womens icc odi world cup team india vs Sri Lanka opening match
नवी दिल्ली : भारतीय महिला क्रिकेट संघ मंगळवारी श्रीलंकेविरुद्धच्या सामन्याने आपल्या विश्वचषक मोहिमेची सुरुवात करेल, त्यावेळी 47 वर्षांपासूनची आयसीसी विजेतेपदाची प्रतीक्षा संपवण्याचे त्यांचे लक्ष्य असेल.घरच्या मैदानावर खेळण्याचा फायदा आणि सध्याचा दमदार फॉर्म हे भारतीय महिला संघाचे बलस्थान असणार आहे.
जागतिक क्रमवारीत तिसर्या स्थानी असलेल्या हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ, 12 वर्षांनंतर भारतात होत असलेल्या या स्पर्धेच्या 13 व्या आवृत्तीत स्थानिक परिस्थितीचा पुरेपूर फायदा घेण्यास उत्सुक असेल. या महास्पर्धेत ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, भारत, न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका, श्रीलंका, बांगलादेश आणि पाकिस्तान हे आठ अव्वल संघ सहभागी होत आहेत. भारताच्या चार आणि कोलंबोतील एका मैदानावर साखळी फेरीत एकूण 28 सामने खेळवले जातील. स्पर्धेसाठी 13.88 दशलक्ष अमेरिकन डॉलर्सची विक्रमी बक्षीस रक्कम ठेवण्यात आली आहे.
श्रीलंकेची राजधानी कोलंबो येथे 11 साखळी सामने होणार आहेत. यात पाकिस्तानचे सात सामने आणि 5 ऑक्टोबर रोजी होणारा भारत-पाकिस्तान हाय-व्होल्टेज सामना यांचा समावेश आहे. पाकिस्तानने अंतिम फेरीपर्यंत मजल मारल्यास, एक उपांत्य सामना आणि अंतिम सामनाही तेथेच खेळवला जाईल.
सध्याच्या कामगिरीवर नजर टाकल्यास, भारतीय संघ आत्मविश्वासाने स्पर्धेत उतरत आहे. संघाने नुकतेच इंग्लंडला एकदिवसीय आणि टी-20 दोन्ही मालिकांमध्ये पराभूत केले आहे. स्पर्धेच्या तयारीसाठी झालेल्या मालिकेत त्यांनी ऑस्ट्रेलियाविरुद्धची पराभवाची मालिकाही खंडित केली.
दीप्ती शर्मा, राधा यादव, स्नेह राणा आणि एन. श्री चरणी यांच्या नेतृत्वाखालील फिरकी गोलंदाजी घरच्या परिस्थितीसाठी अनुकूल आहे. मात्र, सपाट खेळपट्ट्यांवर किती फिरकी मिळेल हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.
भारत : हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मानधना (उपकर्णधार), प्रतिका रावळ, हरलीन देओल, जेमिमा रॉड्रिग्ज, रिचा घोष, उमा छेत्री, रेणुका सिंग ठाकूर, दीप्ती शर्मा, स्नेह राणा, श्री चरणी, राधा यादव, अमनजोत कौर, अरुंधती रेड्डी, क्रांती गौड.
श्रीलंका : चामरी अटापट्टू (कर्णधार), हसिनी परेरा, विश्मी गुणरत्ने, हर्षिता समरविक्रमा, कविशा दिलहारी, निलाक्षी डी सिल्वा, अनुष्का संजीवनी, इमेशा दुलानी, देवमी विहंगा, पियुमी वथ्सला, इनोका रणवीरा, सुगंधिका कुमारी, उदेशिका प्रबोधनी, मल्की मदारा, अचिनी कुलसूर्या.
सामन्याची वेळ: दुपारी 3 वाजता