JioStar Media Rights: आयसीसीला आता ऐत्या वेळी नवीन मिडिया पार्टनर शोधण्यासाठी पळापळ करावी लागणार आहे. जीओ हॉटस्टारनं आयसीसीसोबतच्या करारातून वेळेपूर्वीच माघार घेण्याचा निर्णय घेतला असल्याचे वृत्त आलं आहे.
मिळालेल्या माहितीनुसार जिओ हॉस्टारनं आयसीसीला कळवलं आहे की त्यांनी मीडिया राईट्सच्या डीलमधून वेळेपूर्वीच बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. हा मीडिया राईट्सचा करार हा २०२४ ते २०२७ पर्यंतच्या क्रिकेट सायकलसाठी होता. हा करार ३ बिलियन डॉलर्सचा होता. जिओ हॉटस्टारनं वेळेआधीत डीलमधून माघार घेतल्यामुळं आता आयसीसीला ऐन वेळी मीडिया पार्टनर शोधावा लागणार आहे.
इकॉनॉमिक्स टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार जिओस्टार यांनी आयसीसीला चार वर्षाच्या मीडिया राईट्सच्या डीलमधील उर्वरित वर्षे कायम राहण्यास असमर्थता दर्शवली आहे. यासाठी त्यांनी आर्थिक नुकसानीचं कारण दिलं आहे. त्यामुळं आयसीसीला आता नव्यानं भारतात होणाऱ्या सामन्यांसाठीच्या मीडिया राईट्ससाठी नवा पार्टनर शोधावा लागणार आहे.
२०२६ ते २९ या वर्षांसाठी आयसीसीला उर्वरित दोन वर्षाच्या माध्यम हक्काच्या विक्रीतून २.४ बिलियन डॉलर्सची कमाई होईल असा अंदाज आहे. दरम्यान, आयसीसीनं सोनी स्पोर्ट्स, नेटफ्लिक्स, अमेझॉन प्राईम व्हिडिओ यांच्याशी आधीच संपर्क केला आहे. उर्वरित दोन वर्षासाठी माध्यम हक्क विकत घेण्याबाबत त्यांच्याशी डील करण्याचा आयसीसीचा प्रयत्न आहे.
मात्र मिळालेल्या माहितीनुसार वरील मीडिया प्लॅटफॉर्मपैकी कोणीही अजूनपर्यंत आयसीसीशी संपर्क केलेला नाही. त्यांना माध्यम हक्कासाठीची किंमत खूप जास्त वाटत आहे. त्यामुळं आता आयसीसीसमोर मोठा पेच निर्माण झाला आहे.
अनेक रिपोर्ट्सच्या दाव्यानुसार जिओ हॉटस्टार यांना भारतात ज्यावेळी मनी गेमिंगवर बंदी आल्यानंतर आर्थिक तोटा सहन करावा लागत आहे.
रिपोर्टनुसार, 'जिओ स्टारला २०२४-२५ या आर्थिक वर्षात २५ हजार ७६० कोटी रूपयांचा तोटा सहन करावा लागला आहे. गेल्या वर्षी हाच तोटा १२ हजार ३१९ कोटी रूपये होता. म्हणजे २०२४०२५ मध्ये जिओ स्टारला जवळपास दुप्पट तोटा सहन करावा लागला आहे.
दरम्यान, टी २० वर्ल्डकप २०२६ हा फेब्रुवारी महिन्यात होणार आहे. त्यामुळं आता आयसीसीला नवा मीडिया पार्टनर शोधण्यासाठी आपली मोहीम वेगवान करावी लागणार आहे.