मुल्लानपूर : भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील एकमेव कसोटी सामना ६ जूनपासून सुरू होणार असून, या लढतीसाठी भारतीय संघाचे खेळाडू न्यू चंदीगडमधील मुल्लानपूर येथे दाखल झाले आहेत. संघाने मैदानात उतरून कसून सरावही सुरू केला आहे. मात्र, या सामन्यापूर्वी भारतीय संघाच्या अंतिम अकरा (प्लेइंग इलेव्हन) खेळाडूंच्या निवडीबाबत कमालीची उत्सुकता आणि पेच निर्माण झाला आहे.
विशेषतः फलंदाजीत तिसऱ्या क्रमांकावर कोणाला संधी द्यायची, यावरून साई सुदर्शन आणि देवदत्त पडिक्कल यांच्यात जोरदार चुरस पाहायला मिळत आहे. या दोघांपैकी कोणाच्या नावावर शिक्कामोर्तब होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) या मालिकेसाठी निवडलेले सर्व खेळाडू वेळेत मुल्लानपूर येथे पोहोचले असून, त्यांच्या सराव सत्राची एक विशेष चित्रफित (व्हिडिओ) बीसीसीआयने सोशल मीडियावर प्रसारित केली आहे. संघात अनेक युवा चेहऱ्यांचा समावेश असल्यामुळे अफगाणिस्तानविरुद्ध मैदानात उतरताना भारतीय संघ व्यवस्थापन कोणत्या रणनीतीचा अवलंब करणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.
अफगाणिस्तानविरुद्धच्या या कसोटी सामन्यात भारतीय संघाची सलामीची जोडी जवळपास निश्चित मानली जात आहे. आक्रमक फलंदाज यशस्वी जैस्वाल याच्यासोबत अनुभवी केएल राहुल डावाची सुरुवात करताना दिसेल. या मालिकेत केएल राहुलवर उपकर्णधारपदाची अतिरिक्त जबाबदारीही सोपवण्यात आली आहे. सलामीची जोडी निश्चित असली, तरी तिसऱ्या क्रमांकाचा पेच अद्याप सुटलेला नाही.
गेल्या काही वर्षांत भारतीय संघाने या महत्त्वाच्या क्रमांकावर अनेक खेळाडूंना आजमावले, परंतु अद्याप शाश्वत पर्याय मिळालेला नाही. यंदा या जागेसाठी देवदत्त पडिक्कल आणि साई सुदर्शन हे दोन डावखुरे फलंदाज शर्यतीत आहेत. मात्र, नुकत्याच संपन्न झालेल्या आयपीएल हंगामातील उत्कृष्ट कामगिरी आणि सध्याचा फॉर्म पाहता साई सुदर्शन बाजी मारण्याची दाट शक्यता आहे. यापूर्वी मिळालेल्या संधींचे सुदर्शनला मोठ्या धावसंख्येत रूपांतर करता आले नसले, तरी सध्याच्या लयीमुळे त्याचे पारडे जड मानले जात आहे.
भारतीय संघाचे नेतृत्व सांभाळणारा शुभमन गिल स्वतः चौथ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी उतरेल. कर्णधारपदाची धुरा आल्यापासून तो याच क्रमांकावर सातत्याने चांगली कामगिरी करत आहे. त्यानंतर पाचव्या क्रमांकावर यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंतचे पुनरागमन निश्चित मानले जात आहे. संघात ध्रुव जुरेलचाही समावेश आहे, परंतु जुरेल या सामन्यात केवळ एक उत्कृष्ट फलंदाज म्हणून खेळण्याची शक्यता असून, यष्टीरक्षणाची मुख्य जबाबदारी ऋषभ पंतकडेच सोपवली जाईल. ऑलराउंडर (अष्टपैलू) खेळाडू म्हणून नितीश कुमार रेड्डी आणि वॉशिंग्टन सुंदर यांना संघात स्थान मिळण्याची चिन्हे आहेत.
फलंदाजीची फळी भक्कम दिसत असली, तरी भारतीय संघाची खरी चिंता गोलंदाजीच्या निवडीवरून वाढली आहे. प्रमुख वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहला या मालिकेसाठी विश्रांती देण्यात आली आहे, तर हर्षित राणा आणि आकाश दीप अद्याप दुखापतीतून पूर्णपणे बरे न झाल्यामुळे निवडीसाठी उपलब्ध नाहीत. संघात मोहम्मद सिराज आणि प्रसिद्ध कृष्णा हे दोन अनुभवी वेगवान गोलंदाज असले, तरी सिराजच्या तंदुरुस्तीबाबत अद्याप साशंकता आहे.
सिराज खेळू शकला नाही, तर नेट बॉलर म्हणून संघात समाविष्ट करण्यात आलेल्या जम्मू-काश्मीरच्या औकिब नबीला थेट आंतरराष्ट्रीय पदार्पणाची संधी दिली जाऊ शकते. याशिवाय हर्ष दुबे आणि गुरनूर ब्रार यांचाही संघात समावेश असून, या दोघांपैकी एकाला पदार्पणाची कॅप मिळू शकते. फिरकीची धुरा कुलदीप यादव मुख्य फिरकीपटू म्हणून सांभाळेल.