारताने ऑस्ट्रेलियात टी-20 मालिका न गमावण्याचा आपला 17 वर्षांचा विक्रम कायम ठेवला आहे. कर्णधार सूर्यकुमार यादव आणि त्यांच्या सहकाऱ्यांचा भर आता जोरदार विजयाने मालिका संपवण्यावर असेल.
पुढील वर्षी भारत आणि श्रीलंकेत होणाऱ्या टी-20 विश्वचषकापूर्वी हा महत्त्वाचा सामना आहे. भारतीय संघासाठी उपकर्णधार शुभमन गिल आणि कर्णधार सूर्यकुमार यादव यांच्या फलंदाजीतील सातत्य महत्त्वाचे ठरणार आहे. उपकर्णधार गिलने गेल्या सात डावांमध्ये अर्धशतक झळकावलेले नाही, जरी चौथ्या टी-20 मधील त्याचे 46 धावांचे योगदान फॉर्ममध्ये परतल्याचे संकेत देत आहे. संघ व्यवस्थापनाला दिलासा देण्यासाठी त्याला मोठ्या धावसंख्येने अंतिम सामन्याचा शेवट करायचा आहे.
कर्णधार म्हणून सूर्यकुमार यादवने मालिकेत काही चांगल्या खेळी केल्या आहेत. परंतु, त्याला मिळालेल्या सुरुवातीचे मोठ्या धावसंख्येत रूपांतर करता आलेले नाही. तिलक वर्मा (0, 29, 5) आणि यष्टिरक्षक जितेश शर्मा यांनाही आपल्या कामगिरीतील सुधारणा करावी लागणार आहे. अभिषेक शर्माने आपले जागतिक टी-20 हिटरचे स्थान सिद्ध केले आहे, तर अक्षर पटेलने खालच्या फळीत 11 चेंडूंत 21 धावा करून संघासाठी महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे.
ऑस्ट्रेलियासाठी चौथा टी-20 पुन्हा एकदा फिरकी गोलंदाजीसमोरची त्यांची कमकुवतता दर्शवून गेला. वरुण चक्रवर्ती, अक्षर पटेल आणि वॉशिंग्टन सुंदर या त्रिकुटाने एकत्रितपणे 10 षटकांपेक्षा कमी वेळेत सहा बळी घेतले. यजमान कांगारू संघाची फलंदाजी कर्णधार मिचेल मार्श, मार्कस स्टोईनिस आणि टीम डेव्हिड यांच्यावर जास्त अवलंबून आहे. गेल्या सामन्यात ट्रॅव्हिस हेडच्या अनुपस्थितीमुळे त्यांना 168 धावांचे माफक लक्ष्यही गाठता आले नाही.
अनुभवी जोश हेझलवूडच्या गैरहजेरीत गोलंदाजीचा मारा बोथट झाला आहे. यजमान संघ अंतिम सामन्यात माहली बियर्डमनला पदार्पण करण्याची संधी देऊ शकतो.
भारत : सूर्यकुमार यादव (कर्णधार), शुभमन गिल (उपकर्णधार), अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, नितीशकुमार रेड्डी, शिवम दुबे, अक्षर पटेल, जितेश शर्मा (यष्टिरक्षक), वरुण चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंग, हर्षित राणा, संजू सॅमसन (यष्टिरक्षक), रिंकू सिंग, वॉशिंग्टन सुंदर.
ऑस्ट्रेलिया : मिचेल मार्श (कर्णधार), मॅथ्यू शॉर्ट, जोश इंग्लिस (यष्टिरक्षक), जोश फिलिप (यष्टिरक्षक), मिचेल ओवेन, ग्लेन मॅक्सवेल, मॅट कुन्हेमन, ॲडम झाम्पा, माहली बियर्डमन, बेन ड्वार्शुईस, झेवियर बार्टलेट, नॅथन एलिस, मार्कस स्टोईनिस.
सामना स्थळ : ब्रिस्बेन
वेळ : दुपारी 1.45 वा. पासून
थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्टस् नेटवर्क