T20 World Cup Bangladesh ICC India Pudhari
स्पोर्ट्स

T20 World Cup: आयसीसीने बांगलादेशची मागणी फेटाळली; T-20 विश्वचषकासाठी भारतात यावचं लागेल, अन्यथा...

T20 World Cup Bangladesh ICC India: टी-20 विश्वचषकासाठी भारताबाहेर सामने घेण्याची बांग्लादेशची मागणी आयसीसीने फेटाळली आहे. भारतामध्ये येऊनच सामने खेळावे लागतील, अन्यथा पॉईंट कापले जातील असा इशारा देण्यात आला आहे.

Rahul Shelke

T20 World Cup Bangladesh ICC India: टी-20 विश्वचषकाच्या आयोजनावरून निर्माण झालेल्या वादावर आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) अखेर स्पष्ट भूमिका घेतली आहे. बांग्लादेशने केलेली ‘सामने भारताबाहेर घ्या’ ही मागणी आयसीसीने फेटाळून लावली असून, विश्वचषक खेळायचा असेल तर बांग्लादेश संघाला भारतात येणं बंधनकारक असेल, असं सांगण्यात आलं आहे. भारतात येण्यास नकार दिल्यास बांग्लादेशचे पॉईंट कापले जाऊ शकतात, असा इशाराही देण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आयसीसी आणि बांग्लादेश क्रिकेट बोर्ड (BCB) यांच्यात झालेल्या व्हर्च्युअल बैठकीत हा मुद्दा चर्चेत होता. सुरक्षेचं कारण देत भारताबाहेर सामने घेण्याची बांग्लादेशची मागणी मान्य होणार नाही, असं आयसीसीने स्पष्ट केलं. मात्र, बांग्लादेश क्रिकेट बोर्डाकडून अधिकृतरीत्या अशी कोणतीही माहिती मिळालेली नसल्याचं सांगण्यात येत आहे.

वादाची पार्श्वभूमी काय?

या संपूर्ण वादाची सुरुवात आयपीएलमधील एका निर्णयापासून झाली. कोलकाता नाइट रायडर्सने बांग्लादेशचा वेगवान गोलंदाज मुस्तफिजूर रहमान याला संघातून रिलिज केलं. हा निर्णय बीसीसीआयच्या सूचनेनुसार घेण्यात आला होता. बांग्लादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारांच्या मुद्द्यावर भारतात तीव्र नाराजी होती आणि रहमानला मोठी रक्कम देऊन खरेदी केल्याने विरोध होत होता.

यानंतर बांग्लादेश सरकारनेही या प्रकरणात उडी घेत भारतात होणाऱ्या टी-20 विश्वचषकावर बहिष्कार टाकण्याची धमकी दिली. बांग्लादेश क्रिकेट बोर्डाने आयसीसीला पत्र पाठवून भारतातील सामने श्रीलंकेत हलवण्याची मागणी केली. खेळाडूंच्या सुरक्षेचं कारण देत ही भूमिका घेण्यात आली. त्याच नाराजीपोटी बांग्लादेशमध्ये आयपीएलचे थेट प्रक्षेपणही थांबवण्यात आले.

आयसीसीची स्पष्ट भूमिका

मात्र, आयसीसीने आता सर्व संभ्रम दूर करत ठाम भूमिका घेतली आहे. टी-20 विश्वचषक ठरलेल्या वेळापत्रकानुसार भारतातच होईल आणि सहभागी व्हायचं असल्यास बांग्लादेशला भारतात यावंच लागेल, असा स्पष्ट मेसेज देण्यात आला आहे. अन्यथा, त्याचे परिणाम स्पर्धेतील गुणांवर होतील.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT